राहशील स्मरणात कुणाच्या, तर त्या मरणाचं सार्थक आहे, विसरत असतील जितेपणी, तर हे जगणंही निरर्थक आहे
राहशील स्मरणात कुणाच्यातर त्या मरणाचं सार्थक आहे,
विसरत असतील जितेपणी
तर हे जगणंही निरर्थक आहे
साजरी होते का आज्यापणज्यांची
पुण्यतिथी वा जयंती,
हारभरल्या फोटोंनी तू पण
मग भरवायच्या का भिंती?
तुझ्यात अन् झुरळात
तसा फरक तो काय?
रेंगाळते तेही जमिनीवर
फरफटत फरफटत आपले पाय
छत्रपती जन्मावा इतरांच्या घरी
अन् सेवेचा घ्यावा दुसर्यांनी वसा
नाही वाटत एकदा तरी की,
आपल्या कर्तुत्वाचा उमटावा ठसा?
हो, रामकृष्णही आले गेले
पण जग त्यांना घाली दंडवत
आप्पलपोटाची गाथा तुझी
स्वतःसमोर तरी येते का मांडवत?
संसाराचा ओढत गाडा
जीवन संपून जाईल व्यर्थ
हो जागा, सोड स्वार्थ,
दे जीवनाला जरा अर्थ