कोंडलेला आवाज होता, कोंडला होता श्वास, सुगरास जेवणाचाही, उतरत नव्हता घास
कोंडलेला आवाज होताकोंडला होता श्वास
सुगरास जेवणाचाही
उतरत नव्हता घास
दमट चादर गुंडाळून
कुजत होती स्वप्न
धुक्यातून डोकावत होती
अदृश्य असलेली विघ्न
अखडलेल्या अहंकारास होता
शंकांचा साखळदंड
बंद खोलीत स्वत: विरुध्दच
नकळत पुकारले होते बंड
भिंतीपुढे भिंत बांधुनी
विश्वासाला दूर लोटले
डोक्यातील भुग्याला ठिणगी देऊन
नैराश्यास जवळ ओढले
आरशातला रोगट मुखवटा
जेव्हा दारासमोर पडला
फटीतून आलेल्या प्रकाशाने
साक्षात्कार घडवला
बंद दाराच्या कोड्याचे
उत्तर होते कुलुपात
डोळ्यात होता अंधार
पण किल्ली होती खिशात