स्वामी पल्याडचे रणजित देसाई - मातीतले कोहिनूर

स्वामी पल्याडचे रणजित देसाई, मातीतले कोहिनूर - [Ranjit Desai, People] स्वामी’ म्हटलं की रणजित देसाई आनि रणजित देसाई म्हटलं की ‘स्वामी’! समस्त मराठी वाचकवर्गाने जुळवलेलं हे एक मस्त समीकरण आहे.

६ मार्च - स्वामीकार रणजित देसाईंच्या स्मृतिदिनानिमित्त

स्वामीकार रणजित देसाईंना आठवताना
स्वामी’ म्हटलं की रणजित देसाई आनि रणजित देसाई म्हटलं की ‘स्वामी’! समस्त मराठी वाचकवर्गाने जुळवलेलं हे एक मस्त समीकरण आहे. पण रणजित देसाई म्हणजे फक्त स्वामीकारच का? वाचनवेड्या डोळ्यांसमोर आणखी काही नावं नक्की तरळतील, श्रीमान योगी, राधेय, राजा रविवर्मा, पावनखिंड, बारी एक ना अनेक. ‘रूपमहाल’ ते ‘बाबुलमोरा’ असे १६ कथासंग्रह, ‘बारी’ ते ‘स्वामी’, ‘शेकरा’ अशा १२ कादंबऱ्या, ‘वारसा’ ते ‘पांगुळगाडा’ अशी १२ नाटकं, १५ कविता, ४ चित्रपटकथा आणि स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा, राधेय या कादंबऱ्यांचे भारतीय भाषांमध्ये व इंग्रजीतही प्रसिद्ध झालेले अनुवाद. प्रत्येक कलाकृती दर्जेदार, प्रत्येक अन्‌ प्रत्येक पुस्तक तितकंच तोलामोलाचं, कल्पनेचा दैवी आविष्कार आणि तरीही वास्तवाची गहिरी किनार... हे ज्यांना जमलं, ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे सारं अवतरलं, आज इतक्या वर्षांनंतरही मराठी रसिकमनावर ज्यांचं अनभिषीक्त साम्राज्य पसरलं आहे ते रणजित देसाई म्हणजे खरोखरीच साहित्य विश्वातील स्वामी होते!

रणजित देसाई उर्फ दादा. साहित्याचा राजा. कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड नामक छोट्याशा खेडेगावात दि. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षण इंटरपर्यंत. लहानपणी त्यांना संगीताचा व्यासंग होता. आजीच्या आजारपणात वाचनाचे वेड लागले. एकदा त्यांनी आजीजवळ ‘मला लेखक व्हायचंय’ असं सांगितलं, तेव्हा आजी म्हणाली, “मग हे सतार वाजवायचे, संगीत शिकायचे धंदे सोडून दे. आणि लेखकच व्हायचं असेल ना तर लक्षात ठेव. की तू लेखक हो, पण असा हो की आजवर असा लेखक लोकांनी कधीच वाचला नसेल!” लेखक म्हणुन यशस्वी होण्याची बीजे बालवयातच पेरली गेली असल्याचे लक्षात घेण्यासारखे आहे.

[next] पुढे शालेय शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. तिथे हायस्कुलमध्ये बा. ग. जोशी नावाच्या शिक्षकांनी रणजित दादांची बुद्धीमत्ता आणि साहित्याची अभिरूची लक्षात घेऊन त्यांच्याकडून हरिभाऊ आपट्यांपासून ते ना. सी. फडक्यांपर्यंत सर्व वाङ्मय वाचून घेतले. तिथूनच त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. ‘महाद्वार’ नियतकालीकात रविन्द्रनाथांच्या ‘गीतांजली’चा त्यांनी केलेला अनुवाद व्यं. ना. कुलकर्ण्यांनी प्रसिद्ध केला नि रणजितदांची लेखकपणाची नांदी झाली. पुढे एप्रिल १९४८ मध्ये प्रसाद मासिकात ‘भैरव’ ही कथा प्रकाशित झाली आणि तिला बक्षीसही मिळाले. पुढे फडके, खांडेकर यांचा सहवासही त्यांना लाभला आनि फडक्यांची अद्‌भूत शैली आणि खांडेकरांची ध्येयवादी दृष्टी यांच्या संगमातून त्यांची लेखनसृष्टी फुलली.

