महाराष्ट्रातील पूर आणि दुष्काळावर देवाला आळवणी
पूर अन दुष्काळ आलाय माझ्या महाराष्ट्रात
कुठं लपून बसलास देवा सांग न माझ्या कानात
काय सांगावे रे देवा तुला कर्माची ही व्यथा
कुठं दुष्काळ तर कुठं पुरात वाहून गेली संसाराची गाथा
रखुमाई येणार म्हणून काढली आईने रांगोळी
तिला कुठं ठाऊक पुरात वाहनार होती घराची झोळी
चुलीसाठी सरपण सार भिजून गेला
दिवा देव्हाऱ्यात लावायला तो ही वाहून गेला
किती सहन करावा अस तुला वाटत देवा
काय केलं पाप आम्ही असा रुसून बसला
स्वप्न हिरवळ बघायचं पाहिलं र डोळ्यांनी
दाखवलस देवा चोहीकडे पाणीच पाणी
सर्जा माझा राजा अन लक्ष्मी माझी गाय.
हंबरडा फोडत वाहून गेले अजून सांगू काय
वाट बघत बसली शेतकऱ्या लेकरांची माय
लेकरू तिचा पुरात नेला तिला सांगशील काय
माय चा टाहो तुला नाही का ऐकू आला
असा कसा देवा तुझं दार लावून बसला
उडघ दार देवा आता धावून ये लवकर
लेकरांचा संसार धर तुझ्या हातावर
- लिलेश्वर खैरनार