अधुरी प्रेम कहाणी - मराठी कथा

अधुरी प्रेम कहाणी, मराठी कथा - [Adhuri Prem Kahani, Marathi Katha] भातुकलीच्या खेळातील राजा-राणीचं खऱ्या आयुष्यातील राजा-राणी होण्याचं स्वप्न.
अधुरी प्रेम कहाणी - मराठी कथा | Adhuri Prem Kahani - Marathi Katha

भातुकलीच्या खेळातील राजा-राणीचं खऱ्या आयुष्यातील राजा-राणी होण्याचं स्वप्न


लहानपणी भातुकलीच्या खेळामध्ये दिपक राजा व्हायचा आणि शितल त्याची राणी. पण आता बालपण सरुन तरुणपण आलं होतं. तरी दिपक तिला त्याची राणीच समजत होता. पण शितलच्या मनात काय आहे? हे त्याला कळत नव्हतं. शितल त्याला मोकळया मनाने बोलायची. तिला आपल्या मनातले तिच्या विषयीचे प्रेम सांगावे तर ती नाराज होवून आपल्याशी बोलणं सोडून देईल, या विचारानं आजपर्यंत दिपक तिला त्याविषयी कधीच बोलला नव्हता.आज सकाळी-सकाळीच दिपक आणि गणेश चावडीवर येवून बसले होते कारण आज शितलच्या मामाच्या गावची बाळापूरची जत्रा होती. शितल आज बाळापूरच्या जत्रेला जाईल, याचा दिपकनं मनाशी तर्क केला होता. अर्ध्या-पाऊण तासाने शितल तिची आई आणि लहान बहिणीसोबत बाहेर पडली. ती दिसताच गणेशने दिपकला इशारा केला. दिपकने तिच्याकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये ते गुलाबी फुल अधिकच उठून दिसत होतं. शितलची आई दिपककडे रागानं पाहत होती हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. पण क्षणभरच. त्या पुढं गेल्यावर आणखी तो तिच्याकडे पाहु लागला. तिनेही जाता-जाता एक नजरेचा बाण त्याच्याकडे फेकला होता. त्या बाणानं तो घायाळ झाला. बाळापूरला जाण्यासाठी बसस्थानकाच्या बाजूलाच टमटम लागलेले होते. त्या तिघीजणी टमटममध्ये बसल्या. आणखी काही प्रवासी टमटममध्ये बसले आणि टमटम बाळापूरला निघाले.

त्या टमटमच्या मागेच दिपक आणि गणेश मोटारसायकलवर निघाले. टमटमला मागे टाकत दिपकने टमटमच्या मधल्या सिटवर बसलेल्या शितलकडे पाहिले. शितल प्रेमाने पाहत होती, पण तिची आई रागानं त्याच्याकडे पाहू लागली. बाळापूर जवळ येईपर्यंत त्या टमटमचा आणि दिपकच्या गाडीचा पाठशिवणीचा खेळ चालु होता. दिपक मुद्दामच कधी त्या टमटमच्या पाठीमागे तर कधी पुढे जायचा.

डोंगरातलं ते गाव खुपच सुंदर होतं. डोंगर उतरताना अवकाशातुन पाहिल्यासारखं दिसु लागली. रातपाळणा, विविध खेळण्यांची, कापडांची, फुला-नारळांची दुकानं, भजे-चिवडा, चहांचे हॉटेल आणि माणसांच्या गर्दीनं जत्रा चांगलीच फुलून गेली होती. जत्रेच्या मधोमधील वडजाई देवीच्या मंदिराचं शिखर खुपच आकर्षक दिसत होतं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच असलेलं चिंचेचं मोठं डेरेदार झाड जणु काय त्या जत्रेवर लक्ष ठेवत आहे असं भासत होतं. जत्रेमध्ये आलेल्या लोकांचा गोंगाट लांबूनच ऐकु येवु लागला. पंचक्रोशीतील लोक वडजाई देवीच्या जत्रेला आले होते. सासरहून लेकी जत्रेसाठी माहेरी आल्या होत्या. पै-पाहुणे आले होते. कामानिमित्त बाहेरगावी असलेली चाकरमानी माणसं आपल्या मुलांबाळासहीत आपल्या माय पंढरीत येवून सुखावली होती. ही जत्रा म्हणजे परिसरातील लोकांना आनंदाची पर्वणीच होती. बोललेले नवस फेडण्यासाठी सकाळपासूनच देवीच्या मंदिरासमोर गर्दी झालेली होती. सगळीकडे आनंदी वातावरण होतं.

शितल तिच्या मामाच्या घराकडे गेली होती. दिपक आणि गणेश मंदिराजवळच त्यांची वाट पाहत उभे होते. थोडया वेळानं शितल तिच्या मामाच्या मुलींसोबत मंदिराकडे दर्शनासाठी आली. स्त्रियांची वेगळी रांग आणि पुरुषांची वेगळी रांग लागलेली होती. दर्शन व्हायला कमीत-कमी एक तास लागणार होता पण दिपकला आणि शितलला तो एक तासही कमी वाटत होता. रांगेत उभे राहून ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. तिच्या त्या प्रेमभऱ्या नजरेने पाहण्याने त्याला त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सगळयात मोठा आनंद झाला होता. आपण जिच्यावर प्रेम करतो, तीही आपल्यावर प्रेम करते हे त्याला समजले होते. जगातील सगळयात मौल्यवान गोष्ट मिळाल्याचा त्याला आनंद होत होता.

