कावीळ आणि घरगुती उपाय (आरोग्य) - कावीळ आणि त्यावरील उपचारांबाबत असलेले समज-गैरसमज व घरगुती उपाय याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

कावीळ आणि घरगुती उपाय (आरोग्य) - कावीळीला ‘कामला’ या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे.
“कावीळ झाली आहे त्याला, सर्वच पिवळं दिसतं,” असं आपण अनेकांना उपहासाने म्हणतो. मात्र या उक्तीचा काहिसा संबंध कावीळ या आजारातील लक्षणांमध्ये दडलेला आहे. कावीळीला ‘कामला’ या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर कावीळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. कावीळ आणि कावीळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे कावीळ होते. कावीळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच कावीळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत.
मुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुब्बुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच हातापायाची नखे अशा भागात साचून राहतं. त्यामुळे शरीराला एकप्रकारचा पिवळेपणा येतो.
मूत्राद्वारेही या पित्तयुक्त द्रव्याचा निचरा होत असल्याने लघवी पिवळी होते. पित्तयुक्त द्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर लघवीला कित्येकदा लालसर रंग येतो. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानं तसेच रक्त आणि मूत्रात पित्तजन्य पेशींचं प्रमाण वाढल्यानं पचनाच्या तक्रारींत वाढ होते. लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन वाढणं (लहान बाळांना जन्मत: होणारी कावीळ), पित्तमार्गातील अडथळ्यामुळे यकृतातपित्त साठून ते रक्तात उतरणं म्हणजेच कावीळ होय.
कावीळ झाल्यावर अन्न पचनाच्या तक्रारी वाढल्यानं कित्येकदा व्यक्तीला उलट्या होतात आणि परिणामी अशक्तपणा वाढतो. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. हातापायाचे गोळे दुखण्याच्या तक्रारी उद्भवतात.
कावीळ झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावसं वाटतं. चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होतं. भूक मंदावते आणि अन्न पाण्यावरची इच्छा नाहिसी होते. सतत ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणं, मळमळणं ही अगदी प्राथमिक लक्षणं आहेत. पोटाच्या वर उजव्या बाजूला वारंवार दुखतं. रक्त तपासणीत कावीळचा समजते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये लघवीची तपासणी केली असता कावीळीचं निदान होतं.
कावीळ झाली आहे की नाही याचं निदान घरगुती पद्धतीनेही करता येतं. छोट्या बाटलीत साठवलेल्या लघवीत कापूर बुडवल्यास कापराला पिवळसर रंग चढल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
योग्य तपासण्यानंतर कावीळ झाली असल्याचं निदान झाल्यास कावीळग्रस्त व्यक्तीनं आहार-विहारात महत्त्वाचे बदल करणं खूप गरजेचं असतं. कारण कावीळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते.
कावीळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं. सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये. उन्हात फिरणं टाळावं. कावीळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत.
उघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं. दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत. मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं. पाणी उकळून थंड करूनच प्यावं.
कावीळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमट सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा. गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.
कावीळ झाल्यानंतर कित्येकदा होणारा त्रास वाढल्यास आणि किंवा उलट्यांमुळे अति अशक्तपणा आला असल्यास तसेच सारखा ताप येत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत.
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
अभिप्राय