अपेक्षांची ट्रेन सुपरफास्ट, वेगात पुढे धावायची, गावच्या छोट्या स्टेशनांना, फक्त वाकोल्या दावायची
अपेक्षांची ट्रेन सुपरफास्टवेगात पुढे धावायची
गावच्या छोट्या स्टेशनांना
फक्त वाकोल्या दावायची
एखादे सुंदर असेल स्टेशन
ट्रेनला आमच्या ठावच नाय
धावण्याच्या चढाओढीत जसे
पाठीवर शेपूट अन् डिक्यावर पाय
असंच एक चुकलं स्टेशन
नजरेसही नाही पडलं
वेगवान ट्रेनला वाटलं
नाही थांबलं तर काय नडलं
मध्येच कुठकुठल्या स्टेशनावर
एक एक डब्बा जोडत गेली
आयुष्याच्या धावपळीत मागे
छोटे स्टेशन सोडत गेली
अर्ध्या वाटेत जीवनाच्या
ट्रेन नशिबाने थांबवली
चुकलेल्या अशाच स्टेशनावरील
बोगी एक पाहून भांबावली
गत फेर्यांची करीत खंत
ट्रेन बोगीला जोडीन म्हणतेय
पूर्वीच जोडलेल्या डब्यांना
मध्येच कसे सोडीन म्हणतेय?
लांब पल्ल्याचे प्रवासी
सोबत आता वाहवत आहे
त्यांना सोडून अर्ध्या प्रवासात
नाही आता राहवत आहे
ट्रेनलाही अन् बोगीलाही
सोबत आता रहायचे
आपआपल्या रुळावर राहून
फक्त एकमेकां पहायचे