
उसळलेल्या जनसमूहाने तेलांच्या देशात कुठंतरी मुसंडीही मारली
सीमेवरचा गोळीबार आतातर नेहमीचाच झालाय
आणि हाय-अलर्टच्या सूचना दिनक्रमच झालाय
असमाधान्यांचा गट असंतोष पाखडतोय
समृद्धीच्या देशात आता वादंग पेटलाय
बॉम्ब आणि बंदूक तर रोजच्याच झालाय
आणि ब्रेकिंग न्यूजचा वणवा आता जागोजागी पेटलाय
जावखेड्याचं दुःख नुकतच विझतंय
अन् धर्मांध्यांच रण कुठंतरी अचानक पेटलय
राजकारणाचा डोंब त्या आगीतच उसळलांय
आणि पोरा-बाळांच्या छातीत भविष्याचा ठोका चुकलांय
दिवसाच्या थंडीनं अंकुर किती गोंडस फुटला
पण रात्रीच्या पावसानं तसाच वाहूनही गेला
लटपट झालेला भूमीहीन अन् भूमीधारक
संसाराच्या दुःखापायी आभाळालाही लटकला
बातम्यांमध्ये किती पोरकेपणा जाणवतोय
फ्रंट पेज सारं विरह अन् दुःखानं भरलंय
अस्तित्वाच्या लढाईत प्रेमच पोरकं होतंय
आणि आज अगदी पोरकं झाल्यासारखं वाटतंय