दैनंदिन जीवनातील कला - महाराष्ट्र

दैनंदिन जीवनातील कला, महाराष्ट्र - [Dainandin Jeevanatil Kala, Maharashtra] महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे.

महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे

महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. इतिहासपूर्व व त्यानंतरच्या काळातील आणि ऐतिहासिक कालांतील विविध संस्कृतीच्या उदयास्ताच्या खुणा आणि अवशेष या भूमीतील त्या त्या काळाच्या विविध स्तरांचे असल्याचे उत्खननात आणि संशोधनात आढळून आले आहे. संस्कृतीच्या या मूक साक्षीदारंनी येथील संस्कृतीचा इतिहास बोलका केला आहे.

पैठण, तेर, इनामागांव अणि महुरझरी येथे केकेल्या उत्खननात आणि संशोधनात येथील संस्कृतीच्या व लोकजीवनाच्या विविध पैलूंचे घडविणाऱ्या अनेक वस्तू आणि कलावशेष सापडले आहेत. यामध्ये, फुटलेली मातीची भांडी आणि त्यांचे तुकडे, मणी बांगड्याचे तुकडे, कलावशेष , अवजारे, नेहमीच्या वापरातील, भांडी, टेराकोटाच्या मुद्रा त्याचप्रमाणे हस्तीदंती, हाडाच्या, धातूच्या आणि लाकडाच्या वस्तू आणि शिल्पे आहेत. समाध्या आणि इतर पवित्र ठिकाणॆ कोरलेले शिलालेख, ताम्रपट, तसेच इतर अनेक ठिकाणी कोरलेली बोधचिन्हे आणि लेख यांचाही इतिहासाच्या या अमोल साधनात समावेश आहे.

प्राचीन काळातील स्त्री-पुरुषांचे जीवन कसे होते, त्यावेळचे लोक कसे राहात, काय खात, त्यांच्या संवयी कोणत्या होत्या. धर्म, तत्वज्ञान, कला आणि सौन्दर्य, विज्ञान आणि तंत्रविद्या तसेच ज्ञानाच्या इतर विविधा शाखा यांबाबत त्यांचे विचार आणि संकल्पना कोणत्या होत्या याची कल्पना उत्खननात व संशोधन सापडालेल्या या विविध वस्तूंवरून येते. प्राचीन काळातील हा धार्मिक वारसा नंतरच्या काळात बौद्ध , जैन आणि हिंदूंच्या निवासी गुफांत, लेणी गुंफा मंदिरे आणि विहार व त्यानंतरच्या काळात मंदिरे आणि वैभवशाली प्रासादांच्या रूपाने अधिक संपन्न झाला आणि संस्कृतीचा हा नंदादीप अखंड तेव्त राहिला.

[next] संस्कृतीच्या अरुणोदयापासूनच खळाळणाऱ्या शुभ्रधवल लाटांनी किनारपट्टीची भेट घेण्यासाठी आतुर झालेल्या अरबी समुद्राचे सान्निध्य महाराष्ट्राला लाभले आहे. सागराच्या या सान्निध्यामुळे सागरी उद्योगाला गती मिळाली, त्यामुळे मच्छिमार उद्योग आणि परदेशांबरबरीत व्यापार-उदिमाची प्रगती होऊ लागली.

खुष्कीचे मार्गही महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर विभागांत पोहोचले. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने होणाऱ्य दळणवळणामुळे विविध जातींचे एकमेकांशी संमीलन झाले. परदेशी संस्कृतेशी घनिष्ठ संबंध आला आणि विभागातील परंपरेला एक आगळी झळाळी आली.

या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील कला आणि सौंदर्यविषयक कल्पनांवर फार मोठा प्रभाव पडला . खानदानी अभिजातकला आणि शास्त्रीय संगीताने लोककला, लोकसंगीत व लोकजीवनातील रासवट आणि रांगद्या सौन्दर्याशी सलगी केली. महाराष्ट्रातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील कला आणि सौन्दर्याच्या आजच्या आविष्काराशी त्या अथांग प्राचीनाचे अतूट नाते आहे.

