कोलाहल भवती, कुणी म्हणे ही प्रगती, प्रगतीशी जोडा नाती, सांगत फिरती, प्रगतीचा वेग किती ते ठाऊक नाही
कोलाहल भवती, कुणी म्हणे ही प्रगती
प्रगतीशी जोडा नाती, सांगत फिरती
प्रगतीचा वेग किती ते ठाऊक नाही
गतिमान जगाचा अर्थच समजत नाही
मी कसे जगावे मलाच उमजत नाही
विज्ञान मोडते विक्रम दिवसागणती
जगण्याची गणिते डॉलरवरती ठरती
रुपयात सुखाचा कणही क्षणभर नाही
चलनात कोणत्या सुख ते माहीत नाही
मी कसे जगावे मलाच उमजत नाही
सुख समृद्धीची मांडत अवघड गणिते
जग सुंदर दिसते केविलवाणे हसते
पळण्याची शर्यत, अंतिम रेषा नाही
आनंद शोधतो, पळतो, उसंत नाही
मी कसे जगावे मलाच उमजत नाही
मी माणूस म्हणून जगतो, वेडा ठरतो
माणुसकी सोडून जगतो, भ्रनिष्ट ठरतो
हे श्वापद जगणे मजला अवगत नाही
मी कसे जगावे मलाच उमजत नाही
मी भ्रमणध्वनीवर अखंड बडबड करतो
मी संगणकावर डोळे खिळवून बसतो
कर्कश्श गीत ऐकतो, नृत्यही करतो
मी प्रखर कर्णकटू अजस्त्र सिनेमे बघतो
मी नशाही करतो, तरुणांसह डोलतो
यौवनेस फुंकर मारून चुंबन देतो
मन सुन्न, पोकळी, तिन्हीसांजेला दिसते
कि चुकते आहे नक्कीच कोठे नाही
हे क्षणिक, बेगडी वेड, खरे सुख नाही
या यंत्र युगाचा मंत्र माहिती नाही
मी कसे जगावे मलाच उमजत नाही
- प्रफुल्ल चिकेरूर