रामराव पाटलांसारख्या देव माणसाच्या मुलावर केलेल्या करणीमुळे त्याची झालेली भयानक अवस्था आणि मृत्युच्या दाढेतुन रामरावांनी त्याची केलेली सुटका याची रोमांचक भयकथा
रामराव आणि सुशीलाबाई हे गावातील आदर्श जोडपे. रामराव साठीला पोहोचून देखील कमावलेल्या पैलवानी शरीरामुळे पन्नाशीचे वाटत. त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर एक यशस्वी शेतकरी तसेच एक यशस्वी उद्योजक म्हणून पुऱ्या पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला होता. पण त्यांची खरी कमाई होती ती म्हणजे जनसामान्यात त्यांनी कमावलेली इज्जत. ते एक सहृदयी, पापभिरु आणि मनात सर्वांबद्दल अपार करुणा असलेले व्यक्ति होते. गावात कोणावरही कसलीही आपत्ती आली तरी ते वेळेला धाऊन जात. रात्री अपरात्री देखील लोकांसाठी त्यांच्या वाडयाचे दरवाजे खुले असत. त्यांनी राजकारणात यावे व त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करुन घेता यावा म्हणुन अनेक पक्षांनी त्यांना वेळोवेळी नाना प्रलोभने दाखवली पण रामरावांनी प्रयत्नपूर्वक स्वत:ला या सर्वांपासून दूर ठेवले होते. रामरावांच्या शब्दाला गावात चांगलेच वजन होते. सरकारी दरबारात देखील त्यांना खुप मान होता. केवळ त्यांच्या शब्दावर लोकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामे काही तासातच होऊन जायची. लोक त्यांना मनापासून आशीर्वाद द्यायचे. त्यांचे साधे राहणीमान, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि मधाळ वाणी क्षणात समोरच्याला आपलेसे करून घ्यायचे. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई एक धार्मिक, श्रद्धाळु व कुटुंबवत्सल स्त्री होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर ममत्व झळकायचे. आपल्या पतीप्रमाणे त्या देखील सर्वांच्या मदतीला नेहेमी तत्पर असायच्या. आपल्या गावाचे जणु त्या दोघांनी पालकत्वच घेतले होते. सर्व गाव त्यांना आबा आणि माई म्हणायचा. त्या दोघांची मुळ नावे जणू सर्वजण विसरूनच गेले होते. तीच गत शंकरच्या बाबतीत होती त्याला सर्व गाव धाकले पाटील म्हणूनच हाक मारायचे. शंकर, लग्नानंतर खुप वर्षानी मोठ्या उपास-तापास, व्रत वैकल्य आणि नवसानी झाला असल्याने आबा आणि माईंचा जीव की प्राण होता. आता त्यांचा लाडका शंकर २५ वर्षांचा तरणाबांड युवक झाला होता. वडीलांप्रमाणे तोही तालिमीत घाम गाळायचा. त्याचे पिळदार शरीर पाहुन रामरावाना आपले तरुणपणातील दिवस आठवायचे, जिंकलेल्या कुस्त्या आणि बक्षिसे आठवायची. आपल्याला उशीरा का होईना पण इष्टपुत्र दिल्याबद्दल ते देवाचे मनोमन आभार मानायचे. शंकर गुणांनी, स्वभावाने व कार्याने आपल्या वडिलांचीच आवृत्ति होता. म्हणतात ना ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी!’ आपले शिक्षण पूर्ण करुन शंकर शेती आणि कारखाना सांभाळू लागला होता त्यामुळे ते आता निर्धास्त झाले होते. लवकरच एखादी चांगली मुलगी पाहुन शंकरचे हात पिवळे करावे असा विचार करुन त्यांनी शंकरसाठी मुली बघायला सुरवात पण केली होती.
[next] सर्व काही छान चालले होते पण चांगल्या बरोबर वाईट, सृष्टा बरोबर दुष्ट या चालीवर त्या देवमाणसावर जळणारे, त्यांना सतत पाण्यात पाहाणारे आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या विरोधात कट कारस्थाने रचणारे हंबीरराव पाटील हे आबा पाटलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. वरकरणी ते आबांचे हितचिंतक असल्याचे दाखवत पण मनातून केवळ त्यांचे अहित चिंतत. आबांना गावात मिळणारा मान पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची पण त्यासाठी आबांनी किती कष्ट घेतले, लोकोपयोगी किती कामे केली या गोष्टी त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे त्यांच्यासारख्या स्वार्थी आणि दुष्ट माणसाच्या लक्षात येण्याएवढी त्यांच्या बुद्धीची कुवत नव्हती. त्यांना फक्त आबांचे यश दिसत होते. या मत्सारातूनच त्यांच्या मनात एक अत्यंत खालच्या पातळीची भयंकर योजना आकार घेऊ लागली होती. एक महिन्यापासून तयारी सुरु असलेल्या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा दिवस आज आला होता.
