आनंदी रक्तस्त्राव

आनंदी रक्तस्त्राव - [Happy Bleed] २८ मे मासिक पाळी स्वच्छता दिवस निमित्त जनजागृती करणार सिमा कुलकर्णी-लिंगायत यांच लेख.
आनंदी रक्तस्त्राव | Happy Bleed

२८ मे मासिक पाळी स्वच्छता दिवस निमित्त जनजागृतीपर लेख


२८ मे हा मासिक पाळी स्वच्छता दिवस (World Menstrual Hygiene Day) म्हणुन पाळला जातो, मासिक पाळी विषयी समज गैरसमज दुर करणारा सिमा कुलकर्णी-लिंगायत यांचा लेख.

पाळी ही स्त्रीला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे त्यामुळे ती आनंदाने स्वीकारली पाहिजे. मुलगी वयात आल्यानंतर योनीमार्गातून जो रक्तस्त्राव होतो त्याला ‘मासिक पाळी’ म्हटले जाते पण मला “हॅपी ब्लीड” असे म्हणणे जास्त योग्य वाटते, कारण मुलगी वयात आल्या नंतर तिचा आनंदी सोहळा करून काय योग्य आणि अयोग्य आहे त्याबद्दलची माहिती सांगणे, काही गोष्टी वाचायला देणे जेणेकरून त्याबद्दलची भीती ही आधीच निघुन जाईल. पण हे आई वडिलांनी विश्वासात घेऊन सांगणे आवश्यक आहे. मुले पण वयात आल्यानंतर त्यांना सुद्धा काही गोष्टींची माहिती सांगितली पाहिजे त्यामुळे पाळी मध्ये सुद्धा पुरुषांची मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होईल.

हॅपी ब्लीड (मासिक पाळी) चालू झाली म्हणजे मुलीचे स्त्री मध्ये रूपांतर होऊन तिला गर्भ राहण्यास मदत होते. एखाद्या मुलीचे लग्न झाले कि पाळीवर लक्ष ठेवले जाते, तारखा विचारल्या जातात आणि लोकांना वर्षभरातच पाळणा हलण्याची घाई लागते. पण ही गर्भधारणा पाळीच्या दिवसामध्ये जो रक्तस्त्राव होतो त्यावर होते आणि मूल जन्माला येते आणि तेव्हा सगळे आनंदी असतात. पण मग पाळी चालू असताना काही ठिकाणी वेगळी वागणूक का दिली जाते? छोट्याश्या कुटूंबामधून यात बदल होताना दिसत आहे, पण मोठया कुटुंबामधून हाताशी अनेक जण मदतीस असल्यामुळे परंपराच चालताना दिसते.

पण बदलत्या काळानुसार प्रत्येक स्त्री ही खांद्याला खांदा लावून काम करते तर पाळीकडे सुद्धा एका सकारात्मकतेने पहिले पाहिजे. आता आधी आपल्या घरातूनच याबद्दल जनजागृती करून प्रत्येकाच्या मनातील शंकेचे निरसन करणे आवश्यक आहे. माझ्या माहेरी असे खूप काही बाजूला बसणे असे काही नव्हते पण आई म्हणायची देवाकडे नको जाऊ? तिला विचारल्यावर ती म्हणायची, अगं परंपरेपासून असेच चालत आले आहे. पण जसजशी माहिती मिळत गेली, काही गोष्टी वाचत गेले तेव्हा ठरवले कि नाही याची सुरवात ही माझ्या घरातूनच झाली पाहीजे. मग हळू हळू आई ला समजवत गेले, थोडी नाराज होती पण स्वीकारायला लागली आणि लग्नानंतर नवऱ्याला देखील या सगळ्याची जाणीव करून दिल्या मग त्याने सुद्धा कधी अडवले नाही पण त्याबद्दलची जागरूकता करण्यास तोही मागे नाही याचा अभिमान पण आहे.

पाळीत सुद्धा मी देवपूजा, सणवार, नेवेद्य करत असते किंवा एखादी व्यक्ती देवाघरी गेल्यानंतर तिथे जाणे आवश्यक असल्यास मी बिनधास्तपणे जात असते. माझ्याकडे कार्यक्रम होता तेव्हा देखील मी सांगितले होते कि पाळी असेल तरी या, काही संकोच करू नका. पण तेव्हा हे ही एक लक्षात आले कि माझी पाळी चालू किंवा आता २ - ३ दिवसात आहे असे सांगितल्यावरच कळते आणि लोकांच्या नजरा बदलतात त्यापेक्षा सांगायचेच नाही. माझा मुलगा आता १० वर्षाचा आहे, त्याने ८ वर्षाचा असताना टीव्ही वरील पॅड्स च्या जाहिराती (माझा बिसनेससुद्धा याच्याशी सबंधित आहे) बघितली यामुळे त्याच्या मनात प्रश्न होते कारण जाहिरात लागल्यावर चॅनल बदल हा उपाय नव्हता त्यामुळे मुलाच्या विविध प्रश्नांवर आम्ही त्याला खरे आणि सोप्या भाषेत असे समजावून सांगितले. त्यामुळे तो आता प्रश्न तर नाहीच करत पण आमच्या वस्तूची जाहिरात करतो.

सकारात्मक परिवर्तनशील
एका वर्तमानपत्रामध्ये असे वाचले होते कि कोल्हापूरची देवी अंबाबाईचा लाडूचा प्रसाद देखील कारागृहातील महिलाच बनवतात. (तेव्हा त्यांच्या मनात पाळी विषयी खटकले पण त्यांनी महिलांचे मनपरिवर्तन आणि कामाला हातभार मिळून रोजगार उपलध होईल असा विचार झाला)

तर दुसरीकडे केरळमध्ये शबरीमाला मंदिरात प्रवेश करताना मासिक पाळीची चाचणी द्यावी लागेल त्यातून “हॅप्पी टू ब्लीड” ही मोहीम चालू झाली.

पूर्वीच्या काळी मंदिरातून पुजारीणी या स्त्रियाच असत.

आपल्याकडे खूप मोठं मोठे स्त्री संत तसेच विविध क्षेत्रातील महिला उच्च पदभार स्वीकारत होत्या किंवा आहेत पण त्यांना कधी पाळीचा अडथळा आलेला वाचण्यात किंवा ऐकण्यात नाही आले. मी शेवटी एवढेच सांगेल...

“मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची”
- सिमा लिंगायत कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.