वर्धनगड किल्ला - [Vardhangad Fort] १५०० फूट उंचीचा वर्धनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण डोंगररांगेतील वर्धनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
वर्धनगड किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे
वर्धनगड किल्ला - [Vardhangad Fort] १५०० फूट उंचीचा वर्धनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण डोंगररांगेतील वर्धनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. हा किल्ला साताराच्या महादेव डोंगर रांगेवरील भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याचा सीमेवर कोरगावच्या ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर बांधलेला आहे.किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.
वर्धनगड किल्ल्याचा इतिहास
सन ५ मे १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्याकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की, “बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील.” औरंगजेबाने मंजुरी दिली दि. ८ जून ला फत्तेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. त्यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती.
आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होते. म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते. त्यांनी आपल्या बायकामुलांना किल्ल्यात नेले. नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फत्तेउल्लाखानाजवळ पाठवला. त्याने याला सांगितले की “किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे.” फत्तेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली.
फत्तेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फत्तेउल्लाखान किल्लेदार आज येईल, उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फत्तेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले.मोगलांनी मराठ्यांच्या चाळीस लोकांना कैद केले. मग मोगलांनी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जून रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.
वर्धनगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
वर्धनगडाचे प्रवेशद्वार हे पूर्वभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थिति उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते तर ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसऱ्या टोकाशी ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या आहेत.
या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणाऱ्या मंदिरपर्यंत पोहचण्यासाठी १५ मिनिटे पुरतात टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे. मंदिर जीर्णोद्धारीत असल्यामुळे सध्या रंगरंगोटी केल्यामुळे आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभाऱ्यातून सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरते. या वाटेने खाली उतरताना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात. संपूर्ण गड फिरण्यास एक तास पुरतो.
वर्धनगड गडावर जाण्याच्या वाटा
किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण किंवा सातारा या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत. वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसते. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत.
फलटणमार्गे: फलटणमार्गे वर्धनगड गावात दोन मार्गांनी पोहचता येते. फलटण-मोळघाट- पुसेगाव गाठावे. यामार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४१ कि.मी. वर आहे. फलटण-दहिवडी मार्गेपुसेगाव गाठावे यामार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४५ कि.मी. वर आहे.पुसेगावा पासून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५ कि.मी. अंतरावर वर्धनगड गाव फाटा आहे. वर्धनगडगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. फलटण ते पुसेगाव अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे.
सातारामार्गे: सातारा-पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या अलिकडे ५ कि.मी. वर वर्धनगड गावाचा फाटा आहे. सातारा पुसेगाव अशी एस.टी सेवा उपलब्ध आहे.
गडावरील वर्धनीमातेचे मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपणच करावी. बारमाही पिण्याची सोय आहे. गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.