कावनई किल्ला

कावनई किल्ला - [Kavanai Fort] २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-पश्चिम डोंगररांगेतील कावनई किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
कावनई किल्ला - Kavanai Fort

कावनई किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.

कावनई किल्ला - [Kavanai Fort] २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-पश्चिम डोंगररांगेतील कावनई किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई, अलंग, कुलंग, अवंढ-पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. या परिसरात भ्रमंती करायची असल्यास इगतपुरी किंवा घोटीला यावे.

कावनई किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्याचा दरवाजा आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी वाट आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहचल्यावर दक्षिणभागात एक तलाव आहे. आजुबाजूला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा तसा लहानच त्यामुळे फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.

कावनई गडावर जाण्याच्या वाटा


कावनई मार्गे: कावनई ला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे. येथून कावनी गावाकडे जाणारी बस पकडावी. कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. इगतपुरीहून अप्पर वैतरणा ला जाणारी बस पकडून वाकी फाट्यावर उतरावे. वैतरणाकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडची वाट पकडावी. या फाट्यापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहोचतो. गावात कपिलधारातीर्थचा नावाचा आश्रम आहे. गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो. किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे. या सोंडेवरून चढत जायचे अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते. पुढचा चढाई चिमणीतूनच आहे. येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो. गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात एप्रिल पर्यंत पाणी असते. किल्ल्यावर जाण्यासाठी कावनई गावातून अर्धा तास लागतो.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.