आता तरी मला ह्या, मैत्रीच्या जंक्शनामधून निरोप दे, शिटी झालीय आणि ओतलाय कोळसा इंजिनमध्ये
आता तरी मला ह्यामैत्रीच्या जंक्शनामधून निरोप दे.
शिटी झालीय आणि ओतलाय कोळसा इंजिनमध्ये.
असा किती वेळ हात हातात धरून
ही व्याकुळता धरून ठेवणार आहेस तू?
आता वाटलंच, तर चाल जरासं गाडीबरोबर
समांतर.
काचेतून पाहू या छोटे होत जाणारे चेहरे
आणि डोळ्यातली झाडं.
आपण नेहमीच चालत आलो समांतर
आणि आपल्या असण्याचा आवाज पोहचत
ठेवला एकमेकांपर्यंत.
एकमेकांच्या पुढ्याट आपण बळी गेल्यासारखे
निवांत व्हायचो
आणि साधे बोलण्यासाठी तोंड उघडले तरी
ह्या बहरत जाणाऱ्या ऋतूंचे फटके चाबकासारखे
बसतील असे वाटायचे.
मग आपण पत्रम लिहायची खूप खूप
आणि न लिहिलेल्या पत्रातून कळवायची
एकमेकांना आपले मौन की
नष्ट होण्याची घमेंडच सजवायचो
एकमेकांच्या मनात
अजुनही प्रिय म्हणतो मी तुला
नेमकं चुकीचं अंडरलाईन करण्यासारखं हे
प्रिय कडून प्रिय पर्यंतचा हा प्रवास
किती सुरक्षित
यार्डात पडून राहिलेल्या
गाडीसारखा.
पण प्रिय तुला आठवतं
तू जाणार आहेस त्याच्या विरुद्ध दिशेचं एक
स्टेशनही उध्वस्त झालयं ते
ज्यावर कवीचा जथा उतरायचा झोळ्या घेऊन.
तूच सांगितलेल्या ह्या बातमीवर
तू अद्यापही जपतेस मौन?
आणि मी मौनातून मनाकडे जाण्याच्या
वाटा धुंडाळायची भाषा जपतोय
प्रवास संपेपर्यंतच्या तिकिटासारखी.
पण आता निरोप दे ‘प्रिय’
बोलू नकोस काही - नुसते उभारू या हात
तळपू दे हवेत - ओंजळ हरवलेले तळवे.
लकाकू दे उन्हात - नव्या वळणांची धास्ती.
प्रवासासाठी प्रार्थना करताना
चुकून ओठात
जुन्या पत्रातल्या ओळी आल्या तर त्याही गिळ आवंढ्यासारख्या.
खरं तर हे प्रार्थना म्हणण्याचं वय नाही
आणि प्रवासाला निघण्याआधीच
ज्या अनोखळी स्टेशनात पोहचायचे
तेथे मी कधीचाच पोहचलोही आहे