मातृ ऋण - मराठी कथा

मातृ ऋण, मराठी कथा - [Matru Run, Marathi Katha, Mother's debt] नरकातुन वाचलेल्या एका मुलीने मात्रृदिनी एका आईच्या त्यागाचे ऋण नकळत फेडले होते.
मातृ ऋण - मराठी कथा | Matru Run - Marathi Katha

नरकातुन वाचलेल्या एका मुलीने मात्रृदिनी एका आईच्या त्यागाचे ऋण नकळत फेडले होते

टीव्हीवरच्या प्रत्येक चॅनलवर ब्रेकींग न्यूज म्हणून आज फक्त एकच बातमी होती! “कोरोनावरची लस शोधून काढण्यात पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटला अभूतपूर्व यश मिळालं आहे.” सीरमच्या रीसर्चटीमने अविश्रांत परिश्रम करुन ही लस शोधून काढली होती त्यामुळे आता लाखोंचे प्राण वाचणार होते. त्या टीमची प्रमुख आणि या संशोधनातील अग्रणी, डॉक्टर नर्मदा व्यंकटेश या तरुण डॉक्टरचा फोटो आज प्रत्येक चॅनल दिमाखात मिरवत होता.

आपल्या जुन्या खाटेवर पडता पडता तुलसी, खोलीतल्या इतर मुलींबरोबर बातम्या बघत होती. आज चष्मा लावून बघायला लागलं तरी तिला लगेच ओळख पटली होती. तिचाच चेहरा, तीच चण, अंगकाठी पण अगदी तशीच. स्वतःच्या रक्ताची ओळख कोणी विसरेल का? पस्तीस वर्षे झाली असतील नाहीका? होय! या पावसाळ्यात पस्तिशीला येईल ती!

तुलसीच्या डोळ्यात पस्तिस वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यातली ती रात्र उभी राहिली. धुवाधार पाऊस लागलेला, सरकारी हॉस्पिटल मधल्या स्रीयांच्या जनरल वार्डमधे मिळालेल्या एका तात्पुरत्या खाटेवर विव्हळत पडलेली तुलसी. नऊ महीने भरुन वर काही दिवस झालेले, रात्री जेवतानाच पहिली कळ आली. तुलसी पहिलटकरीण (पहिल्यांदाच गरोदर असलेली स्त्री) पण घरवाली मौसी मात्र या सर्वांतून जाणकार. कंबरेतून पोटात अशी कळ येतेय का ग? चल, तुला जायची वेळ आली. अरे ओ शीला! जरा इधर आ. तुलसी के साथ जा. उसका पहीलाचं टायम आहे. टॅक्सी करुन हॉस्पिटल गाठेपर्यंत तास मोडला. पाऊस थांबायचं नाव नाही. कृष्ण जन्मला तेव्हा पण असाच पडत असेल का पाऊस? तुलसीच्या मनात आलं. देवकीमाता तिकडे कारागृहात कळा देत होती. तुलसी ज्या वस्तीमधुन आली होती तो कोठा तर कारागृहापेक्षाही वाईट नरक होता. या वस्तीत फक्त मुलींना येण्याची मुभा होती. पण समाजाच्या अभेद्य चौकटीच्या कोणी न बांधलेल्या भिंती त्या वस्तीच्या कडेने वर्षानुवर्षे उभ्या होत्या. त्यांना भेदून बाहेर पडायची मुभा कोणालाच नव्हती. कुण्या एका अशाच रात्री ती वस्तीत विकली गेली होती. मग तीचं सुंदर शरीर, आत्मा देखील चोळामोळा होऊन मेला असता; पण तुलसीने तो जगवला होता.

म्हणून तर प्रेमात पडला होता तो तीच्या! तो डॉक्टरी शिकायला बाहेर गावाहून आलेला. कॉलेजच्या मीत्रांच्या नादाने मजा म्हणून ह्या वस्तीत रात्री घालवायला आलेला. तीला बघून तीच्या सौंदर्याने आकर्षित झालेला. तीच्यापेक्षा पाच सहा वर्षे लहान होता. एकदा आला. दुसऱ्यांदा तीने समजावून परत पाठवला त्याला. पण तो यायचा. फोन करायचा. नुसतं सेक्स करता नाही. ते झालं की तीच्या मांडीवर डोकं ठेऊन खुप बोलायचा! खुप मोठा डॉक्टर व्हायचं होतं त्याला, गावी जाऊन लोकांची सेवा करायची होती. “डॉक्टर झालो की येशील माझ्या सोबत?!” तो विचारायचा. ती चेष्टा करायची. हे काही खरं नाही माहित असून तिला ऐकत रहावं असं वाटायचं. पण एका दिवशी तीच्या दलालाचं आणि त्याचं वाजलं, मारामारी झाली आणि तिनं निश्चिय केला. हा चांगल्या घरातला पोरगा फुकट जाईल हे लक्षात आलं तिला. तिनं मन घट्ट करुन दरवाजे बंद करुन घेतले, त्याच्या करता. “देख, तू इस सबसे दूर रहना. तेरा मेरा कोई रिश्ता नही, फोकट मार खाएगा एक दिन!” असं म्हणत तिने कायमचा घालवून दिलान त्याला. त्याच वेळी तिला लक्षात आलं की तिची पाळी चूकलेय. दिवस गेलेत तिला. त्याचंचं पोरं होतं हे. तिनं कोणाला सांगितलं नाही तरी मौसीने यथावकाश ओळखलचं. तिनेच तिला वस्तीतल्या डॉक्टरकडे औषधाला पाठवलं. तिची कंडीशन ओळखुन तिची गिऱ्हाईकं कमी करुन टाकली. तिला जरा चांगलं खाऊ-पीऊ घातलं. नऊ महीने भरले. आऽऽऽई गं! तुलसीला वाटलं, आज मरण आलं तर बरं. पुन्हा जायला नको परत.

