तुमच्याच आणि माझ्यात, फरक इतकाच की, तुमच्या दिशेने फणा काढून, एक भीती उभी आहे
तुमच्याच आणि माझ्यातफरक इतकाच की,
तुमच्या दिशेने फणा काढून
एक भीती उभी आहे
आणि माझ्या दिशेने
फक्त तिची सावली
तुम्ही दचकता
लहानपणी अंगणात लावलेल्या
झाडाच्या अवेळी सावलीला
आणि
आमरस्त्यावरून चालताना
अंगावर येणाऱ्या
ऋतूहीन पावसाला
माझं असं नाही
तशी एक भीती सरपटत येतेय
माझ्या दिशेनेही
तरी मी तुमच्यात सामील होणे
कठीण वाटते मला
सरपटत येणाऱ्या भीतीचा जलाल दंश
तेवढा माझ्या रक्तात भिनण्यापूर्वी
हातातल्या ब्रशनं एवढं चित्र
पुरं करू द्या
चित्रात तुम्ही असाल उजेडाचे शुभ्र राजपुत्र
आणि मी कवितेतून उडालेल्या पाखरांच्या
पंखाखालचा मिट्ट मिट्ट काळोख
मग ती ही वही बंद करून
दिवसांच्या रहदारीत बिनघोर सामील होईन