ती अमावस्येची रात्र होती. गोपनीयतेच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी आपल्या रंगेल स्वभावाचे शौक पुरवण्यासाठी गावाबाहेर बांधलेल्या एका पडक्या वाडयाच्या तळघराला आपल्या कामासाठी निवडले. आपला विश्वासू नोकर सखारामला सोबत घेऊन रात्री ११ वाजता ते वाड्यापाशी पोहोचले. लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन दादू गुरव त्यांची वाट पाहात बसला होता. त्याला विधीसाठी शंकरच्या सहा वस्तु हव्या होत्या. सखारामच्या पत्नीवर, शेवंतावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी तिने आबांच्या वाड्यात घरकाम करणाऱ्या सगुणाला आपलेसे करून आबांच्या वाड्यात काम मिळवले होते. हळूहळू शंकरचा विश्वास जिंकून त्याची सर्व कामे तिने आपल्याकडे घेतली. आता तिला शंकरच्या व्यक्तिगत वस्तु मिळवणे सहज शक्य होते. शंकरचा हातरुमाल, त्याची कापलेली नखे, जुने पायमोजे, त्याची अत्तराची बाटली आणि दाढीचे वापरलेले ब्लेड तिने मिळवले आणि आपल्या नवर्याकडे सुपूर्द केले. आता एकच वस्तु मिळवायची राहिली होती ती म्हणजे शंकरचे केस. शंकरच्या न्हाव्याला बोलण्यात गुंतवून सखारामने शंकरच्या कटिंग नंतर मोठ्या युक्तिने त्याचे केस लंपास केले होते.
[next] दादु गुरवाने कुंकवाने जमिनीवर एक वर्तुळ काढले आणि त्यात दोन विरुद्धमुखी त्रिकोण काढले. तयार झालेल्या सहा त्रिकोणात पिंडाला तयार करतात तसले तांदळाच्या पीठाचे सहा गोळे ठेवले. मग त्या गोळ्यांवर त्याने शंकरच्या सहा वस्तु ठेवल्या व त्या सर्व वस्तुंवर ६ धारीवाली लिंब ठेवली. त्यावर काळी हळद, कुंकु व काळे उडीद वाहिले. सोबत आणलेल्या उलटया पिसाच्या कोंबड्याची मान धारधार सुरीने चिरून त्याचे रक्त मंत्र म्हणत त्या सर्व वस्तूंवर शिंपडले. तो मेलेला कोंबडा त्याने वर्तुळाच्या मधोमध ठेवला. नंतर हंबीररावांना त्याने दक्षिणेकडे तोंड करून वर्तुळाजवळ बसावयास सांगितले. त्याने हंबीररावास सावध केले की एकदा का मुठ मारली की ती उठवता येणार नाही आणि जर का उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे स्वत:चेच नुकसान होऊ शकते. तेव्हा अजून एकदा विचार करा आणि मगच मुठ मारा. पण आबांना धडा शिकवण्याच्या अघोरी इच्छेने हंबीररावांच्या बुद्धीवर पडदा पडला होता, योग्य अयोग्य यात फरक करण्याची ताकद ते गमावुन बसले होते. त्यांना दिसत होता फक्त बदला. तेव्हा त्यांनी गुरवाचा सल्ला धुडकावून लावला आणि आपले काम पूर्ण करण्यास सांगितले. गुरवाने त्यांना सांगितले की मुठीमध्ये धारीवाले एक लिंबु घेऊन ज्याच्यावर करणी करायची आहे त्याचे नांव घेऊन त्या कोंबड्याच्या कलेवरावर (मृतदेहावर) मुठ मारा. पुढच्या अमावास्येला तो तडफडून मरेल.