रणजित दादांचा पहिला कथासंग्रह ‘रूपमहाल’ १९५२ साली प्रकाशित झाला. पुढे १९५९ साली पहिली कादंबरी ‘बारी’ तर ‘स्वामी’ १९६२ साली प्रकाशित झाली. वयाच्या ३७ व्या वर्षीच त्यांना मायबाप वाचकवर्गाने व महाराष्ट्र शासनाने ‘स्वामीकार’ केलं. त्यांच्या लेखनात विलक्षण दृश्यात्मकता, नाट्यमयता असल्याने चित्रपट व नाटकवाले आपोआप आकर्षित झाले. ‘रंगल्या रात्री अशा’ हा पहिला चित्रपट तर ‘वारसा’ हे पहिले नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले. लेखन नाटकात जरा जम बसला की एरवी माणसं आपलं बिऱ्हाड उचलून पुण्या मुंबैच्या वाटा पकडतात पण दादांनी अखेरपर्यंत कोवाडमध्येच वास्तव्य केलं. तिथल्या मातीच्या सुगंधातूनच आपलं साहित्य फुलवलं. ग्रामीण जीवनाविषयी त्यांना कमालीची आस्था होती. ते अभिमानाने सांगत की “आधी मी शेतकरी आहे, नंतर लेखक!” विपुल प्रमाणात त्यांनी ग्रामीण, सामाजिक, संगीतप्रधान व निसर्गविषयक कथा लिहिल्या.

[next] एक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि लोकप्रिय लेखक, कादंबरीकार, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी संस्मरणीय असा ठसा उमटविलेला आहे. लेखक म्हणून सर्वपरिचित असलेला हा माणूस खरंतर चौफेर कलावृत्तीचा अवलिया होता! संगीतावर त्यांचे अपार प्रेम आणि चित्रकलेवरही तितकीच नितांत श्रद्धा. छायाचित्रांचा भलताच षौक. जुन्या वस्तूंचाही संग्रह करण्याची भारी हौस! सृजनशील निर्मितीचा ठेवा हा नवनिर्मितीची पालवी फोडणारा असतो, असं त्यावर स्पष्टीकरण.

‘साहित्यगंध’ हा कणाकणानं वेचावा लागतो. हा नुसता छंद नाही, कारण छंद बिंद कधीही बंद पडू शकतात पण लेखन ही एक तपश्चर्या आहे. ती आयुष्यभर व्रतस्थपणे करावी लागते. रणजितदादा हे फक्त बोलत नसत तर ही जीवनमुल्ये त्यांनी आयुष्यभर जपली.

त्यांनी ‘स्वामी’ लिहिली ती वि. स. खांडेकरांच्या आग्रहाखातर. आणि मराठीत ऐतिहासिक कादंबरीला नवे प्रमाण मिळाले. ‘स्वामी’ आधी आणि नंतरही बरंच साहित्य मराठीत आलं पण स्वामी केवळ अविस्मरणीय! विशेष म्हणजे स्वामीचं यश दादांना अखेरपर्यंत लाभलं. तरीही प्रामाणिकपणे ते हेच सांगत की, “कादंबरी उचलली जाते म्हणजे काय होतं ते मला स्वामीमुळे समजलं. वाचकांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं की शेवटी मला ‘स्वामीकार’ व्हावं लागलं. स्वामीसाठी इतिहासाचा अभ्यास करतात मला कित्येकवेळा वाटायचं की ते पाहता असे वाटते, की मी ह्या थोर पेशव्यांचे देणे द्यायचे नव्हते तर त्यांनीच माझे काही तरी देणे द्यायचे शिल्लक राहिले होते. ते देणे ते आता देताहेत. बोलून चालून राजाचे देणे! ते पेलणे माझ्यासारख्या सामान्याला कसे शक्य आहे!”

