सांजवात - मराठी कविता

सांजवात, मराठी कविता - [Sanjvaat, Marathi Kavita] त्याचे आग ओकणारे, डोळे बघतच, तिनं देवापुढं, सांजवात लावली.

त्याचे आग ओकणारे, डोळे बघतच, तिनं देवापुढं, सांजवात लावली

त्याचे आग ओकणारे
डोळे बघतच
तिनं देवापुढं
सांजवात लावली
सांजवातीकडं बघत
त्यानं शब्दाची लाखोली
सुरू केली
कानावर हात ठेवत
तिनं मुलांना बोलावलं,
शुभंकरोति म्हणायला
मुलांच्या आवाजात
तिनंही आवाज मिसळला
शुभंकरोतिचा
त्या आवाजात
त्याचे शब्द विरून गेले.
भगभगणारे डोळ्यांचे दिवे मिटत
तो बाहेर गेला
तिच्या डोळ्यांची निरांजन
शांतपणे तेवत होती
मुलांच्याकडं बघत
तीच झाली
सांजवात


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.