[next] हंबीर रावांना त्यांचा डोळ्यासमोर शंकरच्या शवावर धाय मोकलून रडत असलेले आबा पाटील आणि माई दिसल्या आणि एक असुरी चमक त्यांच्या डोळ्यात निर्माण झाली. बरोबर १२ वाजता त्यांनी शंकर पाटील असे म्हणुन मुठ मारली त्याबरोबर त्या मृत कोंबड्याच्या चोचीतून एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि त्याच्या रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडाले. काम पूर्ण झाले होते आणि एक असुरी समाधान हंबीररावांच्या चेहऱ्यावर पसरले. शंकर मेला की आबा पाटील जिवंत असुन नसल्यासारखे होतील मग सर्व लोक केवळ आपल्यालाच मान देतील, इतके साधे गणित त्यांनी मांडले होते. दादु गुरवाच्या हातावर ५०,००० रुपये ठेवुन याबद्दल कुठे वाच्यता केल्यास पुर्ण कुटुंबास ठार मारण्याची धमकी देण्यास ते विसरले नाहीत. पुढची आवराआवर करेपर्यंत रात्रीचे १२.३० वाजले होते.
आपले काम आटपून हंबीरराव आणि सखाराम कोणाला संशय येणार नाही याची काळजी घेत अमावास्येच्या दाट काळोखात निद्राधीन गावात गुपचुप दाखल झाले आणि हळूच आपल्या वाड्याकडे मार्गस्थ झाले. लवकरच आबा पाटलाच्या वाड्यात सनई ऐवजी ‘राम नाम सत्य है’ चे स्वर घुमतील असा विचार मनात येताच हंबीररावांच्या ओठावर एक सैतानी हसु पसरले. "आबा पाटील, तुझ्या नाशाला आता फक्त तीस दिवस बाकी राहिलेत, आपल्या पोराच्या प्रेताला खांदा द्यायला तयार हो", असे पुटपुटत ते आपल्या वाड्याच्या पायऱ्या चढु लागले.
[next] इकडे आबा पाटलांच्या वाड्यावर दिवसभराच्या कामाने थकल्यामुळे शंकर आपल्या पलंगावर गाढ झोपला होता. अचानक वेदनेने त्याचा चेहरा पिळवटला जणु काही कोणी त्याच्या छातीत एक जोरदार ठोसा मारला होता. कळ जिरेपर्यंत थोडा वेळ गेला, तो थोडा सावरतो न सावरतो तोच त्याच्या पोटात मुरडा उठल्यासारख्या पण जीवघेण्या वेदना झाल्या त्यामुळे तो शौचालयात गेला, पण शौचाला न होता गरम रक्ताच्या चिळकांड्या मागील भिंतीवर उडाल्या. काही गरम आणि चिकट जाणवल्यामुळे त्याने वळून पहिले तर मागे रक्ताचे थारोळे पसरले होते. ते पाहून त्याला भोवळच आली. थोड्या वेळाने तो सावरला व स्वतःला साफ करून उभा राहायचा प्रयत्न करू लागला पण त्यांच्या पायातील बळच गेले होते, उभे राहाणे पण त्याला शक्य होत नव्हते. कसे बसे रांगत खुरडत तो आपल्या पलंगापाशी आला व त्यावर आडवा झाला. आपल्याला अचानक असे काय झाले याचा विचार करता करता बर्याच उशिरा त्याला झोप लागली.
रोज सकाळी ५ वाजता उठून तालमीत जाणारा शंकर ८.३० वाजले तरी उठला नव्हता. आबा पाटील आपल्या शिरसत्याने ५.३० ला उठून दोन तासाची आपली नित्य रपेट मारून आले व प्रातर्विधी उरकून त्यांनी योगा व प्राणायाम केला. सुशीलाबाई पण ५.३० ला उठून आपल्या नित्याच्या कामात गढून गेल्या. रोज सकाळी ८ वाजता तालमीतून परत आल्यावर शंकर आणि आबा सोबतच न्याहारी घेत असत पण आज ८.३० वाजुन गेले तरी त्याचा काही पत्ता नाही म्हणुन त्यांनी सुशीलाबाईंना आवाज दिला की शंकर आला नाही का अजुन तर त्यांनी काही कल्पना नाही म्हणुन सांगितले आणि त्याच्या खोलीत आहे का ते पाहून येते म्हणाल्या. त्यांना थांबवत आबा म्हणाले, राहु दे मी स्वतःच जाऊन बघतो तोवर तुम्ही न्याहारी वाढायला घ्या आणि ते शंकरच्या खोलीपाशी गेले. एकदम एक कुबट सडका वास त्यांच्या नाकात शिरला आणि अभावितपणे त्यांचा हात त्यांच्या नाकावर गेला. हा कसला वास म्हणुन त्यांनी शंकरच्या खोलीचे दार ढकलले तर मघाचच्या वासाचा त्यांना एक भपकारा आला. आतील दृश्य पाहून त्यांचे काळीज गलबलले आणि ते मोठ्याने ओरडले, ‘शंकर’, त्यांचा घाबरलेला आवाज ऐकून सुशीलाबाई धावतच तेथे आल्या. समोरचे दृश्य पाहून त्यांना भोवळच आली.
