पुर्वी गावांमध्ये नाटक हेच मनोरंजनाचे एकमेव माध्यम होते, अशाच एका कंटाळवाण्या नाटकामुळे मधुनच उठुन घराकडे निघालेल्या बाबा कोळेकराची गाठ मानकाप्याशी पडली. त्यात तो वाचतो का? नक्की काय घडते? याचे भयचकित करणारे वर्णन म्हणजेच मानकाप्या.
नाटक सुटल्यावर मध्यरात्री साडे बारा वाजता परत येत असताना पऱ्यातुन (पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी बनवलेला मोठा उघडा टनल) कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकुन सावध झालेल्या बंड्या पवार आणि त्याच्या मित्रांनी घाबरत पऱ्यात वाकून बघीतले. अंधारात कोणी व्यक्ति उपडी पडून त्यांच्याकडे आपला हात पुढे करत असताना त्यांना दिसली. कंदीलाच्या प्रकाशात डोक्याला मार लागून अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या बाबा कोळेकराला पाहुन बंड्या पवाराच्या पाठीतुन थंड शिरशिरी गेल्याचे त्याला जाणवले. लगेच सगळ्यांनी पऱ्यात उड्या टाकुन बाबा कोळेकराला अलगद उचलुन त्याच्या घरी आणले. आपल्या पोराची ती अवस्था पाहुन बाबा कोळेकराच्या माऊलीने टाहो फोडला. भीतीने बोबडी वळलेल्या आणि पांढर्या फटक पडलेल्या बाबा कोळेकराच्या डोळ्यांकडे पाहताना सर्वांच्या उरात धडकी भरली होती आणि त्याची ही अवस्था कशी झाली या विचाराने सर्वांचेच चेहरे काळवंडले होते. बाबाला सणकुन ताप भरला होता. आठवडाभर औषध-पाणी आणि सेवा सुश्रुषा केल्यावर बाबा जरा सावरला. त्याच्या बाबतीत काय घडले हे जाणुन घेण्यासाठी पुर्ण आळी जमा झाली होती.त्या रात्री काय झाले ते बाबाच्या शब्दात...
नाटक फारच रटाळ वाटल्यामुळे बंड्याला आणि इतर मित्रांना सांगुन मी अर्ध्यावरच नाटक सोडून घरी निघालो. काळोख्या रात्रीत कंदीलाच्या प्रकाशात मी एकटाच घराच्या दिशेने झप झप पावले टाकीत वेगाने चालत होतो. आमराईपाशी कशाला तरी अडकुन मी धाडकन खाली पडलो. हातातील कंदील दूर फेकला गेला आणि विझला. झाडाचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो, सगळे अंग सडकुन निघाले होते. अंधारात कंदीलही कुठे दिसेना मग तसाच ठेचकाळत, चाचपडत मी घराच्या दिशेने जाऊ लागलो. रातकिड्यांची किरकीर, घुबडाचे घुत्कार ऐकुन भिती वाटू लागली होती. झक् मारली आणि एकटा निघालो असे वाटू लागले. राम नामाचा जप करत कसाबसा पऱ्यापाशी येवून पोहोचलो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. पालापाचोळा गोल घुमत वर जाऊ लागला. मला काहीतरी विचित्र आहे असे जाणवु लागले वार्याचा जोर एवढा वाढला की मी त्याच्या बरोबर उडून जातो की काय असे वाटू लागले. इतक्यात ‘तुला आता सोडणार नाही,' असे बोबडे शब्द माझ्या कानात शिरले. माझी भीतीने गाळण उडाली. आता आपण काही वाचत नाही असे वाटून मी स्वतःला पऱ्यात झोकून दिले. माझ्या मानेला कोणाच्या तरी बोटांचा स्पर्श ओझरताच पण अगदी स्पष्ट जाणवला आणि मी पऱ्यातील कोरडया पात्रात दाणकन आपटलो आणि बेशुद्ध झालो. शुद्ध हरपताना ते बोबडे शब्द परत ऐकू आले, ‘वाचलास तु’!
सगळे जण श्वास रोखुन बाबाची कहाणी ऐकत होते. एकदम शांतता पसरली होती. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग जुन्या जाणकार मंडळींपैकी नानु गुरव बाबाला म्हणाले, ‘पोरा त्या रात्री अमावस्या होती आणि तुझ्या आई वडिलांची पुण्याई व तुझी वेळ चांगली म्हणुन तु वाचलास. तुला ज्याने त्या रात्री धरायचा प्रयत्न केला तो मानकाप्या होता. तुझ्या मानेला जो बोटांचा स्पर्श झाल्यासारखा तुला वाटला तो त्या मानकाप्याच्याच् बोटांचा होता. मानकाप्याला मान नसते आणि तो आपले दोन्ही हात वेगाने कात्री सारखे फिरवत जातो आणि त्याच्या हातात ज्याची मान सापडते ती कापली जाते.’ एका क्षणात बाबाच्या डोळ्यासमोरून झालेला प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा तरळुन गेला आणि त्याच्या शरीरावर काटा उभा राहिला. एका मोठ्या संकटातुन वाचल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आणि रात्री अपरात्री पुन्हा एकटे न फिरण्याची शपथ घेतली.