तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, अनुभव कथन - [Tevatya Raaho Sada, Anubhav Kathan] आयुष्यातले काही अनुभव संस्मरणीयच असतात. त्यातलाच आजचा दिवस.
आयुष्यातले काही अनुभव संस्मरणीयच असतात. त्यातलाच आजचा दिवस
आयुष्यातले काही अनुभव संस्मरणीयच असतात. त्यातलाच आजचा दिवस! आज स्वाधार मतिमंद अनाथ मुलींच्या बालगृहाला सदिच्छा भेट दिली. वाढदिवसाला निरर्थक खर्च करण्यापेक्षा सामाजिक जाणिवेतून काहीतरी करावं असा विचार करणार्या आम्ही ४-५ जणांनी संकल्पना मांडली. बघता बघता २५ जण पुढे आले. प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावला. त्यातून या बालगृहाला आवश्यक काही साहित्य, कपडे, औषधं, खाऊ देऊ शकलो. वास्तविक मी यापूर्वी २ वेळा स्वाधारमध्ये गेले होते. तिथल्या कर्मचार्यांचा कायमच आग्रह असतो की,' तुम्ही हे सोशल मिडियावर शेअर करा. त्यामुळे मदतीचा ओघ वाढतो.' पण तसं कधी करणं झालं नाही. आज हे पोस्ट करण्याचा उद्देश असा की, हे २४ juniors आणि स्वाधारच्या कर्मचार्यांचं कौतुक आणि कृतज्ञता! बालगृहाच्या गरजा विचारात घेऊन नियोजनामुळे योग्य ती मदत करता आली याचं विशेष कौतुक.![]() |
मुलींनी स्वतः बनविलेला गुच्छ |
स्वाधार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी गावातील बालगृह. मराठवाड्यातील मतिमंद मुलीसाठी असणारं एकमेव बालगृह. इथे सध्या सर्व वयोगटातील मिळून अनाथ मतिमंद १०५ मुली आहेत. त्यांचं कायदेशीर आजन्म पालकत्व घेतलं गेलं आहे. त्यांचं पालन पोषण, संगोपन, निवास, गरजेपुरतं शिक्षण ही सर्व जबाबदारी संस्था घेते. संस्था प्रमुख श्री. चव्हाण सर केंद्र प्रकल्पप्रमुख श्री. तोडसरे सर आणि त्यांचा २६ सहकारी मिळून ही आव्हानात्मक जबाबदारी पेलत आहेत. आव्हानात्मक यासाठी की या ‘मुली’ आहेत , ‘अनाथ’ आहेत आणि ‘मतिमंद’ आहेत. त्यांचं नामकरण संस्थाच करते. केवळ first name वर त्यांचे आधार कार्ड बनवले जातात कोणत्याही जाती , धर्म , पंथाचं बंधन नसलेल्या अशा स्थितीतल्या मुली हे लोक सांभाळतात.नॉर्मल एक मूल सांभाळताना पालकांची तारांबळ उडते. यातील अनेकींना धड बोलता येत नाही. स्वतःचे दैनंदिन व्यवहार स्वतः करता येत नाहीत. कुणी आजारी असतं, कुणाला फिटस् येतात, कुणी अचानक हसतं, कुणी आकस्मिक रडतं-ओरडतं. त्यांना ‘सगळंच’ ‘शिकवावं’ लागतं. शिक्षण तर त्या नंतरचा भाग आहे. पण तरी इथे बरेच उपक्रमही राबवले जातात शेती, व्यावसायिक प्रशिक्षण क्रिडा स्पर्धा वगैरे. क्रिडा स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली आहेत. हे सगळं बघून आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते.
![]() |
मुलींनी बनविलेल्या सुबक गणपती मुर्ति |
मूळात आपल्या सारख्या ‘सामान्य’ लोकांनाही सगळ्या कला-विद्या यात गती नसतेच. आपणही एकप्रकारे गतीमंदच असतो! या मुली सुबक गणपती बनवतात, सुंदर राख्या बनतात, भाज्या पिकवतात, पणत्या रंगवतात, चित्र काढतात, वाद्य वाजवतात आणि गातातही.! हे सगळं बघून त्या सामान्य नाहीत तर असामान्य आहेत हे जाणवतं. इथल्या मुलींनी पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत. करंजाच्या बियांवर नक्षी लावलेल्या या राख्या नंतर नवीन झाड देणार आहेत.
![]() |
मुलींनी बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या |
आज भेट द्यायला गेल्यावर त्यांच्या नियमानुसार औपचारिक कार्यक्रम घेतला गेला. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्यांच्याच बागेतली दोन सुंदर गुलाबाची आणि दोन शेवंतीची फुलं पळसाच्या पानात गुंडाळून छानसा गुच्छ या मुलींनी तयार केला होता. आजवर मिळालेल्या कुठल्याही गुच्छ/फुलांपेक्षा तो कायम स्मरणात राहील. त्यानंतर मुलींनी एक गाणं सादर केलं - “सुंदर माझी शाळा गं.” अगदी सुरात गातात त्या. म्हणून मी गेल्या वेळेचं एक गाणं सादर करण्याची विनंती केली. वसंत बापटांची सुंदर कविता, ती तितकीच छान गायली.
गाण्याचे बोल होते -
आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा, गाव वेगळा नाही
माणूसकीचे अभंग नाते
आम्हीच आमचे भाग्यविधाते
पुढचं गाणंही काळजाला भिडणारं होतं आणि मग अर्थातच अश्रू अनावर झाले. अशी एक दोन नव्हे तर तब्बल दीडशे गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. काजल नावाच्या एका मुलीने ‘तवा मला दिसती माझी माय’ ही संपूर्ण कविता तालासुरात, जितेंद्र जोशींच्या व्हिडिओतील प्रस्तावनेसह म्हणली. माय म्हणजे काय हे न कळणार्या मुलीचं गाणं ऐकून अंगावर शहारे आले आणि डोळ्यात नकळत पाणी तरळलं.
![]() |
आयुष्यातला अनुभवसंपन्न संस्मरणीय दिवस |
सगळं वातावरण भारावणारं, सुन्न करणारं, घालमेल निर्माण करणारं, आत्मपरीक्षण करायला लावणारं होतं. हे असं कुणीतरी निखळ हसणं, निरागस टाळी देणं, अनाथानं आईवरची कविता सादर करणं, अतिशय उत्साहानं ‘हाय-बाय’ करणं, स्वतः बनवलेला गुच्छ देणं, हृदयस्पर्शी गीत गाणं, एका ‘विशेष’ मुलीनं दुसऱ्या ‘विशेष’ मुलीला जेवण भरवणं, स्वतःत रमणं हे सर्व विलक्षण होतं... ‘विशेष' होतं. असे अनुभव जगण्याला दिशा देतात. खरं पाहता, यातून आपण कुणासाठी काहीच करत नसतो, तर आपण ‘माणूस’ म्हणून स्वतःलाच घडवत असतो.. इतकंच!
अभिप्राय