Loading ...
/* Dont copy */

पाऊस निघून गेल्यावर (पुंडलिक आंबटकर)

पाऊस निघून गेल्यावर (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक पुंडलिक आंबटकर यांचा पाऊस निघून गेल्यावर हा मराठी लेख.

पाऊस निघून गेल्यावर (पुंडलिक आंबटकर)

पावसानंतरच्या संध्याकाळी निसर्गाच्या बदलत्या रंगांतून, ओसाड रानाच्या शांततेत आणि हिवाळ्याच्या आगमनाच्या साक्षीने उमटलेली अंतर्मुख भावावस्था या ललित लेखातून प्रकट होते...

पाऊस निघून गेल्यावर

पुंडलिक आंबटकर (नागपूर, महाराष्ट्र)

दोन महिन्यांपासून हैदोस घालणारा पाऊस आता संथ आणि संयमी झाला आहे. खूप दिवसांनी मेघांचं मळभ दूर सारून आभाळ मनमोकळं हसू लागलं आहे. पाऊस निघून गेल्यावर आलेली मनोहारी संध्याकाळ कलतीच्या सूर्याला अर्घ्य देऊ पाहात आहे. वातावरणात किंचित गारवा आहे आणि पावसाच्या माऱ्याने पानांवरील धूळ झटकून जागी झालेली झाडेझुडपे खूपच ताजीतवानी भासत आहेत. पश्चिमेला सूर्य कलंडू लागताच, आभाळाने कुठे हळद उधळली आहे, तर कुठे लालेलाल कुंकवाची बरसात केली आहे.

शुष्क ढगांच्या विरळ पुंजक्यावर मावळतीची किरणे पडताच संपूर्ण आभाळात एक विलक्षण रंग दाटून आला आहे. सूर्य तसा आगीचा गोळा; पण आज तो मावळताना पाडाला आलेल्या लाल-पिवळ्या आंब्यासारखा भासत आहे. पावसाळा अद्याप माघारी फिरला नसल्याने आकाशात काही ठिकाणी गाभुळलेले ढग इकडून तिकडे भिरभिरत आहेत. अशा परिस्थितीतही आभाळ लालेलाल झाल्याने पाऊस निघून गेल्याचा विश्वास शेतकरी मनाला वाटत आहे.

पाऊस निघून गेल्यावर
कातर झालेल्या वाटा
हिवाळ्याचा बोभाटा
सांजवेळी…

रानात अद्याप चिखल आहे. पूर्वी दिवाळीपर्यंत सीतादही—अर्थातच मुहूर्ताचा वेचा—होऊन जायचा. यंदा मात्र कपाशीला बोंडेच नसल्याने संपूर्ण रान मलूल होऊन, वैफल्यग्रस्त नजरेने आपल्याकडे पाहात असल्याचा भास मला होत आहे. सोयाबीनच्या पिवळ्या पडलेल्या कांड्यांना चार-दोन शेंगा तेवढ्याच बिलगून आहेत. उरलेलं रान मोकळं आणि पालापाचोळ्याने व्यापलेलं आहे. अशाही परिस्थितीत पावसाच्या माऱ्याने काटक होऊन निर्ढावलेली एक पायवाट, मावळतीच्या साक्षीने आपलं रूप न्याहाळत आहे. आजूबाजूला जनावरांनी खुरपलेलं हिरवंगार गवत आणि अगदी मधोमध असलेली ही निमुळती पायवाट नेमकी कुठे जात असेल, असा विलक्षण प्रश्न मनाला सहजच स्पर्श करून जातो.

आंब्याच्या झाडांवर सूर्याची लालबुंद किरणे पडताच हिरवी झाडं किंचित लालसर होऊन गेली आहेत. सूर्य हळूहळू मान टाकू लागताच, परतीच्या पाखरांना घरट्याकडे परतण्याची घाई झाली आहे.

क्षितिजापल्याड जाताना सूर्याने आपल्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी सोडल्या आहेत. पश्चिमेच्या आभाळात काळोख आणि प्रकाशाचं एक वेगळंच मिश्रण तयार झालं आहे. काळोख चोरपावलांनी प्रकाशावर मात करू लागला आहे. काही वेळातच मंद मंद काळोखाने संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेतलं आणि कोजागरीच्या पृष्ठभूमीवर चंद्राचं बिंब प्रकर्षाने आकारास आलं. चंद्र उजळला आहे; पण त्याच्या भोवती शुष्क ढगांचं वलय आहे. चंद्राचं अर्धवट बिंब पऱ्हाटीच्या पानांवर थेंब होऊन साचलं आहे. हलकं हलकं दव पानांवरून घरंगळत अंगाला झोंबू पाहात आहे.

आंब्याच्या झाडाखाली एका कोल्ह्याने ओरडण्यास सुरुवात करताच, शिवारातील इतर कोल्ह्यांनी कोल्हेकुई सुरू करून संपूर्ण परिसर भारून टाकला आहे. कोल्हा तसा मांसाहारी जीव; पण प्रसंगी तो बोरे खाऊनही जगतो. सध्या रानात खाण्याजोगं काहीच नसल्याने, कोल्हे नेमकं काय खात असतील, असा प्रश्न मनात उमटतो.

शेताच्या बांधावरून मंद मंद काळोखात वाट काढताना, दवाचे थेंब पायांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. मला उगाचच त्या मनोहारी पायवाटेवरून जाण्याचा मोह झाला आहे. खरं तर घरी परतण्याची वेळ टळून गेली आहे; पण हिवाळ्याच्या सुरुवातीला काळोखाच्या साक्षीने रानाने मनावर वेगळंच गारूड केलं आहे.

तितक्यात चिलाटीची एक फांदी शर्टात अडकली आणि त्यातील तीन-चार काटे पोटात घुसले. दुचाकीवर दवाची लव साचली आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे अधूनमधून डोळे दीपत आहेत. हिवाळा सुरू झाल्याची साक्ष देणारा आणखी एक सोहळा मनात साठवून, मी घराकडे निघालो आहे…

पुंडलिक आंबटकर यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची