कापूरआरती - मराठी कविता

कापूरआरती, मराठी कविता - [Kapuraarti, Marathi Kavita] देह झाला कापूरारती, क्षणसुगंधी निघून गेले, आठवणींचे कृष्ण व्रण, मनी मानसी दिसू लागले.

देह झाला कापूरारती, क्षणसुगंधी निघून गेले, आठवणींचे कृष्ण व्रण, मनी मानसी दिसू लागले

देह झाला कापूरारती
क्षणसुगंधी निघून गेले
आठवणींचे कृष्ण व्रण
मनी मानसी दिसू लागले!
स्फटिकासम शुभ्र रंग तो
बालपणीचा ठेवा ठरला
तारुण्याचे रंग रंगिला
कापूरवासामध्ये मिसळले
उग्र भेदक तरी हवेसे
श्वासामध्ये लपून राहिले
चैतन्याला कवटाळीत ते
आठवणींच्या कुपीत बसले
आयुष्याच्या सारीपटावर
सारे गंध उडून गेले
आठवण कसली, श्वास कसले
मनामनाला फसवीत गेले
जळून गेल्या भावभावना
डोळ्यांमधल्या ज्योती विझल्या
देह झाला कापूरारती
क्षण सुगंधी विरून गेले!


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.