महापूराची भीषणता पाहून एका सर्वसामान्य गृहिणीची काय हालत झाली असेल; अगदी तेच मांडायचा प्रयत्न या कवितेला करण्यात आला आहे
पूर आलाय सरकार माझ्या गावात पूर आलाय
पाण्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी जिथे जीव दिला
त्या महाराष्ट्रात आज त्या पाण्यामुळं पूर आलाय
उंबरठ्यावर सांजेला लक्ष्मी येणार
म्हणून रांगोळी काढायची राहिली हाय
चुलीसाठी सरपान बी भिजून गेलं हाय
दिवा माझ्या देवाचा आज लावायचा राहुन गेला हाय
बघा माझा देव माझ्यावर रुसलाय की काय
होतं पाणी काल गुढघ्या पर्यंत
ते आज डोक्यावरून गेलं हाय
माझा सर्जा राजा भी गेला वाहून
वाहून गेली रं माझी गाय
त्याच्यावरच चालायचं पोट आमचं
ढसाढसा रडती बग माझी आय
गेला संसार माझा वाहून
जे माझ्या बापानं कर्ज काढून दिलं हाय
भाऊ येणार व्हता रक्षाबंधनाला घरी
त्याला ओवळयाला घरात ताट राहील न्हाय
ना राहीलं मूठभर मीठ हातात
ते बी पाण्यात विरघळून गेलं हाय
कोसळला माझा धनी बी आता साथ कुणाची न्हाय
इमान बनिवलं तु सरकारा अन म्हणे मंगळावर पाठवलं हाय
खर्च केला असशील करोडाचा, लाखभर इथं दिला न्हाय
ते मंदिर बांधायला धडपड तुमची पण माणुसकी बांधायची इसरला हाय
अरे लाज राख जरा
बघ संकटात धावून माझा मावळाच आला हाय
पूर बघ कसा माणुसकीचा आज आला हाय
दिवस रात्र एक करून भक्कम पाठीशी उभा राहिला हाय
सैनिक जो तिथं भारत मातेचं रक्षण करत व्हता
तो इथं भी माझ्या माय बापाचं रक्षण करत हाय
तो इथं भी माझ्या माय बापाचं रक्षण करत हाय