गोड बाहुली - मराठी कविता

गोड बाहुली, मराठी कविता - [God Bahuli, Marathi Kavita] नाजूक, गोरी, नकटी नारी, गाल गुलाबी, लट सोनेरी.
गोड बाहुली - मराठी कविता | God Bahuli - Marathi Kavita
नाजूक, गोरी, नकटी नारी
गाल गुलाबी, लट सोनेरी
फुलाफुलांचे घाली झबले
सुंदर माझी गोड बाहुली

डोळे मिटते तिरकी होता
पोट दाबता आई म्हणते
गोड गोड मग पापा देता
भूक लागली मजला कळते

अशीच अल्लड एकुलती ती
दडून बसली एके दिवशी
हाक मारुनी दमले मी पण
गेली वेडी कुठल्या देशी

रोज डोळे मिटते मी पण
झोप मला हो येतच नाही
मग कुशीत घेऊन आई निजते
अंगाई गुणगुणते मी ही

आई म्हणाली आणून देईन
तशीच सुंदर झबलेवाली
अशीच का गं रीत आपली?
जुनी हरवता नवी बाहुली?
रोहित साठे | Rohit Sathe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.