प्रेम हे नावावर नसतं - भाग ६ - मराठी कथा

प्रेम हे नावावर नसतं - भाग ६,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 6,Marathi Katha] नवा दिवस नवी जागा आणि नवे लोक, सकाळी अर्पिता लवकर उठते.
प्रेम हे नावावर नसतं - भाग ६ - मराठी कथा | Prem He Navavar Nasata - Part 6 - Marathi Katha

नवा दिवस नवी जागा आणि नवे लोक

सकाळी अर्पिता लवकर उठते. सगळी आवरा आवर लवकर आटपून ती खाली उतरते.

सावित्री आईला शोधत ती मारुतीला विचारते “मारुती सावित्री आई ला बघितलंय का तुम्ही त्या कुठे असतील.”

“ताई साहेब सावित्री आई किचन मध्ये असतात ह्या वेळेवर” मारुती अर्पिताकडे बघत.
ती किचन मध्ये जाते तिथे सावित्री आई तिला काम करताना दिसतात ती त्यांच्या जवळ जाते “सावित्री आई ह्या घरात देवारा कुठंय?”
त्या तिला बघतात साडीत ती सुंदर दिसत असते आणि त्यांचे डोळे पाणवतात.“तू पूजा करणार” सावित्री आई.
“हो, का काही चुकला का माझं” अर्पिता जरा घाबरतच बोलते.
“नाही ताई साहेब मोठ्या बाई साहेब गेल्या पासन देव्हाऱ्यात कोणी गेला नाही, मीच जात असते अधून मधून.”
“मी पूजा केली तर चालेल ना” अर्पिता त्यांना बघत.
“हो! ताई साहेब, अहो! तुम्ही मला का विचारता?, तुम्हीच या घरच्या मालकीण तुम्हाला जे मनाला वाटेल ते करा” सावित्री बाई त्यांना कुतूहलाने बघत.
ती देव्हाऱ्यात जाते ते आवरायला घेते स्वछ करते आणि काहीच वेळात तो चमकायला लागतो. मग ती त्यात देवाची नीट मांडणी करते आणि पूजा करायला घेते. बागेतुन फुल आणते देवाला वाहते त्यांची सजावट करते, किती तरी वर्षांनी त्या देव्हाऱ्यात आरती होते धूप दीप अगरबत्ती आणि घंटा नाद होतो. त्या सुवासिक फुलांनी, धूपाने त्या घरातले वातावरण संपूर्ण बदलून जाते. तिला हि प्रसन्न वाटत असते. सगळं आटपून ती मग किचनमध्ये जाते आणि नाश्त्याच्या तयारीला सावित्री आईला मदत करते.

घरातले सगळे नौकर तिला कुतूहलाने बघत असतात ते नवजीवन जगत असतात सगळ्यांना खूप आनंद होत असतो कारण खूप वर्षांनी काहीतरी नवीन होत असते. तिला एवढं काम करताना बघून सावित्री आई तिच्या जवळ येऊन “ताईसाहेब एका दिवसात इतकं नका करू थकाल तुम्ही.”

“सावित्री आई मला सवय आहे” अर्पिता त्यांचाकडे हसत आपल्या कामाला परत लागते.
तेवढ्यात मारुती येतो “ताईसाहेब मोठे साहेब आणि लहान साहेब नाश्त्याला आलेत तुम्हाला विचारलय.”

आता मात्र अर्पिता घाबरते आणि टिचा चेहऱ्यावरचं हसनं गायब होऊन जातं. तिला भीती असते; कारण तिने न विचारता घरात पूजा नि किती तरी सामानाला हात लावलेला असतो. काल रात्री अनिकेत तिला जे काही बोलून जातो त्याच्या वर्णनाने तरी तिला त्याची भीती जास्त वाटत असते कारण याचा पण अर्थ जर त्यांनी चुकीचा लावला तर?

