अननसाचा हलवा - पाककृती

अननसाचा हलवा, पाककला - [Pineapple Halwa, Recipe] अननसाचे तुकडे, खवा आणि क्रीम घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे ‘अननसाचा हलवा’ पुडींग म्हणून जेवणात तसेच पार्टीत खाता येईल.
अननसाचा हलवा - पाककला | Pineapple Halwa - Recipe

सर्वांना आवडेल असा गोड पदार्थ व पार्टीतले पुडींग म्हणजे अननसाचा हलवा

‘अननसाचा हलवा’साठी लागणारा जिन्नस

 • १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे
 • २५० ग्रॅम खवा
 • एक - दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम
 • ५०० ग्रॅम साखर
 • ४ मोठे चमचे तूप
 • पाव चमचा केशर (ऐच्छिक)
 • १ वाटी पाणी
 • २-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप

‘अननसाचा हलवा’ची पाककृती

 • साखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा.
 • पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे.
 • मंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे.
 • गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. (उन्हाळ्यात केशर वापरू नये, उष्ण पडते.)
 • अननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते. केशर घालायचे असल्यास त्यात घालावे.
 • दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे.
 • खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे.
 • ३ - ४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व कोमट होऊ द्यावे.
 • पुडिंग बाऊलमधे अननसाचा हलवा घालून त्यावर साय व काजू-बदामाचे काप घालावे.
पार्टीसाठी करायचा असल्यास साय किंवा क्रीम‍ऐवजी व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती व स्वादसंगती साधणारे आईस्क्रीम द्यावे.

हा हलवा दोनतीन दिवस अगोदर करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला व रसाळ हवा. डब्यातला घेऊ नये.

हे पुडिंग मोठ्या पार्ट्यात करायलाही हरकत नाही.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.