जरी मी संपलो इथे, प्रवास संपणार नाही
जरी मी संपलो इथेप्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही
अगणित आकांशा
क्षणात संपत नसतात
पेटतात मंद चांदण्यांसारख्या
पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या
मावळतील दिवे
अंधार पसरेल चहुबाजू
सायंकाळ येईल
काळे वस्त्रे परिधान करून
त्याच क्षणी
सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी
त्याची आग विझणार नाही
विझलेली मशाल
पुन्हा पेटवतील
असंतोषाचे हात
होईल सुरु
एक नवा प्रवास
तीच वाट धरून
पोहोचेल तो
परिवर्तनाच्या क्षितिजावर
तोपर्यंत त्याची पापणी
तुफानातही लवणार नाही