यंत्र म्हणे - मराठी कविता

यंत्र म्हणे, मराठी कविता - [Yantra Mhane, Marathi Kavita] गरजेपुरते माफक हसणे, ढोंगापुरते खोटे रडणे, असे तुला मी दिले जिणे, यंत्र म्हणे.
यंत्र म्हणे - मराठी कविता

गरजेपुरते माफक हसणे, ढोंगापुरते खोटे रडणे, असे तुला मी दिले जिणे, यंत्र म्हणे

गरजेपुरते माफक हसणे
ढोंगापुरते खोटे रडणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

वृक्षतराणे निसर्गगाणे
तुला कधी ना ऐकू येणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

हिरवाईने हरखून जाणे
तुला न त्याचा अर्थ उमजणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

डोळे थिजणे, कानही विटणे
जिवंत असूनही मृतवत जगणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

रवि मावळणे, चंद्र उगवणे
निसर्गरंजन तुला न मिळणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

ब्रह्म, नाद, लय, सूर, तराणे
तुझ्या हिशेबी रुपये आणे
असे तुला मी दिले जिणे
यंत्र म्हणे

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.