ती जशी-तशी स्वतःला आवरते आणि टेबल जवळ जाते तिला बघून सत्यजित खूप खुश होतो.
“ये अचल इथे ये बस”, सत्यजित तिला खुर्ची दाखवत.

सगळ्यांना नास्ता वाढून ती पण बसते. पहिला घास घेतात आणि सत्यजित “सूनबाई तुमच्या हाताला चव आहे.”
ती त्यांना बघत “तुम्हाला कसं कळलं हे मी केलंय ते”, अर्पिता आश्चर्याने सत्यजितला बघत.
“बस कळलं” सत्यजित तिच्या कडे हसत बघतो.

एवढं असताना पण अनिकेत शांतपणे नाश्ता करतो आणि ऑफीसला निघून जातो.
सत्यजित मात्र सगळ्या गोष्टींची प्रशंसा करत असतो. “अचल, उद्या पासून रोज पूजा कर; मन प्रसन्न होतं; लक्ष्मी परत आमच्या दारी परतलीय” म्हणत ते आपल्या कामांनी ऑफिसला निघून जातात.

दिवसभर ती काही कॉल करते आपल्या जुन्या ऑफिसच्या बॉसशी बोलून त्यांच्या रेफरन्सने जॉब करायचा विचार करते व ती बाहेर पडते ढोले पाटील रोडवर फेमिन्ग मॅक्झीनचं ऑफिस असतं तिथे तिच्या बॉसची ओळख असते ती जाते इंटरव्ह्यू देते, सिलेक्ट होते तिला त्या कंपनीत जॉब लागतो.

ती आनंदात घरी येते. पण मोठ संकट तर आता असतं जेव्हा तिला जॉबसाठी रोज बाहेर जावं लागणार. पण तिला जॉब तर करायच असतो ती अनिकेतला विचारायचं ठरवते.

संध्याकाळी सगळं जेवण आटोपते आणि त्यांची वाट बघते. सगळे येतात जेवणाच्या टेबलवर बसून शांतपणे जेवण करतात. जेवण खूप छान झालेलं असतं म्हणून सगळे तिची प्रशंसा करतात. सत्यजित “अचल तुला स्वयंपाक करायला आवडत असेल तर तू रोज कर मला पण रोज नवीन खायला आवडेल”, म्हणत ते पानावरून उठतात आणि आपल्या खोलीत जातात अनिकेत पण जेवण आटपून आपल्या खोलीत जायला निघतो.

“स्वयंपाक छान झाला होता स्वयंपाक” अनिकेत एवढं बोलून चालू लागतो.

अनिकेत काही बोलून गेला तेही प्रशंसा केली तिला धक्का बसतो पण त्यामुळे तिला धीर मिळतो ती तिच्या जॉबसाठी त्याला विचारणार असते. त्यात तो बोलतो म्हणून तिचं काम आणखीन सोपं होतं. ती जेवण आटपून सगळी आवराआवर करते आणि खोलीत जाते ती जरा घाबरलेली असते. त्या भीतीपोटी ती रूममध्ये पोहोचल्यावर सैरभैर फिरत असते. तो स्टडी रूममधे असतो तिला हे माहित नसते कि त्या आरश्याच्या मागे स्टडीरूम आहे. तिला असा येरझरे मारताना बघून तो रूम मधल्या एक्स्टेंशनवर कॉल करतो. ती तो कॉल उचलते.

“मी बोलतोय” अनिकेत फोन उचलताच बोलतो.
“हऽऽऽम्म”अर्पिता घाबरत बोलते.
“तुला स्वयंपाक करायला आवडत नसेल तर नको करू, कोणी बोललं म्हणून मना विरुद्ध नको जाऊ” अनिकेतला वाटतं कि तिने बाबांच्या बोलण्याचं टेंशन घेतलंय तो एवढं बोलून फोन ठेवतच असतो कि ती...
“मी... मला” अर्पिताच्या तोंडून शब्द फुटत नसतात.
“काय झालं?” अनिकेत तिला शांत करत.
“मला जॉब करायचांय” ती एका श्वासात सगळं बोलते.
“हऽऽऽम्म” अनिकेत विचार करत.
त्याच काहीच उत्तर येत नाही.