महाराष्ट्रातील दैनंदिन जीवानात, लोकांच्या आचारविचारांत या प्राचीन सांस्कृतिक वारशाचा ठसा खोलवर उमटला आहे. हा समृद्ध वारसा हाच येथील लोकजीवानाचा पाया आहे. येथील जीवनाला सस्कृतीचा ताल आणि परंपरेचा नाद आहे. महाराष्ट्राचा दैनंदिन जीवनाचा हा ओघ पिढ्या न्‌ पिढ्या चालू आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मानसाची दिनचर्या अगदी रामप्रहरापासून सुरू होते. मुखमार्जन, तेल लावून अभ्यंगस्नान, केशभूषा, सुंदर पेहराव, प्रसाधन करून, आणि आभरणांनी नटूनथटून झाल्यावर दैनंदिन कामासाठी तयारी होते. तुळशीचा पाणी, दारापुढे रांगोळी, दाराखिडक्यांवर तोरणे बांधून दिवसाच्या स्वागताची तयारी होते. खास सण आणि उत्सवाच्या वेळी भिंतीवर मंगल चिन्हेआणि देवदेवतांच्या आकृतीही चितारल्या जातात.

[next] षोडषोपचार पूजा हा दिनचर्येतील एक महत्वाचा भाग असतो. देवघरातील देव्हाऱ्यात देवदेवतांच्या अनेक छोट्या मूर्ती आणि पवित्र चिन्हे यांची यथासांग पूजा केली जाते. पवित्र गंगाजलाने देवांना स्नान घातले जाते. त्यानंतर, दूध, दही, तूप, मध आणि साखा यांपासून सिद्ध केलेले पंचामृत देवांच्या अंगाला लावून त्यांना अभिषेक करतात. अभिकेषकानंतर देवांना स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना चंदन, हळद-पिंजर, अबीर-गुलाब लावण्यात येतो. त्यानंतर देवांवर अक्षत आणि फुले, तुळशी आणि बिल्वपत्रे वाहिली जातात. त्यानंतर धूप आणि शुद्ध तेलातुपातील दीप उजळला जातो. नंतर देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि मग आरती होते. केव्हाकेव्हा झांज, टाळ, चिपळ्या , मृदंग, तंबोरा आदी संगीत वाद्यांची नादमधुर साथही आरतीला असते. आरतीनंतर मंत्रघोषात देवाला मंत्रपुष्पांजली होऊन पूजेची सांगता होते.

या षोडषोपचार पूजेच्या पूजासाहित्यात अभिषेक पात्र, तांब्यापळी, पंचपात्र यासारखी भांडी, करंडा, आरती-तबक, निरांजन, समई, कर्पूर पात्र (पंचारती), धूपपात्र, फुले ठेवण्यासाठी तबके किंवा परड्या आदी अनेक वस्तू असतात. त्यांचा घाट आकर्षक आणि जडणघडण कलात्मक असते.

घरातील या दैनंदिन पूजेखेरीज काही खास मंगल प्रसंगी काही विशिष्ट देवदेवतांच्या खास पूजाही करतात. गणेश-चतुर्थी, चैत्रगौरी, मकरसंक्रांत, दीपावली, दसरा, गुढी पाडवा आणि वसंतपंचमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होतात.

जन्मापासून तो मृत्यूपर्यंत माणसावर एकूण निरनिराळे सोळा संस्कार येतात. यापैकी प्रत्येक संस्कारात शास्त्रवचनप्रमाणे विविध धार्मिक विधी करण्यात येतात.

[next] दैनंदिन जीवनातील नेहमीच्या पूजाअर्चा आणि धार्मिक कृत्यांखेरीज आणखी अनेक धार्मिक परंपरा आणि उत्सव साजरे होतात क्रीडा, नृत्य, नाट्य, संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा यावेळी जल्लोष उडतो. या आनंद महोत्सवात आणि जल्लोषात कलाविष्काराचे विव्ध पैलू उजळून निघतात. दिअन्म्दिन जीवनही सौन्दर्य आणि कलास्वादात व भावविश्वात रंगून जाते. मानवाचे हे भावविश्व आणि भावना दैनंदिन वापराव्या वस्तूंमध्येहि कलात्मकारीत्या प्रतिबिंबित झाल्या आहेत. वस्तूंचा आकार आणि घाट केवळ तिच्या उपयोगाचाच नव्हे तर तो अधिक सुंद्र कशी दिसेल याचा विचार करून घडविण्यात येतो. एखाद्या विशिष्ट अर्थ सांगण्यासाठी संबंधित वस्तूंवरील कलाकौशल्यात विशिष्ट चिन्ह आणि आकृतीबंध वापरला आहे.

