गगनचुंबी पुतळे बांधायला, खोऱ्यानं पैसा आहे, सामान्याच्या इलाजाला मात्र गंगाजळ आटलेला आहे
गगनचुंबी पुतळे बांधायला
खोऱ्यानं पैसा आहे,
सामान्याच्या इलाजाला मात्र
गंगाजळ आटलेला आहे
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
बाजाराविना शेतमाल सारा
जागीच सडत आहे,
मद्य विक्रीचा तोडगा मात्र
सर्वांनाच पटलेला आहे
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
परदेशी अडकलेल्या अमिराला
जहाजांची कुमक आहे,
स्थलांतरित मजुरांचा रस्ता मात्र
पायीच कटलेला आहे
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
राजकारणाच्या मैदानात
आरोपांचाच वर्षाव आहे,
चिमुकल्यांचा पाय मात्र
रक्ताने माखलेला आहे
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
चाकरमान्यांना कसे
पगारांचे बळ आहे,
हातावरच्या पोटात मात्र
कावळा रुसलेला आहे
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
कर्ज - बुडवे भामटे कसे
महालात मुक्कामी आहे
कष्टकऱ्याचा संसार मात्र
रस्त्यात थाटलेला आहे.
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
अरे माणसा, ये रे भानावर
अजूनही वेळ आहे
उगाच नको तक्रार
निसर्गाचा तोल सुटलेला आहे.
कसं सांगू,
माझा देश विविधतेने नटलेला आहे
- विलास डोईफोडे