[next] स्वामी अधिक ठसते ती त्यातील नायकाच्या म्हणजेच माधवराव पेशव्यांच्या व्यक्तिरेखेमुळे, लढाया, राजनैतिक दाखले तर कुठलीही कादंबरी देईल पण एक इतिहास गाजवणारी व्यक्ती माणूस म्हणुन कशी होती, रयतेची काळजी घेणारं स्वामीछत्र होती हे उलगडल्यामुळे ‘स्वामी’ वेगळी ठरते.

‘श्रीमान योगी’त शिवाजी महाराजांसारख्या महापुरूषाच्या अंतःकरणात शिरून त्यांच्यातील ‘माणूस’ शोधन्याचा केलेला प्रयत्न विशेष भावतो.

बाजीप्रभू देशपांड्यांच्या पराक्रमावर रचलेली ‘पावनखिंड’ ही हेच अधोरेखित करते की महापुरूष माणसे कशी हेरतात आणि त्यांना आपल्या गोटात घेऊन कशी मोठी करतात.

‘राधेय’ ही कादंबरीदेखील कर्णाच्या भावकहाणी सांगत प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण जागृत करण्याचं आव्हान पेलते.

‘राजा रविवर्मा’ ही कलावंताच्या आयुष्याचा आलेख उलगडून दाखवते.

‘अभोगी’ ही कादंबरीदेखील कलेपेक्षा माणूस व त्याच्यातील माणुसकी श्रेष्ठ असते हेच सांगते.

‘शेकरा’ ही आगळीवेगळी निसर्गकथा ही प्राणी आणि वन्यजीव विश्वातून आदिम मानवी जीवनाचा आणि त्या काळातील माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींचा वेध घेते.

[next] रणजित देसाईंच्या साहित्यातून सतत हेच जाणवत राहते की त्यांच्या प्रज्ञेला विविध प्रकाची माणसं आणि त्यांच्या अंतर्मनाचा वेध घ्यायचा होता. कारण ‘माणूस आणि जीवन’ हाच त्यांच्या चिंतनाचा विषय होता. माणूस, त्याचे वास्तव, मग ते ऐतिहासिक असो किंवा कलेच्या पातळीवर असो, ते त्या पातळीवरील वास्तवाला अधिकाधिक व्यापक आणि विशाल बनवत नेत आणि तेव्हाच साकारल्या जात भव्यदिव्य वाङ्मयकृती.

शहरात बसून ‘माझा गाव’ वाचणं वेगळं आणि हिरवगार कोवाड हिंडताना तिची झिंग अनुभवणं वेगळं. आपली पहिली कादंबरी ‘बारी’ लिहितांना ते रोज बेरडवस्तीत हिंडायचे. एक वळण असं आलं की पुढे काही सुचेचना, तेव्हा सरळ त्यांनी आपलं बिऱ्हाड उचललं नि चक्क बेरड वस्तीत जाऊन दीड दोन महिने मुक्काम ठोकला. ते तिथे राहिले आणि तिथेच त्यांनी ती कादंबरी पूर्ण केली. ‘बारी, माझा गाव, समिधा, प्रतिक्षा’ या त्यांच्या ग्रामीण साहित्यातून व्यक्ती आणि समाजजीवन यांचे वास्तव समोर येते. त्यांनी कायम माणसाचं माणूसपण हे ठळकपणे दाखवलं. त्यांच्या कथेतील पात्र ही परिस्थितीशी संघर्ष करीत जातात आणि संघर्ष करताना येणाऱ्या मृत्यूचाही स्वीकार करताना दिसतात.

