तळगड किल्ला

तळगड किल्ला - [Talgad Fort] १००० फूट उंचीचा तळगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील तळगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
तळगड किल्ला - Talgad Fort

रोह्याच्या आजुबाजूच्या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत, त्यापैकी तळगड हा एक किल्ला

तळगड किल्ला - [Talgad Fort] १००० फूट उंचीचा तळगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील तळगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. रोह्याच्या आजुबाजूला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत, त्यापैकी तळगड हा एक किल्ला.

तळगड किल्ल्याचा इतिहास


रोह्यापासून समुद्र अगदी जवळच आहे. कुंडलिका नदी जिथे सागराला मिळते तो सर्व भाग पूर्वी सागरी वाहतुकीसाठी वापरला जात असे. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी एक म्हणजे तळगडशिवरायांनी या सर्व परिसराचे महत्त्व जाणले होते म्हणूनच तळगड आणि घोसाळगड हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. पुढे राजा जयसिंगाशी झालेल्या पुरंधर किल्ल्याच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपणास समजते. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

तळगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ला तसा लहानच त्यामुळे याचा घेरपण मोचकाच, किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी अजूनही शाबूत आहे. अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितीत आढळतात. किल्ल्यात शिरताना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. गड हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे.

दरवाजातून आत गेल्यावर थोड्याच अंतरावर पाण्याची खोदलेली सात टाकी आढळतात. पुढे दक्षिणेकडे चालत गेल्यावर बुरुज आहे. अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. गडाचा वापर हे टेहळणी व्यतिरिक्त इतर फारसा होत नसल्याने फारशी शिबंदी गडावर नसावी. किल्ल्यावर घोसाळगड, महाड, रोह्याच खाडी असा सर्व परिसर दिसतो. गडाचा घेर आटोपशीर असल्याने अर्ध्या तासात किल्ला फिरुन होतो.

तळगड गडावर जाण्याच्या वाटा


किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट ही तळगावातूनच वर जाते. तळागावापर्यंत जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे. या वाटेने गडावर जाताना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते. दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.

इंदापूरमार्गे: मुंबई-गोवा महामार्गावरून महाडच्या अलिकडे इंदापूर गावाच्या नजीकच तळागावाकडे जाण्यासाठी फाटा फुटतो येथून तळगावात जाण्यास ४५ मिनिटे लागतात.

रोहामार्गे: रोह्यापासून मुरुडकडे जातांना तांबडी नावाचे गाव लागते. येथून तळगावाकडे जाण्यास एक गाडीरस्ता आहे.

मांडारलेणी मार्गे: रोहा-मुरुड मार्गावर रोह्यापासून १५ कि.मी अंतरावर खाजणी फाटा आहे. या फाट्यापासून ५ कि.मी. अंतरावर कुडा गाव आहे. या कुड्यापासून १२ कि.मी. अंतरावर तळगाव आहे.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र तळागावात राहण्याची सोय होते. तळागावात हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. गडावर बारमाही पिण्याच्या पाण्याचे तळे आहेत. गडावर जाण्यासाठी तळागावातून अर्धातास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.