[next] शंकर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात वेडावाकडा पडला होता. त्यांच्या मागुन धावत आलेल्या सगुणा आणि शेवंताने (साखरामची पत्नी) त्यांना सावरले. शंकरची अवस्था पाहुन शेवंताही मनातुन चरकली. इतर गडी माणसांच्या मदतीने आबांनी शंकरला उचलून पलंगावर ठेवले आणि तुकारामाला लगेच डॉक्टरला घेऊन येण्यास सांगितले. शंकरच्या बाजूला बसून ते त्याला हाका मारू लागले पण शंकर कडून प्रतिसाद मिळत नव्हता तो पूर्णपणे बेशुद्धीत होता. आपल्या लाडक्या मुलाची ही अवस्था पाहुन एरव्ही काही झाले तरी पाषाणासारखे मजबूत राहणारे रामराव कोलमडून पडले होते. डॉक्टरांनी शंकरला तपासले पण त्यांना काहीच निदान झाले नाही, मुळव्याध असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि काही गोळ्या व मलम देवून शंकरसाठी पथ्यपाणी सांगितले. ‘काही वाटलेच तर फोन करा आणि दोन दिवसांनी येउन मला दाखवा’, असे सांगुन ते निघुन गेले. आज आठवडा झाला पण शंकरच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नव्हती रोज त्याला रक्त पडत होते, दिवसेंदिवस तो कृश होत चालला होता. हळूहळू साऱ्या गावात शंकरच्या आजारपणाची बातमी पसरली. लोक त्याला पाहायला येत, सोबत अंगारा धुपारा आणत. शंकरची अवस्था पाहुन हळहळत आणि आबांना निरनिराळे उपाय सुचवत. जो जे सांगेल ते आबा करत होते, पाण्यासारखा पैसा खर्च करत होते पण शंकरची परिस्थिती सुधारायचे काही नाव घेईना. आज तीन आठवडे झाले होते शंकर म्हणजे फक्त हाडांचा एक सापळा बनुन उरला होता. त्याच्या घशातून सतत घरघर आवाज येत राहायचा. श्वासाबरोबर त्याची अस्थि-पंजर छाती वरखाली व्हायची तेवढीच काय ती त्याच्या जिवंत असल्याही ग्वाही देत होती. शंकरचे पोट अक्षरशः पाठीला टेकले होते पोटात अन्नच टिकत नव्हते. डॉक्टरांनी देखील आता हात वर केले. आता सर्व देवाच्या हातात आहे असे सांगितल्यावर मात्र आबांचा धीर खचला. आबांची अवस्था पाहुन हंबीररावांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
कामानिमित्त गावाबाहेर गेलेला दादु गुरव गावात परत आला तेव्हा त्याला धाकले पाटील आजारी असुन आता काही वाचत नाहीत असे गावकर्यांनी सांगितले. तेव्हा आल्या पावली दादु गुरव आबांना भेटायला वाड्यावर गेला. शुन्यात नजर लावून बसलेल्याला आबांना पाहुन त्याला खुप वाईट वाटले. त्यांच्या जवळ जाऊन त्याने धाकल्या मालकांची विचारपूस केली तेव्हा आबांनी त्याला शंकरला होत असलेल्या त्रासाबद्दल सर्व काही सांगितले ते ऐकल्यावर तो चपापला. आपला संशय दूर करण्यासाठी त्याने आबांना विचारले की, ‘कधी पासून होतंय असे’? अमावास्येपासून असे उत्तर ऐकल्यापासून तो हादरलाच. आपली शंका खोटी ठरावी अशी देवाजवळ प्रार्थना करत त्याने आबांना विचारले की, ‘आबा, धाकल्या मालकांचे नाव शंकर पाटील तर नाही?’ आबा ‘होय’ म्हणाले आणि ते ऐकताच तो स्वतःच्याच तोंडात मारून घेऊन लागला आणि स्वतःला शिव्या देवू लागला. आबांना कळेना तो असे का करतोय. त्यांनी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘आबा, नदीच्या पुरात बुडणाऱ्या माझ्या पोराला वाचवायला तुम्ही तुमच्या जीवाचापण विचार नाही केलात आणि मी दळभद्री तुमच्या मुलाच्या जीवावर उठलो. मला माफ करा’.