वैभवशाली गतकालीन अवशेषांत त्या त्या काळाच्या कलावंताच्या व कारागिरांच्या मनमोहक कलेचे आणि कारागिरीचे प्रतिबिंब उमटले आहे. किरकोळ शरीरयष्टीच्या, पण सळसळणाऱ्या उत्साह असलेल्या दॉ. दिनकर केळकरांनी दैनंदिन जीवनातील कलावस्तूंचा संग्रह करण्याच्या कार्याला अक्षरशः वाहून घेतले आहे. त्यांच्या हा वस्तूसंग्रह त्यांच्याच मुलाचे नाव दिलेल्या वस्तूसंग्रहालयात मांडून ठेवळा आहे. अत्यंत परिश्रम घेऊन गोळा केलेल्या आणि मातेच्या ममतेने जोपासलेल्या, महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि अजब नमुन्यांच्या हा कलावस्तू संग्रह पाहिल्याखेरीज महाराष्ट्राच्या कलावैभवाच्या आणि लोकजीवनाच्या अंतरंगाचे मर्म उमजणार नाही आणि त्यांच्या विशाल वैचित्र्याची कल्पनाही येणार नाही.

दिनकर केळकरांना "काका’ या लाडक्या नावाने ओळखले जाते. वस्तूसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांचे ते आवर्जून स्वागत करतात आणि त्यांच्याशी काकांची गट्टी हां हां म्हणता जुळून जाते. ८९ वर्षांच्या या चिरतरुणाच्या अम्गात अमाप उत्साह आणि जिद्द आजही सळसळत असून, आपल्या संग्रहाबद्दलचा सार्थ अभिमान त्यांच्या नजरेतून ओसंडताना दिसतो. आपले अनुभव आणि उद्देश सांगताना त्यांचा हा सार्थ अभिमान त्यांच्या नजरेत सतत डोकावताना दिसतो.

[next] रणझुंजार पहिल्या बाजीरावाची प्रियतमा दरबारी नर्तिका मस्तानी हिच्या वाड्यातील दिवाणखान्याचे साक्षात्‌ दर्शन घडविणारे कलादालन हे या वस्तूसंग्रहालयातील सर्वात वैशिष्टयपूर्ण दालन होय. मस्तानीच्या वाड्यातून हा दिवाणखाना जसाच्या तसा इथे हलविण्यात आला आहे. वास्तूशिल्पातील नाजूक शिल्पकला, लाकडावरील नक्षीकाम आणि भित्तीचित्र यांचे या दालानातील उत्कृष्ट नमुने पाहाणाऱ्याचे लक्ष खिळवून ठेवतात. या दालनाच्या कलात्मक सजावटीतून दरबारी राणीच्या घराचे दर्शनासाक्षी वातावरण निर्माण केले आहे. मस्तानीचे काचेवरील एअक चित्रही या संग्रहालयात आहे.मराठी दरबारी नर्तिकेचे पाश्चात्य पेहरावातील हे एक अनोखे चित्र आहे. काही दालनांत सूक्ष्म चित्रे, सचित्र हस्तलिखिते आणि चित्रकथीची चित्रे आहेत. चैत्र महिन्यात पूजोत्सव होणाऱ्या चैत्रगौरीच्या सन्मानार्थ कापडावर चितारलेला चैत्रगौरीपटाचे चित्रही लक्ष वेधून घेणारे आहे.