त्या रात्री सुरेख नक्षत्रासारखी पोर जन्माला घातली तीने. तीला पहील्यांदा जवळ घेतल्यावर तुलसी सगळ्या वेदना विसरुन गेली. पण सकाळी उठल्यावर तीच्या मनातल्या आनंदाची जागा भितीने घेतली. मुलगी झाली म्हणजे हिला पण मौसी कोठ्यावरच वाढवणार! आठव्या वर्षी हिच्या पायात घुंगरू येणार. सोळाव्या वर्षी कुठल्या तरी अरब नाहीतर पैशेवाल्याला विकणार त्या मौसीचा भडवा; जग्गू! अजून एक आयुष्य फुकट जाणार, मातीत मिळणार?! त्या विचारानेच तुलसी रडायला लागली. पोरीला पाजायला जवळ घेताना तीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहायला लागल्या. तीच्या वस्तीत तीची एकच जीवाभावाची मैत्रीण होती, दीपा.

सकाळी तीला नाश्ता घेऊन आली होती. तीला तुलसीने सर्व काही समजावून सांगितले. खरं तर चार दिवसांनी डीस्चार्ज असतो पण तुलसीने तीसऱ्या दिवशी संध्याकाळी मागून घेतला होता. पोरीला शेवटचं पाजून, तिने एक अफुचं चाटण चाटवलं. पाऊस आजपण धुवांधार पडत होता. बाहेर एक वाहन मिळेना. तिने दिपाला वस्तीत पाठवून दिलन. पोरीचं मुटकूळ उराशी धरुन ती कमरे ईतक्या पाण्यात चालत होती. डोक्यावर फाटकी छत्री, अंग भिजलेलं. कुठे गटाराचं झाकणं खुलं असेल तर दोघींना जलसमाधी! काळा कच्च अंधार, ये जा करणाऱ्या एखाद्या गाडीचे मधेच दिवे, त्यांचा उजेड. कधीतरी मध्यरात्री त्या अनाथाश्रमाची इमारत दिसली तीला. त्या आश्रमाचं नाव ऐकून होती ती. पेपर मधे वाचायची ती. पेपरात फोटो येत असत, दोन महिन्यांचे बालक मिळाले आहे वगैरे. आश्रमाच्या दारात वळचणीला फक्त दोन कुत्री झोपलेली. बाकी सामसूम. आपल्या निद्रिस्त मुलीचा शेवटचा पापा घेउन तीला जवळच्या धोपटीतल्या पातळात घट्ट गुंडाळून दारातल्या पाय पुसायच्या घोंगडीवर ठेवलं आणि मागे न बघता ती नीघाली. स्टेशनवर जाऊन बसली. दिवसभर कुठे कुठे फीरली ती. दोन दिवसांनी सटपटत वस्तीत पोहोचली. मौसी ने थोबडावली, जग्गूने केस धरुन फरफटत खोलीत टाकली, यथेच्छ मारली, तोंडातून रक्त आलं, हाता पायावर, पाठीवर वळ आले. चार दिवस उपवास घडला पण तोंड नाही उघडलं तिने. “पोरगी मर गई मौसी! पैदा होते ही मर गई!” एवढच सांगत बसली. शेवटी मौसीने नाद सोडला. जेमतेम दहा दिवस विश्रांती, पुन्हा धंद्याला लावली तीला.

