कोर्लई किल्ला

कोर्लई किल्ला - [Korlai Fort] २७१ फूट उंचीचा कोर्लई किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेतील कोर्लई किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
कोर्लई किल्ला - Korlai Fort

कोर्लई किल्ला थोडा वेगळाच आहे कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी

कोर्लई किल्ला - [Korlai Fort] २७१ फूट उंचीचा कोर्लई किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेतील कोर्लई किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. अलिबाग हे एक प्रसिद्ध ठिकाण. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस म्हणजे मुरूड-जंजिऱ्याच्या दिशेने निघालो की १५-२० कि.मी. वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ३-४ कि.मी. वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. रेवदंड्यापर्यंत बसने जाता येते. इथून कुंडलिकेच्या खाडीवरचा पूल पार करून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो.

हा किल्ला थोडा वेगळाच आहे. कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी. म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला अलिंगण दिले त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे.’ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे.

कोर्लई किल्ल्याचा इतिहास


कोर्लई किल्ला १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यापैकी एक. इथे एक मजबूत कोट आहे. १५९४ साली पहिला बुऱ्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये. आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये.

पण दुसऱ्या बुऱ्हाण निजमाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली म्हणून त्यांनी आणखी मागवली. आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला. शेवटी त्यांनी गड घेतला. मात्र गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती.

एवढ्या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजी अप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज आणि सां फ्रांसिस्कोचे नाव ठेवले गणेश बुरुज.

कोर्लई किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


इथल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण फक्त १० मी. रुंद अश्या जागेवर फिरतो. हा बालेकिल्ला. इथून दर्शन होते ते एका विहंगम दृश्याचे. एका बाजूला निळ्याशार सागरावर छोट्या-छोट्या होड्या दिसतात, तर एकीकडे आपण खाडी आणि सागर यांची भेट झालेली पाहतो. इथे एक उत्तराभिमुख चर्चचे अवशेष आहेत. आता आपण उत्तरेकडे वळतो. सर्वप्रथम आपल्याला दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आत जावे लागते. पैकी समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सां दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सां फ्रांसिस्को.

इथे काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठा आहे. पश्चिम आणि उत्तर तटबंदीला तोफा स्थानापन्न केल्या होत्या. इथे ७० तोफा आणि ८००० शिबंदी असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आता जरा उत्तरेला वळलो की आपण इथल्या माचीवर पोहोचतो. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रुज म्हणतात. ही अंदाजे ३ मी. लांब माची आहे. थोडक्यात हा पोर्तुगीज धाटणीचा किल्ला आपल्याला सहजच त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पाडतो.

कोर्लई गडावर जाण्याच्या वाटा


सर्वप्रथम आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाई सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. अथवा मुरुड-जंजिऱ्याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते. गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो. एक आहे समुद्रकिनाऱ्यावरून, इथून पायऱ्या चढून आपण ४० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.


किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. गावात होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. किल्ल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी १ तास लागतो.
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.