दगडी, लाकडी, टेराकोटा आणि धातूच्या मूर्तीत, पंचमुखी हनुमानाची मूर्ती नाट्यपूर्ण आहे. देवदेवतांच्या तसेच वन्य लोकांच्या ग्रामदेवतांच्याही अनेक मूर्ती या संग्रहालयात आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण आणि सहसा न आढळणारे अजब प्रकारचे दिवे हे या संग्रहालयाचे एअक खास वैशिष्ट्य होय. त्यासाठी तो प्रसिद्धही आहे. वृक्षदीप या नावाने ओळखण्यात येणारा १९ व्या शतकातील, झाडाच्या आकारातील दिवा. अंजनेयाचा हातातील पितळी दिवा , गणपतीचे वाहन असलेल्या मूषकावरील फुलांच्या अनेक पाकळ्यांना २० व्या शतकातील दिवा, दीप लक्ष्मी दिवे आणि लामण दिवे आदि अनेक प्रकारचे दिवे या संग्रहात आहेत. यापैकी काही दिव्यांवर महाराष्ट्रीय संस्कृतीची छाप आहे. या दिव्यांवर उत्कृष्ट नक्षीकाम असून देवदेवता, मानवी आकृत्या, पशुपक्षी यांची चित्रे कोरलेली आहेत.

[next] जीवनात रंग भरणाऱ्या विड्याला महाराष्ट्रात एकाअगळेच स्थान आहे. साहजिकच, विड्याचे साहित्य, विड्याची पाने, सुपारी कातणारा अडकित्ता, पानदान आणि चुन्याची डबी हा येथील जीवनाचाच एअक अविभाज्य भाग बनला आहे. पुणे, नाशिक ही विड्याच्या पानांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. येथेच विविध पानदाने, चुन्यांच्या डब्या आणि अडकित्ये तयार होतात.

बदामाच्या आणि भोपळ्याच्या आकाराच्या पानदाण्या, दुहेरी मोराची कलाकृती कोरलेल्या चुन्याच्या पितळी डब्या ह्या चालू शतकातील आहेत. देवदेवता, शृंगारचेष्टा करणारी युगुले, विशेषतः रती-मदन, पशुपक्षी, फळेफुले आणि मानवी आकृती असलेले अडकित्ये सामान्यतः पितळी असून ते १८ ते २० व्या शतकातील काळाच्या विविध टप्प्यांतील आहेत. एकोणिसाव्या शतकातील एका पितळी अडकित्यावर स्त्री-पुरुष आणि बालक असलेल्या एका कुटुंबाचे कोरलेले चित्र म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे.

या संग्रहालयातील लेखन साहित्याशी संबंधित असलेल्या वस्तूंपैकी दौती आणि कलमदाण्या पहिल्या शतकापासून तो आजच्या काळापर्यंतच्या असून त्यांची कारागिरी आणि सफाई उत्कृष्ट आहे.

या संग्रहातील प्रसाधन साधनात अंग घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वज्री आहेत. महाराष्ट्रातील उत्खननात त्या सापडल्या असून त्या सामान्यतः पितळेच्या असतत, वज्रीच्या वरील भागावर पशुपक्षी आणि मानवी कलाकृती आहेत. यापैकी एक वज्री पाय घासण्यची असून तिच्यावर एकमेकाच्या मानेत मान घालून समोरासमोर उभ्या असलेल्या दोन मोरांचे चित्र आहे.

[next] फावल्या वेळात संगीत ऐकण्याचा शौक हाही येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या वस्तूसंग्रहालयाच्या एका खास दालनात सहसा न आढळणारी आणि निवडक संगीत वाद्ये ठेवण्यात आली आहेत. बीन, तबला, ढोल, शहनाई य सुप्रसिद्ध वाद्यांखेरीज वन्य जमातीची संगीतवाद्येही येथे पहावयास मिळवतात.

संग्रहालयातील गृहोपयोगी वस्तूंमध्ये, स्वयंपाकघरात लागणारी भांडी, हत्यारे, हुक्का, पिकदाण्या, कुलपे, गंजिफा आणि चौपाई आदी वस्तू आहेत. या वस्तू लाकडाच्या, दगडाच्या आणि धातूच्या असून त्यावर विविध नमुने आणि कलाकृती कोरल्या आहेत.

लाजबाब कलाकौशल्य आणि कारागिरीने सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा अधिकधिक वैभवशाली आणि संपन्न करणाऱ्या ह्या महान कलावंताचे आणि कारागिरांचे आजच्या महाराष्ट्रावर फार मोठे ऋण आहे. कारण, त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती केवळ कलेचे सर्वोत्कृष्ट नमुने आहेत एवढेच नव्हे तर ती संस्कृतीची आणि कलेची स्फूर्तिस्थाने आहेत.

- अंजली मुनशी


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.