त्रिंगलवाडी किल्ला - [Tringalwadi Fort] ३२३८ फूट उंचीचा त्रिंगलवाडी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी
त्रिंगलवाडी किल्ला - [Tringalwadi Fort] ३२३८ फूट उंचीचा त्रिंगलवाडी किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे.याच रांगेत त्रिंगलवाडी बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. या मार्गात लागणारी गावं, डोंगरमाथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
त्रिंगलवाडी किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे. या लेणी ३ भागात आहेत. ओसरी, आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतमबुद्धाची ध्यानस्थ मुर्ती आहे. त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे. विहाराच्या ४ खांबापैकी ३ खांबाची पडझड झाली आहे. येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या अगोदर गुहा लागते.
पायऱ्यांनी गडावर पोहचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. वाड्यांचे अवशेष पाहून परत पायऱ्याकडे वळायचे. पायऱ्यांपासून उजवीकडे वळल्यावर अनेक सुकलेली पाण्याची टाकी. आढळतात. ५-१० मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी गुहा आहे. या गुहेत २०-२५ जणांना राहता येते. येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरासमोर कड्यावरून दक्षिणेस तळेगड,
इगतपुरी पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो. आल्या मार्गाने परत पायऱ्यांपाशी यावे. पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहे. ते मागे टाकून सरळ पुढे वाटेने खाली उतरावे आणि उजवीकडे वळावे. ही वाट गडाच्या गुप्त दरवाजापाशी घेऊन जाते. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहचतो. दरवाजाच्या उजवीकडे ६-७ फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण १ तास पुरतो.
त्रिंगलवाडी गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
चिंचोली मार्गे: या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा गाठावे. कसाऱ्यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा यापैकी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि ‘विहीगाव’ फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्यामागून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या पठारावर पोहचावे. येथून क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जंगलावर जातात. कोणत्याही वाटेने दगडावर पोहचावे. ही वाट फारच लांबची असल्याने याने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.
त्रिंगलवाडी मार्गे: गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे. इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एस.टी. स्टँडच्या बाजूला बाहेर पडायचे. एस.टी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी-घोटी-त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंता संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. यावाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे. या गुहेच्यावरून गडावर जाण्यास रस्ता आहे.
विपश्यना विद्यापीठामार्गे: इगतपुरी स्थानकावरून उत्तर दिशेला म्हणजेच ‘विपश्यना विद्यापीठा’कडे उतरावे. विद्यापीठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गामध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा सांगितलेल्या क्र.१ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढल्यावर किल्ल्याचा दरवाजा लागतो.
किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी १ तास त्रिंगलवाडी गावापासून, ३ तास चिंचोली गावापासून व २ तास विपश्यना मार्गे लागतात.
सूचना
चिंचोली गावातून जाणारी वाट - मध्यम, निसरडी.
अभिप्राय