शून्य नजरेने रोखून पाहतोय, झिरोचा बल्ब
शून्य नजरेने रोखून पाहतोयझिरोचा बल्ब
झिरो नजरेने न्याहाळतोय
शून्याचा बल्ब मला
चिठ्ठी लिहायचीय मला जिच्या नावाने
तिला तर वाचताही येत नाही
रात्रीचे खूप काही वाजले आहेत म्हणून
ती टिकटिकत आहे, झोपेत, घड्याळासारखी
‘उद्यापासून एकटी खेळ’ एवढं मुलीच्या
हसऱ्या चेहऱ्याशी बोलून
मी लिहायला बसलोय आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी
दहा वाजल्यापासून आत्महत्येचा उंदीर धावतोय शरीरभर
तो थांबेल तेव्हा संपून जाईल कुरतडणं
शेवटचा भाऊ पाध्ये वाचला धर्मग्रंथासारखा
हमसून हमसून रडायचे टाळले
श्वास कोंडला छाती फुटली
हे सालं, मरण येतच नाही, बेडरूमच्या बाहेर
बायकू लग्नापासून नुसतीच धमकी देतेय आत्महत्येची
मी खरी करून दाखवतोय तिची धमकी
त्यासाठी आईचे आशिर्वाद आहेत माझ्या पाठीशी
स्तनातल्या दुधासारखे
उद्याच्या कवितेच्या अपॉईंटमेंट्स कशाला
आठवतात आता या जिव्हाळ्याच्या वेळी?
घर सोडून जाणं ही आत्महत्येचीच
रिहर्सल होती? विचारतात रस्ते
पळपुटेपणाची जखम पिकेल तेव्हा करू आत्महत्या
चिठ्ठीबिठ्ठी झूठ हे हे रस्यांना सांगून काय उपयोग?
थडथडणाऱ्या मेंदूच्या लगद्याचा होऊ दे कागद
मगच लिहिता येईल निवांतपणे शेवटची चिठ्ठी
एवढेच आत्मभान ह्या नजर सटकलेल्या झिरो प्रकाशात