जनहितार्थ घरीच बसा - मराठी कविता

जनहितार्थ घरीच बसा, मराठी कविता - [Janhitarth Bharich Basa, Marathi Kavita] टिव्ही लावा, पेपर वाचा, बातम्यांवरती चर्चा करा, आवाज उठवा, निषेध करा.
जनहितार्थ घरीच बसा - मराठी कविता | Janhitarth Bharich Basa - Marathi Kavita

टिव्ही लावा, पेपर वाचा, बातम्यांवरती चर्चा करा, आवाज उठवा, निषेध करा

टिव्ही लावा, पेपर वाचा
बातम्यांवरती चर्चा करा
आवाज उठवा, निषेध करा
फालतू जोक वर पोटभर हसा
पण जनहितार्थ घरीच बसा!!

चहा करा, नाश्ता करा
खायची हौस पूर्ण करा
भाजी चिरा, स्वयंपाक करा
सकाळ, दुपार फर्निचर पुसा
पण जनहितार्थ घरीच बसा!!

पत्ते, कॅरम, भेंड्या खेळा
चहा सरबतं अनेकवेळा
बिछान्यावर पोटभर लोळा
वाद घाला, घरच्यांवर रुसा
पण जनहितार्थ घरीच बसा!!

नाटकं बघा, सिनेमा बघा
नेटवरच्या वेबसिरीज बघा
बॉलीवुड गाण्यावर भरपूर नाचा
कॅरीओकेवर गाऊन बसेल घसा
पण जनहितार्थ घरीच बसा!!

पुस्तके वाचा, पोथ्या वाचा
कविता करा नाहीतर मासिक चाळा
अभ्यास करा, हिशोब तपासा
प्रबंध लिहा किंवा अध्यात्मात घुसा
पण जनहितार्थ घरीच बसा!!

संपर्क कमी तर संसर्ग कमी
साथीला रोखायची घेऊया हमी
आज सावध तरच उद्याची आशा
निरोगी रहायचा घेऊया वसा
म्हणून जनहितार्थ घरीच बसा!!

सांगितलेले नियम पाळा
फालतू उत्साहाला घाला आळा
यंत्रणेवरचा बोजा टाळा
प्रसंगाचे व्यवधान पाळा
अफवांवर ठेऊ नका भरवसा
कृपया जनहितार्थ घरीच बसा!!


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.