माणूस - मराठी कविता

माणूस, मराठी कविता - [Maanus, Marathi Kavita] माणूस म्हणून जन्मलेला माणूस, माणसासाठी जगत असतो.

माणूस म्हणून जन्मलेला माणूस, माणसासाठी जगत असतो

माणूस म्हणून जन्मलेला माणूस
माणसासाठी जगत असतो
आपल्या सिमित आयुष्याला
नवे अर्थ लावत असतो

मनातल्या लहरींवर स्वार होऊन
माणसांच्या समुद्रात पोहत असतो
एखाद्या मोठ्या लाटे खाली
चिंब चिंब भिजत असतो

किनार्‍यावर असतांना तो
त्याच लाटेची वाट पहातो
इतर लहान लहरी आल्या
तरी तिथेच बसून टिपं गाळतो

रागावलेल्या माणसालाही
सागराकडेच जावं लागतं
दुसर्‍या माणसांच्या लहरींनाही
आपल्या कवेत घ्यावं लागतं

माणसाचा हात धरून
चालणारा माणूस मी
हरवलेल्या लाटेला
शिधणारा माणूस मी

खडकावर आदळूनही
खिदळणारा माणूस मी
बर्फासारखा थंड तरी
पिघळणारा माणूस मी

क्षितिजावरील आकाशांकडे
पोहणारा माणूस मी
रोज मावळत्या सूर्यासंगे
उगवणारा माणूस मी


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.