आवली माय - मराठी कविता

आवली माय, मराठी कविता - [Aavali Maay, Marathi Kavita] अगं अगं अवलीमाय, मागे राहिलीस का अशी.
आवली माय
अगं अगं अवलीमाय
मागे राहिलीस का अशी ?
घरात परब्रह्म असताना
मोक्षाची वाट टाळलीस कशी ?

आठव भांडाऱ्यावरचा नामाचा उत्सव
अन्‌ घरातला विठ्ठलाचा गजर
घेऊन जायचीस नित्य अन्नाची शिदोरी
तशीच जाऊन मागोमाग
बसायचं की तुकारामांच्या शेजारी

तशी अवलीमाय डबडबली
मातृत्व शक्ती तिच्यात संचारली
मग ती भराभरा शब्दांचा प्राजक्त
सांडून मोकळी झाली

म्हणाली...
नऊ महिने गर्भात जोडलेली नाळ
अचानक तोडू अशी
परिस्थितीच्या लाटेत होरपळतील ना बाळ
भुकेच्या खाईत लोटू कशी ?

तुकारामांच्या मागे जाऊन
मिळवला ही असता मोक्ष
पण आईची वाट बघत
थंडीत उघडी पडतील लेकरं

अन्‌ संकटात
भेदरून जातील ना माझी कोकरं
बाळ नजरेसमोर दिसली
अ‍न्‌ माझ्यातली आई जागी झाली

मी म्हटलं
अगं माय
मोक्ष अन्‌ परब्रह्म ही तू नाकारलं
खडतर आयुष्यात ही देवत्व
नाही घेतलं

परत एकवार
सिध्द झालं
परब्रह्म ही थिटं पडलं
मातृत्वापुढं

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.