“डोन्टवरी, मी कुठेही आपलं नाव खराब होईल किंवा कोणालाही कळू देणार नाही, नक्की...” अर्पिता त्याला कन्व्हिन्स करायचं म्हणून आणखीन ऍड करते.
तो काही न बोलता फोन ठेवतो. तिला काहीच कळत नाही ती टेंशन मधेच झोपते. तिला वाटतं कि तो तिला कधीच नोकरी करू देणार नाही.

ती उदास आणि खिन्न मनाने रोज प्रमाणे सकाळी लवकर उठते आणि तो यायच्या आत रूम मधुन बाहेर पडते. खाली येते; देव पूजा आटपून ती स्वयंपाक खोलीत जाते. सावित्री आई तिथेच असतात.

त्यांच्याशी बोलते “आज नाश्ता काय करू? उपमा चालेल?” अर्पिता त्यांच्या जवळ जात.
त्यांचं अंग गरम असतं म्हणून ती त्यांच्या कपाळाला हात लावून बघते तर त्यांना ताप असतो. अर्पिता त्यांना खोलीत नेऊन झोपवते परत किचनमध्ये येऊन कामाला लागते. थोड्याच वेळात चहा नाश्ता आटपून, ती मारुतीच्या मदतीने टेबल सजवते. सगळे नाश्त्याला बसतात.

“मारुती सावित्री आई कुठंय? अनिकेत मारुतीला विचारत.

“त्यांना बरं नाही; मी त्यांना औषध देऊन झोपवलंय”, अर्पिता जरा बिचकत उत्तर देते.
तो शांतपणे नाश्ता आटोपतो आणि सावित्री आईला बघायला त्यांच्या खोलीत जातो, त्या झोपलेल्या असतात म्हणू लांबूनच त्यांना बघून निघून जातो.

तो किचन मध्ये येतो तिथे अर्पिता कामात असते त्याला तिथे तिच्याशी बोलणं योग्य वाटत नसतं, म्हणून तो खोलीत तिची वाट बघत असतो. ती काम आवरते आणि खोलीत जाते अनिकेत नि काहीच उत्तर दिलं नसतं म्हणून ती उदास असते. अनिकेत नेहमी प्रमाणे स्टडीरूममधे तिची वाट बघत असतो.

ती रूममधे येते तो एक्स्टेंशनला कॉल करतो ती फोने उचलते.
“तुला जॉब करायचा असेल तर करू शकते” अनिकेत फोन वर बोलतो.
“आणि हो तुला मला घाबरण्याची काहीच गरज नाही हि रूम तुझी पण आहे उगाचच किचन मध्ये बसून राहत जाऊ नकोस निदान काही दिवस तरी आपण एकमेकांना सहन करू शकतो” अनिकेत एवढं म्हणून फोन ठेवतो.
ती आनंदाने फोन ठेवत जोरात उडी मारते आणि नाचत असते.
तिला असं बघून त्याला तिचं हसू येतं. तिचा तो निरागस पण बघून त्याला ती आवडायला लागते तसं पहिल्यांदा तो तिला कोर्टात बघूनच तिच्या प्रेमात पडतो पण त्याला न विचारता त्याचा वडिलांनी हे लग्न ठरवलेलं असतं म्हणून तो तिच्या वर चिडलेला असतो.

क्रमशः


ऋचा पिंपळसकर | Rucha Pimplaskar
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लेखनाची अत्यंत आवड असणाऱ्या ऋचा पिंपळसकर मुळात एक कम्युनिकेशन ट्रेनर म्हणुन कार्यरत आहेत यांची स्वतःची एक वेगळी लेखनशैली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.