संगीतावर आधारलेल्या कथा हाही त्यांनी हाताळलेला एक विलक्षण साहित्यप्रकार. अशा कथा, की ज्यांमधून संगीतातील वाद्यांवर, वादकांवर, त्यांच्या कलानिष्ठेवर अभिरूचीपूर्ण भाष्य केलंय. शब्दरचनाही इतकी सुंदर की संपूर्ण कथा वाचताना डोळ्यांसमोर दृश्य तर उभे राहतेच परंतु कानात हलकेच मधुर संगीत ऐकल्याचा भास होत राहतो. ‘रूपमहाल’ ते ‘बाबुलमोरा’ हे त्यांचे कथासंग्रह याचीच साक्ष देतात.

[next] त्यांच्या पेहरावातूनही त्यांचे संगीतप्रेम उठून दिसे. टपोरे तीक्ष्ण डोळे, तलवार कट मिश्या, पान खाऊन रंगलेले ओठ, लेखकापेक्षा एखाद्या गवय्याला शोबेल असा पोशाख. खानदानी प्रवृत्तीचा दिलदार माणूस. वागण्या बोलण्यात गोडवा. तो त्यांनी संतसाहित्याच्या अभ्यासातून मिळवला होता. त्यांची जातकुळी ‘ ऐसी अक्षरे रसिके मेळविन’ म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांची होती तर संस्कार ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या ज्ञानदेवांचे होते.

अनेकांना हे ठाऊक नसते परंतु रणजित दादा हे १४ गावांचे इनामदार होते. स्वतःच्या हिंमतीवर बांधलेला प्रचंड मोठा वाडा, त्यावर शेकडो कामगारांचा प्रचंड राबता. वारंवार वाड्यावर संगीत मैफल भरत. वसंतराव देशपांडे, सी. रामचंद्रन अशा दिग्गजांची हजेरी तर कधी गानकोकीळा लता मंगेशकर तर कधी बालगंधर्व घरी येणे जाणे असे, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, सुलोचनाबाई, डॉ. आनंद यादव, शंकर पाटील, कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर, मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर या सगळ्यांशी त्यांचं प्रेमाचं, हक्काचं मैत्र जुळलेलं होतं. कोणीही असू दे, दादा तितक्याच मोकळेपणाने गुजगोष्टी करायचे. माणसांवर, माणुसकीवर, माणसांच्या विचारसरणीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं.

[next] जितके ते माणसात रमायचे तितकेच ते निसर्गातही रमायचे. कोवाडसारख्या हिरव्या गावात त्यांना निसर्ग वाचता आला. शब्दाशब्दातून प्रसवता आला. माणसांप्रमाणेच निरनिराळ्या पशुपक्षांनीदेखील त्यांचा वाडा गजबजलेला असे. सगळे प्राणी वैर विसरून गुण्या गोविंदाने तिथे नांदत. शेकरा जातीची रूबाबदार खार, इमानदार सुलतान म्हणजे त्यांचा कुत्रा, खास बंगरूळहून आणलेले गिनी पिग्ज, इटुकल्या डोळ्यांची लडिवाळ माकडीण आणि वाड्यातल्या एका खास खोलीत एकत्र राहणारे बारा राजबिंडे कुत्रे! हे सारेच त्यांच्या वाड्याचा भाग होते. ते साऱ्यांचेच सरकार होते. कदाचित त्याचमुळे त्यांनी प्राण्यांच्या भावविश्वाविषयी मोठ्या तरलतेने लिहिलंय. मराठी साहित्यात फारच अभावाने हाताळला गेलेला एक प्रकार म्हणजे निसर्गकथा. निसर्गाच्या सावलीत वाढणाऱ्या प्राण्यांच्या कथा. शेकरातून त्यांनी अशा कथा साकारल्या. त्यातील काही रूपककथाही आहेत. या लेखनप्रकाराचे वैशिश्ट्य असे की या पूर्णतः मानवपात्रविरहीत असतात आणि वाचणाऱ्याला अंतर्मुख करतात. वाचता वाचता अद्‌ भूत सुंदर जंगलातून सफर केल्याचा आनंदही लाभतो. आण्नि आता तरी जंगलं वाचवलीच पाहिजेत असा सम्देशही नकळत मिळतो. शेकरा ही वन्यजीवविषयक कादंबरी साकारण्यासाठी त्यांनी मारूती चितमपल्लींना सोबत घेईन अगदी लहानग्या नातवालाही कडेवर घेऊन जंगलं पालथी घातली. रातोरात रानवाटा धुंडाळल्या. तेव्हा कुठे ती उत्कट कलाकृती पूर्णत्वास गेली.

