Loading ...
/* Dont copy */

जीवनात हरवत चाललेली माणुसकी (चैताली गिते)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका श्रीमती चैताली गिते यांचा जीवनात हरवत चाललेली माणुसकी हा मराठी लेख.

जीवनात हरवत चाललेली माणुसकी (चैताली गिते)

आधुनिक जीवनाच्या धावपळीत संवेदनाहीन होत चाललेल्या समाजाचे चिंतन करणारा हा विचारप्रवर्तक लेख आहे...

जीवनात हरवत चाललेली माणुसकी

चैताली गिते (नाशिक, महाराष्ट्र)

या लेखात काय वाचाल
  • आजचा माणूस प्रगतीच्या शर्यतीत स्वतःला हरवत आहे.
  • सुविधा वाढल्या, पण संवेदना कमी झाल्या आहेत.
  • तंत्रज्ञानाने अंतर कमी केले, पण मने दूर गेली.
  • माणुसकी हरवलेली नसून ती आपणच दुर्लक्षित केली आहे.

माणूस जन्माला येतो तेव्हा तो फक्त एकटा नसतो, तर एक संवेदना असतो, एक शक्यता असतो. पण जसा मोठा होत जातो तसे त्याचे जगणे ‘होणे’ न राहता ‘मिळविणे’ बनत जाते आणि इथेच माणुसकीची पहिली पायरी ठरते. कारण माणूस असणे आणि माणूस होणे यात फरक असतो. आजचा आधुनिक काळ वेगाचा आहे; वेगात विचार मागे पडतो, संवेदना बोथट होत जातात. माणूस इतका स्वतःमध्ये गुंतला आहे की दुसऱ्याचे अस्तित्व त्याला अडथळा वाटू लागते आणि इथेच प्रश्न उपस्थित राहतो — खरंच माणुसकी हरवत चालली आहे का? आजचा माणूस प्रचंड प्रगत झालेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सुविधा, संपत्ती — सर्व काही त्याच्याकडे आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या; पण त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनातली माणुसकी मात्र हळूहळू संपत चालली आहे. पूर्वी माणसांमध्ये नाती होती, संवाद होता, आपुलकी होती, दुःखात सहभागी होण्याची भावना होती, नेहमीच मदतीचा हात पुढे करण्याची वृत्ती होती; पण आज मात्र गर्दी वाढली आहे आणि संवेदना कमी झाल्या आहेत. आपण सतत विचारतो — आपण काय मिळविले? पण आपण स्वतःला क्वचित विचारतो — आपण काय झालो? दुसऱ्याच्या वेदनेशी असलेले नाते तुटले की आपण अजूनही माणूस राहतो का? तात्त्विक दृष्ट्या पाहिले तर माणुसकी ही जन्मजात नसते; ती घडवावी लागते. ती संस्कारातून, अनुभवातून, दुःखाला सामोरे गेल्यावर आपल्याला उमगते. आज आपण दुःखालाही फिल्टर लावून पाहतो. अशावेळी संवेदना टिकणार कशी? समाजाने माणसाला स्पर्धक बनविले, सहप्रवासी नाही. प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे. पण ही शर्यत आपल्याला कुठे पोहोचवते, याचे आत्मचिंतन आपण केले पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस इतका स्वार्थी झाला आहे की त्याला दुसऱ्याचे दुःख दिसत नाही. वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात पाठवले जातात. नाती केवळ गरजांपुरती उरली आहेत. माणसाचे मूल्य त्याच्या पैशावर मोजले जात आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, पण माणसे मात्र एकमेकांपासून दूर गेली. मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत; पण मन मोकळे करून बोलायला कोणीच नाही. सोशल मीडियावर सहवेदना व्यक्त करणारी स्टेटस असतात; पण प्रत्यक्ष मदतीला हात पुढे करणारे कमीच दिसतात. माणुसकी हरवली आहे हे म्हणण्यापेक्षा ती झाकली गेली आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. माणसाचे खरे संकट बाहेर नाही, तर आत आहे. आपल्याकडे सगळे असूनही मनात एक प्रकारची पोकळी आहे आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी माणूस वस्तू साठवतो, यश मिळवतो, पैसा कमवतो, प्रतिष्ठा मिळवतो; पण तरीही तो त्याच्या जीवनात अस्वस्थ राहतो. कारण माणुसकी ही बाह्य गोष्ट नाही; ती अंतःकरणातील जाणीव आहे. खरा प्रश्न असा नाही की माणुसकी हरवली आहे; खरा प्रश्न असा आहे की आपण माणूस होण्याचे ओझे स्वीकारायला तयार आहोत का? कारण माणूस होणे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने अस्वस्थ होणे, स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहणे, दुसऱ्याच्या दुःखाशी समरस होणे, मदतीला धावून जाणे आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे — आणि हेच सर्वात अवघड आहे. शिक्षणाचा उद्देश माणूस घडविणे असायला हवा होता; पण तो फक्त गुण आणि पदवीपुरता मर्यादित झाला आहे. माणुसकी, संवेदना, सहानुभूती यांचे संस्कार मागे पडले आहेत. म्हणूनच शिक्षित समाज असूनही असंवेदनशीलतेचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या थकलेल्या माणसाला शब्द देणे, एखाद्याच्या चुकीला माफ करणे, एखाद्याच्या भावनेचा आदर करणे, दुसऱ्याचे दुःख समजून घेणे आणि जीवनात नेहमी माफ करायला शिकणे — हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे यातूनच माणुसकी दिसून येते. आपल्याला समाज बदलायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल; कारण माणुसकी हरवली नाही, तर ती आपणच बाजूला ठेवली आहे. आज गरज आहे माणूस म्हणून जगण्याची. आजचा माणूस अर्थ घडविण्याऐवजी अर्थ शोधण्यातच थकून जात आहे. जगण्यात तो इतका व्यस्त झाला आहे की तो जगणे विसरून गेला आहे. रस्त्यावर अपघात झालेला माणूस तडफडतो; सभोवतालची गर्दी त्याला मदत करण्यापेक्षा व्हिडिओ काढण्यात, त्या ठिकाणाहून निघून जाण्यात किंवा मदतीचा कोणताही हात पुढे न करण्यात व्यस्त असते — हीच समाजाची आजची परिस्थिती आहे. प्रश्न असा नाही की लोक वाईट आहेत; प्रश्न असा आहे की लोक संवेदनाशून्य कधी झाले? समाजात एकाच ऑफिसमध्ये आठ-आठ तास आपण काम करतो; पण घरी आल्यावर संवाद संपतो. एकाच छताखाली राहूनही प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये हरवलेला असतो. हे एकटेपण फक्त शारीरिक नाही, तर ते अस्तित्ववादी आहे. आज माणूस गर्दीतही एकटा आहे. शिक्षण क्षेत्रात पाहिले तर विद्यार्थी गुणांसाठी धडपडतो; पण अपयश आले की तो कोसळतो. कारण त्याला शिकवले जात नाही की अपयशानेही माणूस घडतो. माणसाला यशाची तयारी दिली जाते; पण अपयशाची नाही. आज गरीब रांगेत उभा असतो, श्रीमंत माणूस ओळखीने पुढे जातो. "माणुसकी हरवलेली नाही; ती दुर्लक्षित आहे."

चैताली गिते यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची