वैराटगड किल्ला

वैराटगड किल्ला - [Vairatgad Fort] ३३४० फूट उंचीचा वैराटगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील वैराटगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
वैराटगड किल्ला - Vairatgad Fort

वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला

वैराटगड किल्ला - [Vairatgad Fort] ३३४० फूट उंचीचा वैराटगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील वैराटगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. वैराटगड हा गड वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो पायथ्याच्या गावापर्यंत जाणाऱ्या बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे.

वैराटगड किल्ल्याचा इतिहास


वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले . पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

वैराटगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


गडमाथा फारच लहान आहे. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणतः २० ते २५ पायऱ्या चढून आपण गडावर पोहचतो. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे. तिची रुंदी साधारण १० फूट आहे.

गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे ह्यातून म्हसव गावाकडे उतरता येते. त्याच्या जवळच एक उंचवटा आहे. तेथे दगडावर अस्पष्ट असे लिखाण आहे. गडाच्या आजुबाजूला अनेक अवशेष इतस्ततः पसरलेले आढळतात. थोडे शोधकार्य केल्यास आणखी काहीतरी सापडू शकेल. गड फिरण्यास १ तास लागतो.

वैराटगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यासाठी व्याजवाडीला पोहचावे. वाई सातारा मार्गावर ४ कि.मी. वर कडेगाव पूल येथे उतरावे. येथून व्याजवाडी या गावात यावे. गावातून गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. एक वाट चांगली मळलेली आहे. मात्र ही जरा फिरून जाते. तर दुसरी वाट डाव्या बाजूस नाकाडावरून जाते. साधारणतः या वाटेने १/२ तास गड गाठण्यास लागतो. तर पहिल्या वाटेने १ तास लागतो.

पुढे दोन्ही वाटा एकत्र मिळतात आणि १० मिनिटे गडमाथा गाठण्यास लागतो. शेवटच्या टप्प्यावरची वाट प्रचंड निसरडी आहे. व्याजवाडीच्या विरुद्ध बाजूस ‘म्हसव’ नावाचे गाव आहे. या गावातून सुद्धा एक वाट आहे. मात्र ही वाट खूप निसरडी आहे.

गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते. गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. त्यांच्याकडे २-४ जणांची जेवणाची सोय होते. जास्त लोक असतील तर जेवणाची सोय आपणच करावी. बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पिण्याच्या टाकी आहेत. गडावर जाण्यासाठी एक ते दीड तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.