उभा सावळा श्रीहरी - मराठी कविता

उभा सावळा श्रीहरी, मराठी कविता - [Ubha Savala Hari, Marathi Kavita] देह तुळशीचं घर, भावमंजिरी मोहोर, दिंडी व्हावी हा संसार.
उभा सावळा श्रीहरी - मराठी कविता | Ubha Savala Hari - Marathi Kavita

देह तुळशीचं घर, भावमंजिरी मोहोर, दिंडी व्हावी हा संसार

देह तुळशीचं घर
भावमंजिरी मोहोर
दिंडी व्हावी हा संसार
ध्यास पंढरी माहेर

नको अहंभाव देवा
नको षड्रिपु चावा
पायी एकमेका व्हावा
लीन झुकलेला माथा

खांद्या राहो एक झोळी
गरजेची करुनी मोळी
मुखी नाम तुझे देवा
मूर्त हृदयपाकळी

ध्वजा वैष्णवांची हाती
इथं सारी नातीगोती
तुळशीची माळ गळा
बुक्का केशराचा टिळा

टाळ हाताशी वाजतो
नाद त्रिखंडी गाजतो
मुखी हरीनाम घेता
विठू भजनी नाचतो

दिंडी चालता हो वारी
वारी जातसे पांढरी
वैकुंठाचा राजा इथं
उभा सावळा श्रीहरी

त्याला डोळाभर पाहू
चरणाशी थोडं राहू
चंद्रभागी भक्तिजळ
चिदानंद डोही नाहू

संसार सासुराचे
कष्ट माहेरी न नेणे
न सांगताच माउलीनं
सारं सारं ते जाणणे

आता संवाद ही पूजा
नाद जिवा नाही दुजा
सत्त्वभावाचा मोहोर
ऋतुराज विठुराजा

- डॉ. मंजुषा कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.