गुळाची पोळी - पाककृती
गुळाची पोळी, पाककला - [Gulachi Poli, Recipe] संक्रांतीमिनित्त घरोघरी बनविली जाणारी खमंग व खुसखुशीत अशी ‘गुळाची पोळी’ कशी बनवतात ते आज आपण पाहूयात.
खमंग व खुसखुशीत गुळाची पोळी
‘गुळाची पोळी’साठी लागणारा जिन्नस
- अर्धा किलो गूळ
- अर्धी वाटी तीळ
- अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे
- ७-८ वेलचीची पूड
- १ डावभर खसखस
- १ डावभर डाळीचे पीठ
- अर्धा किलो कणीक
- अर्धी वाटी तेल
‘गुळाची पोळी’ची पाककृती
- गूळ किसणीवर किसून घ्यावा.
- सुके खोबरे, तीळ, खसखस भाजून मिक्सरमध्ये वाटून किसलेल्या गुळात घालावे.
- डाळीचे पीठ तेलावर भाजून या मिश्रणात मिसळावे. वरून वेलचीची पूड घालून सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे पुरीच्या गोळीएवढे गोळे बनवावेत.
- कणकेमध्ये अर्धी वाटी तेल घालून नेहमीच्या कणकीप्रमाणे भिजवावी.
- त्याचे पुरीएवढे २ गोळे घेऊन त्या लाट्याच्या मध्ये गुळाचा एक गोळा घालून सर्व बाजू नीट बंद करावे व हळूहळू पोळी लाटावी.
- तव्यावर तेल किंवा तूप लावून मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजावी.
- वरून तुपाची धार लावून गरमागरम गुळाची पोळी खाण्यास द्या.
टिप: गुळाची पोळी २-३ दिवस चांगली राहते.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.