लाटाच लाटा, आणि समुद्र टिंगल करतोय, येडझव्या प्रवाशांची
लाटाच लाटाआणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्या भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.
नऊ रुपये पंच्याहत्तर पैशाचं तिकीट फाडून
गांडूपणाचं पाणी शिंपडतेय लॉंच
सर्व प्रवाशांवर
माझ्या समोरची सेक्सी बाई
नवऱ्याला नवरा समजून शेवटचं
रडतेय भर समुद्रात
तिच्या छातीमुळे कुणाचचं लक्ष नाही
भल्या भल्या तरुणाचं देखील.
एक लाट येते आणि
मनातल्या आकाशात भिकारचोट दिसतो
मनातला चंद्र अखेरच्या पर्वातला.
शेजारच्या मित्राने घट्ट घट्ट धरलाय.
त्याच्या शेजारच्या मित्राचा हात.
‘देखा है हमने सोचा है’ गाणं गाऊन
कोमेजली आहेत नाचणारी मुले लाटांवर
सर्वाचीच टरकलीय.
तरी एक पत्रकार मित्र म्हणाला,
किनाऱ्यावर पोहचलोच तर बिअर पाजीन तुला
माझ्या खर्चाने
दुसरा कवी मित्र म्हणाला,
ईश्वर साक्ष! कवितेच्या बदल्यात मी जगणं पसंत करीन
तिसरा संपादक मित्र म्हणाला,
च्यायला! मला उद्या कामाला जाणं जरूरीचं आहे
सर्वांचीच टरकलीय आतून
नांगर टाकून प्रवासी बसले आहेत
रविवारच्या पुरवणीवर.
लाटाच लाटा! आणि समुद्र टिंगल करतोय पुन्हा पुन्हा
गोठून चाललेल्या प्रवाशांची.
आता एकतर रात्रीचा सूर्य उगवायला हवा
नाहीतर समुद्र गोठून जायला हवा, तडकाफडाकी.
कवींचं काय?
गांडूपणाचं पाणी नाकातोंडात गेलं तरी
कवी लागतीलच कवितेच्या किनाऱ्यावर - फुगून फुगून मेल्यानंतर