खोटं खोटं हसतो - मराठी कविता

खोटं खोटं हसतो, मराठी कविता - [Khota Khota Hasato, Marathi Kavita] प्रत्येकाच्या काळजात, प्रत्येकाचा घाव, आहे कोण सुखी, दुःखाचाच जमाव.

प्रत्येकाच्या काळजात, प्रत्येकाचा घाव, आहे कोण सुखी, दुःखाचाच जमाव

प्रत्येकाच्या काळजात
प्रत्येकाचा घाव
आहे कोण सुखी
दुःखाचाच जमाव
वळण थोडे वेडे
अन्‌ वाकडी इथली वाट
कोणाची ना पर्वा
आपल्याच कौतुकाचा घाट

आपला कोण कधी
जाऊन दुसर्‍याला मिळेल
माणसांची घालता सांगड
आहे कोणाचा मेळ
खेळगडी आपण सारे
तो तिकडून खेळतो खेळ
कोण सावरेल कोणाला
नाही रडायलाही वेळ

कष्ट कोण करतो
कोण मारतो मोठ्या बाता
करतो तो एकटा
मागे टोमणा येता जाता
झाकून ठेवतो आतल्या आत
जुन्या अश्रूंचा त्रास
वेळ कुठे मांडायला
रोजच्याच दुःखाची आरास

दिवस कुट्ट काळा
कधी सरूनिया जाईल
स्वप्नातला उषःकाल
कधी माझ्यासाठी होईल
रडता रडता हसणे
अता विसरूनच जाईल

तरी रोज नव्या दिवसाची
मी वाट बघत असतो
आव्हानाच्या बिमोडाला
सावध होऊन बसतो
दुःख माझं आत
वर खोटं खोटं हसतो

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.