रणजित देसाई उर्फ दादा यांनी लिहिलेली नाटकं:
 • गरूडझेप
 • स्वामी
 • रामशास्त्री
 • श्रीमान योगी
 • तानसेन
 • हे बंध रेशमाचे
 • वारसा
 • धन अपुरे
 • लोकनायक
 • कांचनमृग
 • पांगुळगाडा
 • तुझी वाट वेगळी
हीदेखील आदर्श जीवनमूल्यांचा वेध घेणारी ठरली.

[next] जे जे मानवी जीवनात सहजसुंदर व सुमधुर त्या त्या गोष्टीचा त्यांनी आपल्या साहित्यात अंतर्भाव केला. ते नेहमी पराक्रम, शौर्य, धीर, त्याग यांचा महिमा वर्णन करत. त्यामुळे त्यांच्या साहित्याला वाङ्मयीन महत्ता प्राप्त होते. मानवी जीवनातील उदात्ततेचा शोध, हौतात्माची परंपरा, मैत्रीनिष्ठा, स्वामीनिष्ठा, वाचननिष्ठा या त्यांच्या साहित्यातील निष्ठावंत धारा होत. ते कायम उदात्तता, महत्ता, भव्यता, दिव्यता यांची श्रद्धेय मनाने पूजा बांधत. जीवनाचे स्वरूप कसे आहे व कसे असावयास हवे याचे चित्रण त्यांच्या साहित्यात आढळते. वास्तव जीवनाला आदर्श कसे बववता येईल हाच त्यांच्या साहित्याचा मंत्र, तंत्र, प्रकृती, आकृती होत आणि म्हणूनच कदाचित पुस्तकओळख होण्याच्या वयातल्या लहानग्यापासून ते वार्धक्याच्या वाटा धुंडाळणाऱ्या रसिक वाचकालाही रणजित देसाईंची पुस्तके आपलीशी वाटून जातात. आपल्या साहित्यात त्यांनी शुद्रतेचा स्वीकार न करता जे जे भव्य दिव्य आणि महनीय आहे त्याचाच कायम स्वीकार केला. त्यांनी कधी महायुद्धातील माणुस रेखाटला तर कधी महानायकातील माणूस साकारला. लार्जर दॅन लाइफची भूक या मातीतील, भारतीय संस्कृतीच्या मुशीतून घडवलेल्या कथांनी शमवली. साहित्यातील नीरक्षीरन्याय करणारे ते राजहंस ठरले.

दादांचं लेखन वैविध्यपूर्ण तसाच त्यांचा वाचकवर्गही विभिन्न थरातला. एकदा पुण्याच्या एका मोलकरणीनं स्वामी आणि श्रीमानयोगी या दोन्ही कादंबऱ्या आवडल्याचे पण स्वतः विकत घेऊन वाचण्याची ऐपत नसल्याचे दादांना कळवले तेव्हा त्यांनी लगेच त्या दोन्ही कादंबऱ्या तिला विनामूल्य पाठवून दिल्या.

[next] कोल्हापूरातील एका हॉटेलात स्वच्छतागृह साफ करणाऱ्या एका म्हेतराशी त्यांची गाठ पडली तेव्हा त्या चाहत्याने त्यांना सांगीतलं की तुमची श्रीमान योगी मी विकत घेऊन वाचली आहे परंतु त्यात चुकीचा उल्लेख आहे. हे त्याने अगदी निक्षून सांगितले, रणजितदादा अचंबित झाले... तथ्य तपासण्यासाठी त्यांनी काही अस्यासपत्रे पाहिली तर खरोखरच त्या म्हेतराचे म्हणणे बरोबर असल्याचे आढळले. दादांनी त्याला बोलावून घेऊन त्याचे आभार मानले. असं आभाळाएवढं मोठं मन लाभलेला हा लेखक पुढे ‘पद्मश्री’स पात्र ठरला यात नवल ते काय.