[next] त्याची वाक्य कानात शिरताच आबा नखशिखांत हादरले, त्याला गदागदा हलवून ते गरजले. ‘काय केलयस तु माझ्या शंकरला?’ रडत रडत दादु गुरवाने सगळे काही आबांना सांगितले. शंकरच्या लहानपणापासून धाकले मालक म्हणत आलो त्यामुळे त्याचे खरे नाव मला ठाऊक नव्हते, अजाणतेपणी माझ्या हातून ते घडले, मला माफ करा. आबांच्या मस्तकात हंबीररावाबद्दल तिडीक गेली. त्यांनी दादुला आपल्या मुलाला वाचवण्यास सांगितले तेव्हा दादु गुरव म्हणाला, ‘केवळ हंबीररावच त्याला वाचवू शकतात, त्यांना मुठ उठवावी लागेल आणि तसे केले तरच शंकर वाचेल. वेळ फार थोडा आहे, उद्याच अमावास्या आहे. मुठ उठवली नाही तर येत्या अमावास्येला शंकर मरेल’, असे सांगताच रामराव आपली बारा बोअर ची बंदूक लोड करून हंबीररावाच्या वाड्याकडे निघाले. त्याच्या वाड्याच्या दरवाजावर लाथ घालून आबा गरजले, ''हंबीरराव बाहेर ये." आबांची गर्जना ऐकताच हंबीरराव आपल्या कुटुंबासोबत बाहेर आला. ‘माझ्या पोराने काय घोडं मारलं तुझं म्हणुन तू त्याच्या जीवावर उठलास?’ आबांचा रुद्रावतार पाहुन हंबीररावची बोबडीच वळली. आबांनी हंबीररावाच्या छातीवर बंदुकीची नळी टेकवली ते पाहुन तो त् त् प् प् करू लागला. यातले मला काहीच माहीत नाही असे तो बोलणार इतक्यात त्याची नजर दादु गुरवाकडे गेली आणि तो काय समजायचे ते समजला. आताच्या आता मुठ उठव नाही तर तुझ्या घरादारावरून गाढवाचा नांगर नाही फिरवला तर आबा पाटील म्हणुन नांव नाही सांगणार; असे आबांचे उद्गार ऐकताच आता आपली धडगत नाही हे जाणून तो सर्वांसह आपल्या जुन्या पडक्या वाड्याच्या तळघरात आला. दादु गुरवाने त्याला मुठ उठवायचा विधी सांगितला. हंबीररावाने दादुच्या सांगण्याप्रमाणे विधी करताच इकडे शंकरने डोळे उघडले. दादु गुरवाने मुठ उठल्याची खात्री देताच, आबा पाटील लगबगीने आपल्या वाड्यात परतले. आबांनी आपल्या लाडक्या शंकरला पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले.
इकडे जशी अमावस्या सुरु झाली तशी हंबीररावाची तरणीताठी मुलगी कुसुम वेदनेने तळमळू लागली. हळूहळू तिचे सर्व शरीर पिळवटल्यासारखे वेडे वाकडे होऊ लागले, ती गुरासारखी ओरडू लागली. स्वतःचा उर बडवू लागली. तिचे डोळे गरगर फिरू लागले. हातपाय वळु लागले होते. जणू काही कोणी तरी प्रचंड ताकदीने तिला पिरगळत होते. तिच्या नाका-तोंडातून, डोळ्यातुन, कानातुन सगळीकडुन रक्त वाहु लागले. शेवटी तिला रक्ताची एक खणाणून उलटी झाली आणि तिचा खेळ संपला, तडफडून तडफडून तिचा हंबीररावासमोरच मृत्यू झाला होता. ते पाहताच हंबीरराव धाय मोकलून रडू लागला. त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता पण वेळ निघुन गेली होती. त्याच्या करणीने तिचा बळी घेतला होता. मुठ उठली होती. शंकरचा जीव वाचला होता पण हंबीररावाच्या पापाची शिक्षा बिचाऱ्या कुसुमला मिळाली होती.
काही वेळाने ‘राम नाम सत्य है’ हे स्वर हंबीररावाच्या वाड्यात घुमु लागले होते.
(सदर कथा ही सत्य कथा असुन पात्रांची आणि स्थळांची नावे बदलली आहेत. करणी आणि मुठ मारण्याचा विधी मुद्दामहुन काल्पनिक दिलेला आहे जेणे करून कोणी तो करण्याचा प्रयत्न करू नये आणि केल्यास काही निष्पन्न होऊ नये. या प्रकारांच्या वाटेला न जाणेच चांगले. कोणाचे वाईट चिंतल्यावर आपलेच नुकसान होऊ शकते हा धडा वाचकांनी यातून घ्यावा.)