उल्हास मित्र मंडळ गुरुवार पेठ पुणे - [Ulhas Mitra Mandal Guruwar Peth Pune] १९३५ साली स्थापना झालेल्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १९४४ साली रुपये चार चार आणे वर्गणी काढून या मूर्तीची निर्मिती केली असं सांगितलं जातं.
श्री शंकरराव भोसले निर्मित पुण्यातील लाकडी गणपतीची वैशिष्ट्ये आणि इतिहास
गणेशोत्सव हा पुण्यासह, राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात साजरा केला जाणारा लोकप्रिय उत्सव आहे.पुणे शहर आणि गणेशोत्सव यांच एक वेगळच नातं आहे; एक वैभवशाली इतिहास आहे. सन १८९२ साली सुरु झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज अखंडपणे सुरु आहे. पुणे शहरात आज हजारो सार्वजनिक गणेशमंडळ कार्यरत आहे.
प्रत्येक मंडळाला आणि त्या मंडळाच्या गणेश मूर्तीला एक वेगळा इतिहास एक वेगळी परंपरा आहे त्यात कसबा पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, गणेश पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, हिराबाग, डेक्कन, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि लक्ष्मी रोड येथील गणपतींचा विशेष उल्लेख करायला हवा. पुणे शहराच्या या मध्यवर्ती भागांतील अनेक मंडळांनी तर सार्वजनिक गणेशोत्सवाची ७५ ते १०० वर्षे पूर्ण केली आहेत.
खरं तर ‘गणपती’ हा देव म्हणून एकच. पण तरीही आपल्या सर्वांना ‘श्री’च्या प्रत्येक मूर्तीच एक वेगळंच आकर्षण असतं. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’ मंडळाची सुवर्ण अलंकारिक मूर्ती, ‘अखिल मंडई मंडळाची’ ‘शारदा’ आणि ‘गणेशाची’ मूर्ती, ‘गुरुजी तालीम’ मंडळाची ‘उंदरावर विराजमान झालेली मूर्ती’, ‘तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, ‘हत्ती गणपती मित्र मंडळ’, ‘दशभुजा गणपती मंडळ’, ‘भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’, ‘शार्दूल मित्र मंडळ’, ‘शाहू चौक मित्र मंडळ’ आणि गुरुवार पेठेतील उल्हास मित्र मंडळ अशा काही मंडळाच्या गणेश मूर्ती या सर्व गणेश भक्तांच्या नेहमीच आकर्षणाच्या विषय राहिल्या आहे. प्रत्येक कलाकाराने तितक्याच श्रद्धेने, मेहनतीने या ‘श्री’च्या मूर्तींची निर्मिती केलेली दिसते. प्रत्येक मूर्तीच एक स्वतःचं वैशिष्ट्य, सौंदर्य आणि थाट आहे.
![]() |
Samsons youth by Léon Bonnat |
अशाच या कलाकृती मध्ये ‘उल्हास मित्र मंडळ’ गुरुवार पेठ, या पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंडळाची ‘श्री’ची मूर्ती ही नेहमी अबाल वृद्धांच्या चर्चेच्या आणि आकर्षणाचा विषय ठरलेली आहे. १९३५ साली या मंडळाची स्थापना झाली; १९४४ साली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुपये ‘चार चार’ आणे वर्गणी काढून या मूर्तीची निर्मिती केली असं सांगितलं जातं. या मूर्तीचे मूर्तिकार ‘श्री शंकरराव भोसले’ या कलाकाराने १९४५ साली या मूर्तीची निर्मिती केली. विशेष बाब म्हणजे फ्रेंच चित्रकार ‘Léon Bonnat’ याच्या ‘Samson's youth’ या १८९१ साली केलेल्या पेंटींग चा आधार घेऊन १९४५ साली ‘श्री शंकर रावभोसले’ यांनी अथक प्रयत्नाने संपूर्ण लाकडी काम करून या मूर्तीची निर्मिती केलेली आहे.
![]() |
श्री शंकरराव भोसले निर्मित पुण्यातील लाकडी गणपती |
या कलाकृती मध्ये सिंह, हरणाचा बछडा, नाग आणि ‘श्री गणेश’ अशा ‘सिंह वधाचा’ प्रसंग कलाकाराने अतिशय कल्पकतेने सुबकरित्या मांडला आहे. मूर्तीची उंची ४ फुट आणि रुंदी ५ फूट आहे. भारतातील सर्वात पहिली ‘श्री’ ची सिहारुढ संपूर्ण लाकडी मूर्ती अशी या मूर्तीची ओळख आहे. गणेशोत्सवाच्या काळात पूर्ण १० दिवस ‘श्री’ च्या मूर्तीला विविध पोशाख परिधान केले जातात. या पोशाखामध्ये मूर्तीचं रूप अधिकच खुलतं हे वेगळंच.
मंडळाच्या कार्यकर्त्यांद्वारे पिढ्यान् पिढ्या श्रद्धेने, निष्ठने आणि अथक प्रयत्नाने गेली तब्बल ७२ वर्षे ‘श्री’ची मूर्ती दिमाखात सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षी स्थापन केली जाते.
अशा या सार्वजनिक गणेशोत्सवाचे उगम स्थान असणाऱ्या पुणे शहरातील कलेचा हा वारसा असाच अखंड पणे जोपासला जावा हिच श्रींच्या चरणी ईच्छा!
अभिप्राय