दर्शन झाले. तिच्यासोबत तिच्या मामाच्या मुली आणि तिची लहान बहीण होती. त्यामुळे त्या दोघांना इच्छा असूनही एकमेकांशी बोलता येत नव्हतं. शितल त्या मुलींसोबत जत्रेमध्ये फिरु लागली. दिपक आणि गणेश पण त्यांच्या मागे-मागेच फिरु लागले. जत्रेमध्ये विविध खेळण्यांचे, वस्तुंची दुकाने होती, लेडीज साहित्याची दुकाने होती, खाण्याच्या पदार्थांची विविध दुकाने होती. सगळी जत्रा फिरुन झाली. दिपकनेही आज तिला मनातलं बोलायचचं असं ठरवलं होतं. दिपक त्यांच्या मागे-मागेच फिरत होता. गणेश कुस्त्याच्या फडाकडं कुस्त्या पहायला गेला होता. ती जवळ येताच दिपकने गर्दीचा फायदा घेवून तिच्या हातात चिठ्ठी दिली. दिपकने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की “लहाणपणी भातुकलीचा खेळ खेळताना तु माझी राणी व्हायचीस, आता खऱ्या आयुष्यामध्ये तु माझी राणी होशील का?” तिनेही चतुराईने कोणाच्याच लक्षात येणार नाही अशा बेताने ती चिठ्ठी वाचली आणि तिने हसून दिपककडे पाहिलं. ती हसली, याचा अर्थ तिचंही दिपकवर प्रेम होतं. तो मनोमन खुष झाला होता. जे काम करायचं होतं ते काम झालं होतं. आनंदाची बातमी सांगायला तो गणेशकडे निघाला.

तेवढयात जत्रेमधील चिंचेच्या झाडाकडील माणसं सैरावैरा पळत सुटले. तेवढयात कोणीतरी ओरडलं, स्वयंपाकाच्या भट्टीच्या धुरानं चिंचाच्या झाडावरलं आग्या मोहोळ उठलं आहे. हे ऐकून फडातले पैलवान लंगोटवरच पळत सुटले. दुकानदार आपापले दुकान सोडून पळु लागले. आग्या मोहळाच्या गांधणीसारख्या माशा सापडेल त्याला कचाकच तोडु लागल्या. जो तो जीवाच्या आकांताने पळत सुटला. जवळच्या घरावाल्यांनी माशा आतमध्ये येवु नयेत म्हणून दारं लावून घेतले. माणसांना कुठेच लपायला जागा भेटली नाही. माशांनी तावडीत सापडलेल्या, केवळ लंगोट घातलेल्या पहिलवानांवर हल्ला चढवला. ते बलदंड, पिळदार शरीरयष्टी असलेले, अजोड ताकदीचे पहिलवान जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोणीच कोणाला वाचवु शकत नव्हतं. जो तो आपलाच जीव वाचवण्यासाठी पळत होता.

दिपक आणि गणेशही माशांपासून बचावासाठी पळत सुटले. गणेश आधीच पुढे पळत होता. दिपकने मागे वळून पाहिले, तेवढयात त्याला शितल दिसली. पळता-पळता ती दगडाला अडकून पडली. तिच्या सोबतच्या मुली वाट दिसेल तिकडे पळत सुटल्या होत्या. जो तो दुसऱ्याला विसरून आपलाच जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. तिला पळणं अशक्य झालं. असंख्य माशा तिच्यावर तुटुन पडल्या. तिच्या सुंदर देहाचा चावा घेवू लागल्या. ती जीवाच्या आकांताने ओरडु लागली. तिच्या सोबतच्या मुली कधीच पळून गेल्या होत्या. दिपकने ते पाहिलं होतं. तिला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता तो तिच्याकडे पळाला. तिचा चेहराही दिसत नव्हता, इतक्या माशा तिच्या चेहऱ्यावर बसल्या होत्या. दिपक हातानेच तिच्या चेहऱ्यावरील माशा बाजूला सारण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन लागला. त्यानं तशाही परिस्थितीमध्ये त्याचं शर्ट काढून तिच्या चेहऱ्यावर झाकलं. तरीही माशांनी चावायचं सोडलं नाही. दिपकलाही माशा चावु लागल्या. काही माणसांनी टेंभे केले, मोठा धुर केला. त्यामुळे कशाबशा माशा निघून गेल्या. दिपकपेक्षा चारपटीनं शितलला जास्त माशा चावल्या होत्या. दिपकला डोकं जड झाल्यासारखं झालं. डोळयासमोर अंधाऱ्या आल्या आणि तो धाप्‌कन तिथेच पडला.

दिपक शुद्धीवर आला तेव्हा गणेश त्याच्या बाजूलाच बसलेला होता. तो दवाखान्यात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानं बाजूला पाहिलं, कोणाच्यातरी रडण्याचा आवाज येत होता. शितलच्या आईचाच आवाज होता तो. तिकडे पाहत दिपक उठून बसला. गणेशच्याही डोळयात पाणी आलं होतं. गणेशने जड अंत:करणानं “शितल आपल्याला सोडून गेली.” म्हणून दिपकला सांगितलं. दिपकला क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. माशांच्या चावण्यानं जेवढया वेदना त्याला झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी पटींनी गणेशचे शब्द ऐकून त्याला वेदना झाल्या. गुलाबाच्या कळीहून नाजूक अशा शितलच्या शरीरावर आग्या मोहळाच्या माशांनी चावा घेतल्याने असंख्य वेदना असहय झाल्याने शितलने आपला प्राण सोडला होता. आता कितीही वाट पाहिली, तरी ती परत येणार नव्हती. भातुकलीच्या खेळातील राजा-राणीचं खऱ्या आयुष्यातील राजा-राणी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहीलं होतं आणि आता तो शुन्यात नजर लावून बसला होता.

..त्याला मंगेश पाडगावकरांचं भावगीत आठवत होतं.

भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी
अर्ध्या वरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी।

- संदिप खुरुद

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.