सुबोध - श्रुतीचे शुभ लग्न सावधान
फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ हा लग्नसमारोहावर आधारित असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘समीर रमेश सुर्वे’ दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर ‘सुबोध भावे’ आणि ‘श्रुती मराठे’ या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते.
शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते. ‘पल्लवी विनय जोशी’ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात, ‘डॉ. गिरीश ओक’, ‘निर्मिती सावंत’, ‘विद्याधर जोशी’, ‘किशोरी आंबिये’ यांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे.
लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाचे सनई चौघड्यांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘१२ ऑक्टोबर’ला प्रदर्शित होणारा हा सिनेमा विवाहोत्सुकांसाठी खूप खास ठरणार आहे, हे निश्चित !