
आम्ही अज्ञानी जन, वाहतो षड्रिपूंचाच भार
बालवयात ज्ञानेश्वरी, वेदांना आणले भूवरी
सरस्वती नांदे करी, शुद्ध केली वैखरी
तुम्ही झाला नामदेव, परप्रांती ठेविती भाव
गुरूबाणी पवित्र ठेव, तुम्हा ठाई नानक देव
कधी होता तुकोबा ज्ञानी, लिहिता गोड अभंगवाणी
धन्य झाली इंद्रायणी, देहू पवित्र या धरणी
दासबोध रामदासांचा, शोध घेई मनाचा
ठाव आत्मारामाचा, तळ गाठला अंतरंगाचा
कधी संत जनाबाई, जात्यावरची ओवी गाई
विठु बनला आई, परब्रम्ह ते धावत येई
तुम्हा वाटले जातीत, करंटे आम्ही निश्चित
येऊनी सांगा जनात, बदल घडवा विचारात
घेतले तुम्हा वाटून, तुम्ही श्रेष्ठ सारेजण
सांगा आता ठणकाऊन, संत एकीचे कारण