वाचकांच्या प्रतिसादावर लेखकाचे भाग्य आणि अभितव्य अवलंबून असते याची त्यांना जाणीव होती. ते मोठ्या आपुलकीने आपल्या वाचकांची पत्रे जपून ठेवत, शक्य तितकी उत्तरे देत. ते अतिशय उदार आनि परोपकारी मनोवृत्तीचे असल्यामुळे पाहुणचार करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नसे. न्याहारीच्या तड्याख्यातून तर कधीच कुणाची सुटका नसे. मित्र, पाहुणा परत निघाला की आपसुक त्यांचे डोळे भरून तेय. व्यावहारिक जगापेक्षा त्यांना भावनिक जगात वावरायला जास्त आवडे. त्यांच्या स्वभावाला एक नाजूक, तरल, लोभस अशी विनोदाची किनार होती.

[next] वाचकांना तर त्यांनी सांभाळलंच पण प्रकाशक हाही त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक होता. रा. ज. देशमुखांना त्यांनी पित्याप्रमाणे सांभाळलं तर अनिल मेहतांवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं.

त्यांच्या ग्रामीण कथा, कादंबऱ्यांमध्ये त्यांनी कोवाडच्या लोकजीवनाचा चातुर्याने उपयिग करून घेतला. विशेषतः सण-उत्सव, भांडणे, राजकारण, भाऊबंदकी, ईर्ष्या इत्यादीचे चित्रण मोठ्या खुबीने केले आहे. आपलं गाव, वाडा, गावकरी, नोकर चाकर, आपली मित्रमंडळी, खास पाळलेले प्राणी पक्षी या गोतावळ्याचा त्यांना अभिमान वाटत असे. कोवाडचे ऋणानुबंध त्यांनी अखेरपर्यंत जपले.

साहित्यनिर्मितीसाठी कधी स्वतःला कोंडून घेऊन आत्मकेंद्री राहिले नाहीत किंवा कोणालाही लहान मोठे म्हणून कमीपणाने वागवले नाही. कधी श्रीमंतीचा तोरा नाही पण मनाची गर्भश्रीमंती तसूभरही कमी पडली नाही.

दादांचा साहित्यठेवा नाशिकला हलविण्याची कुसुमाग्रजांची मनापासून इच्छा होती पण याच मातीतून पुन्हा नवे साहित्यिक घडावेत यासाठी त्यांनी तो कोवाडमध्येच जपला. आज त्याच ठेव्याने जगाच्या नकाशावर या ठिपक्याएवढुशा गावाला वेगळी ओळख मिळवून दिली. सारस्वतांना कोवाडचं वेड लावलं.

[next] रणजित देसाईंवर केवळ ऐतिहासिक लेखनाचा शिक्का मारून त्यांना केवळ ‘स्वामी’तच शोधत बसलो तर आपण कित्येक गोष्टींना मुकू. आयुष्यात अनेक संकटं येऊनही ज्यांची लेखनतपश्चर्या कधीच खंडीत झाली नाही. ‘नाच ग घुमा’ सारख्या वादळांनीदेखील वाचकांची त्यांच्याप्रती निष्ठा कधी तसूभरही कमी झाली नाही. आज २७ वर्षे झाली दादांना जाऊन तरी त्यांची लोकप्रियता ओसरली नाही त्या रणजित देसाईंचा आदर्श प्रत्येक व्रतस्थ लेखकाला सृजनानंदाची दिशा देईल. प्रत्येक आस्वादक वाचकाशी उच्च भावनिक स्तरावर तरल संवाद साधेल, माण्साला माणूसपणानं जगायला शिकवेल... हे सगळं असं घडेल फक्त गरज आहे ती ‘स्वामी’पल्याड डोकावण्याची!

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.