हरवलेलं प्रेम - मराठी कविता

हरवलेलं प्रेम, मराठी कविता - [Harawalela Prem, Marathi Kavita] सांग कधी मित्रा मला, कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?.
हरवलेलं प्रेम - मराठी कविता | Harawalela Prem - Marathi Kavita

सांग कधी मित्रा मला; कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

सांग कधी मित्रा मला
एखाद्या प्रश्नावर अडला होता का,
कधी न भेटणाऱ्या जिवाच्या
प्रेमात तू पडला होता का?

तिच्या त्या काळ्याभोर केसांवर
तिच्या त्या नाजूक डोळ्यावर,
तिच्या त्या गुलाबी ओठांवर जीव तुझा जडला होता का?

सांग कधी मित्रा मला
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

कधी तिच्या लटक्या रागावर
हसताना गालावरच्या खळीवर,
तिच्या नादातल्या मदमस्त चालीवर
तीच हवी म्हणून नशिबाशी
बेफाम होऊन लढला होता का?

सांग कधी मित्रा मला
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

ती दिसावी म्हणून वेड्यासारखं फिरताना
तिचं लक्ष वेधण्यासाठी वेगळं काही तरी करताना,
हसता बोलता हळूच चोरून तिला बघताना
तिची नजर जेव्हा तुझ्याकडे असताना
तिच्या नजरेला समोरासमोर भिडला होता का?

सांग कधी मित्रा मला
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

तिच्या त्या खळखळून हसण्यावर
मध्येच लाडीकवाणे रुसण्यावर,
तुला पाहून आनंदी तिच्या असण्यावर
तुम्हाला बघून इतरांच्या संशयी नजरेला,
धाडसाने तू त्यांना नडला होता का?

सांग कधी मित्रा मला
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

तुझी ती होऊ शकत नाही कळाल्यावर
तुझं प्रेमच तुझ्यापासून दूर पळाल्यावर,
संयमी तोल अचानक तुझा ढळल्यावर,
एकांतात तू रडला होता का?

सांग कधी मित्रा मला
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?
कुणाच्या प्रेमात तू पडला होता का?

- पराग काळुखे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.