तो समोर डोंगर दिसतो आहे दूरवर, त्याचा कोसळतोय कडा
तो समोर डोंगर दिसतो आहे दूरवरत्याचा कोसळतोय कडा
तो तर कधीचाच दिसतो आहे
मी वेगळं असं काय पाहिलं
गळ्यातल्या कॅमेर्यानेही मला डोंगरच दिसतो
ईश्वर का नाही?
मी तरी असा नवस फेडल्यासारखा
का पुरा करत असतो
माझ्या पश्चातापाचा प्रवास
कन्फेशन देऊन मोकळं व्हावं तर
माझ्या बरोबर मीच असतो अहोरात्र
माझ्या सोबत
प्रवासात कितीतरी प्रश्न जिव्हाळ्याचे
किती तहानलेले मेल्यावर वाटेत एक विहीर
बांधतात?
देवळावरचा झेंडा वारा नसताना
का फडफडत नाही?
दारू प्यायल्याशिवाय नशा येत नाही
इतकी माझी संवेदना हरामी का असते?
माझ्या सोबत असणारे हे जिव्हाळ्याचे प्रश्न
दमल्यावर पण चालत जाण्यात
किती खोटारडेपणा आहे या
शाश्वत उत्तरापाशी ठेचकाळातात
प्रश्न कन्फेशनच्या थडग्यावरचा पुटं चढलेला
मजकूर मी चिवडत बसतो
समज आल्यानंतर लिहिलेल्या कवितेसारखा