पेठ किल्ला

पेठ किल्ला - [Peth Fort] पेठ किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील पेठ किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
पेठ किल्ला - Peth Fort

पेठ किल्ल्याला पायथ्याच्या ‘पेठ’ या गावामुळे ‘पेठचा किल्ला’ असे संबोधले जाते

पेठ किल्ला - [Peth Fort] पेठ किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील पेठ किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ कि.मी. अंतरावर आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्यांच्या आणि सिद्धगड भीमाशंकराच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा उभारून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

या किल्ल्याला पायथ्याच्या ‘पेठ’ या गावामुळे ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळा असाही आढळतो. लहानशा दिसणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयांची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मोघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही पण बेलाग सुळक्यावरचा एक संरक्षक ठाण होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले.

पेठ किल्ल्याचा इतिहास


औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलिबिरारकानी यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ‘कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल. त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणाऱ्या लोकांना आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदुकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्यांना मागे हटकले पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा’ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत. म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले. मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले.

झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. फार मोठी लढाई झाली. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतील कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. बाणांची व बंदुकीची लढाई झाली. किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदाअ नारोजी त्रिंबक यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली. नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीथी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला.

इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले. किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडॆ पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचाअसा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह’ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंडफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळविण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणाऱ्या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले.

नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले बरेच रक्त सांडले पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.

पेठ किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर समोरच कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत ४-५ ठिकाणी मोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.

गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरील मंद वारा, तेथील जलाशय आणि आजुबाजूची वनराई सुखावह आहे. गडमाथ्यावरून भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमंलग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगडा, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.

पेठ गडावर जाण्याच्या वाटा


कर्जतहून एस.टी. ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधरण ३० कि.मी. आहे. नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस.टी. पकडून आंबिवली गावात यावे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ’ हे गाव आहे. या गावाहून वर गडावर चढण्यास मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदाची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशद्वारशी घेऊन जाते.

भैरोबाच्या गुहेत २०-२५ जण व्यस्थित राहू शकतात. जेवणाची सोय आपणच करावी. पेठ गावात ‘कोथळागड’ नावाचे हॉटेल आहे. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. गडावर जाण्यासाठी आंबिवली गावापासून २ तास, पेठ गावापासून १ तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.