त्या नंतर त्या वाटेला फीरकली नाही ती. कधीतरी तिला वाटायचं की जावं आणि विचारावं पुढे काय झालं तिचं? पण कोणाला विचारणार? तरी दोन- वर्षांनी तीनं माग काढलाच. तिच्या मैत्रीणीला हॉस्पिटलमधे बघायच्या निमित्ताने बाहेर पडून तिने एक दिवस अनाथाश्रम गाठलंच. तीकडे चार मिठाईचे बॉक्स आणि काही खेळणी घेऊन वाटायला घेऊन गेली. पण आश्रमातल्या खेळणाऱ्या मुलांमधे तिला तिची मुलगी दिसली नाही. तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण ती कोणाकडे दिली हे अजूनही कळले नव्हते तिला. आता ती दरवर्षी जायला लागली. तीकडच्या आयांबाईशी ओळख वाढवली. त्यांच्या हातापाया पडली.

“देख! मै तुझे कुछं बताऊंगी तो मेरेको नोकरी से निकाल देंगे. मैं तुझे उनका अतापता नही बताऊंगी. असं म्हणतं तीने तुलसीला सांगितलं की कोणी मिस्टर वेंकटेश आहेत त्यांच्याकडे दिलंय तीला. चांगली फॅमिली आहे. “बस्स! इससे जादा मैं नही बताऊंगी तुझे.” पण तुलसीला तरी अजून काय हवं होतं? तेवढं पुरे होतं तिला. ती सुखावली. तिच्या पोरीला या नरकातून बाहेर काढलं होतं तिने; पण तिचं सुख जग्गूला बघवलं नाही. एक दिवस आश्रमात मिठाई घेऊन जाताना रंगेहाथ पकडलच त्याने. क्या बात है? मोठी उदार बनली तु? ईतनाही खीलाने का है तो अपनी बस्ती मे क्यो नही बाटती मिठाई? कबसे बाँट रही है रे? तेरी पोरगी मरनेके बाद? तुलसीने त्याला उडवलनं तरी तीच्या काळजाचा ठोका चुकला. ‘ता’ वरुन ताकभात कळण्याएवढा जग्गू हुशार होता. शिवाय त्याची गुन्हेगारी जगात खोल कनेक्शन्स होती.

त्याला वाटेतून बाजूला करायला काय आणि किती अग्निदिव्य करावं लागलं तुलसीला? जग्गूच्या प्रतिस्पर्धी दादाशी लफडं, त्याचे कान भरणे, पोलीस डीपार्टमेंटच्या गिऱ्हायकाशी शैयासोबत, त्याला आतल्या बातम्या देऊन घडवून आणलेला जग्गूचा एनकाउंटर! या सगळ्यात ती जखमी झाली, तिने मार खाल्ला, पोलीस चौकशी झाली, शरिराची होळी झाली पण सगळ्याला पुरून उरली ती. आपल्या पोरीच्या स्मरणात आणि काळाच्या ओघात ती सगळे घाव विसरली. शरिराला तर तीने तिलांजली दिलीच होती. आत्म्याची धुगधुगी मात्र जाग्रृत होती.

डॉक्टर नर्मदा वेंकटेशचा फोटो आणि पंतप्रधानांनी तीच्या केलेल्या कौतुकाची बातमी पुन्हा एकदा चॅनेलवर झळकली आणि तुलसीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. “बापाची बुध्दी घेतलीन पोरीने!” तुलसीला तिच्यावर प्रेम करणारा डॉक्टर आठवला. त्याची स्वप्नं आठवली. त्याला खुप मोठं व्हायचं होतं. लोकांची सेवा करायची होती! तुलसीच्या पोटी वाढलेल्या बीजानं नकळत तिच्या जन्मदात्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. तुलसीने प्रेमाचं ईमान आणि वचन निभावलं होतं!

आता मला मरायला हरकत नाही. लौकर वयात शरिर थकलं होतं. गेले काही महिने धंदा जवळपास बंदच होता. या कोरोना मुळे लोकं भयाभित झालेले होते. घरातून बाहेर जायला बंदी होती. दिवसभर त्या कुबट अंधारलेल्या जागेत दाटीवाटीने रहायचं. धंदा नसल्याने रिकामटेकड्या पोरी भांडणं करायच्या. खायला रेशन वेळेवर मिळायचं नाही. गेले काही दिवस सर्दीने तुलसी भंडावून गेली होती. रात्री पर्यंत तुलसी तापाने फणफणली होती. श्वास घ्यायला त्रास होत होता. धाप लागत होती. तीचा अंत जवळ आला होता. पस्तीस वर्षांपूर्वी जीला स्वतःपासून वेगळं करुन, या नरकातून वाचवली होती तीच्या कर्तृत्वाने ती आता लाखो जणांना आजारातून वाचवणार होती. आज मात्रृदिन होता. एका आईच्या त्यागाचे ऋण एका मुलीने नकळत फेडले होते. दुसर्‍या दिवशी तुलसीच्या पार्थिवाला दहनभुमीकडे नेणाऱ्यांना तिच्या त्या चेहर्‍यावरच्या स्मीतहास्याचे रहस्य कधीच कळले नाही.
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.