आई तव उपकार - मराठी कविता

आई तव उपकार, मराठी कविता - [Ghusmat, Marathi Kavita] निजला का रे बाळा, रोज हाक तू द्यावीस, आठवून सर्व आई, जीव होई कासावीस.
आई तव उपकार - मराठी कविता | Aai Tav Upkar - Marathi Kavita

निजला का रे बाळा, रोज हाक तू द्यावीस, आठवून सर्व आई, जीव होई कासावीस

निजला का रे बाळा
रोज हाक तू द्यावीस
आठवून सर्व आई
जीव होई कासावीस

रात्रंदिन गाळीला घाम
रक्ताचं केलं पाणी
घेवूनी कडेवर मजला
चालली किती अनवाणी

भरीली आमची खळगी
स्वयं राहूनी उपाशी
त्यागाची फेड तव
होणे नाही आताशी

केली सदा चिंता अन्
सदा केली कदर
सदा राहिला डोक्यावर
तव मायेचा पदर

येवो प्रसंग कठीण
नचं कधी माघार
सदोदित पाठीशी
तव असे आधार

गरिबांत शोध देव
दिधले बाळकडू
कोसळे डोंगरही दुःखाचा
नसे येत रडू

विसर नको देवाचा
सावरूनी चरितार्थ
जगणं होऊदे प्रेममय
दिधला तो मतितार्थ

कधी चपराक प्रेमाची
लावावया मज शिस्त
आदर ठेवावा थोरांचा
किती त्यावरी भिस्त

जन्म घेऊनी तुज पोटी
जीवन जाहले कृतार्थ
तव प्रेमाच्या सागरात
मी डुंबुनिया यतार्थ

आई तव मायेचा
अविरत उमाळा
तव भेटीच्या वियोगाने
दाटूनी येतो गळा

नि:स्वार्थी प्रेम तव अन्
नि:स्वार्थी जिव्हाळा
तव प्रेमाच्या छायेत
लागला मज लळा

तव मायेच्या उजेडात
निघे उजळूनी आकाश
तव आशीर्वादाचा सर्वत्र
भरीला हा प्रकाश

चंद्राहुनही शितल
तुज आशीर्वादाची छाया
पाठीशी मज सदोदित
तव अविरत माया

तूच खरी माय अन्
वासराची गाय तू
तू दुधावरची साय अन्
पांगळ्याचे पाय तू

नच फिटे कधी
थोर तुझे उपकार
तव कृपा सदा
अन् तुझेच ग संस्कार

आई आज तव
कष्ट आले फळा
तव कृपेच्या सुमनांनी
बहरला गं मळा

अश्रूमय नयनांनी
म्हणे पुत्र मम हिरा
आई तुज कसोटीत
उतरेल गं मी खरा

सदा वाटे आई
रहावे तव कुशीत
कधी रोखतो हुंदके
तोंड दडवुनी उशीत

जातांना दूर देशी
घेतीले एक वचन
अग्निडाव मज हाती
अन्यथा हे देहदान

नच ठावे मजलाही
कधी मिटेल लोचन
जगीन तव संस्कारी
देई तुज वचन

आई तव उपकार
त्याग तव महान
पूर्ण करीन वचन
जीव टाकूनी गहाण

पूर्ण करीन वचन
जीव टाकुनी गहाण


रोहित काळे | Rohit Kale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.