पक्का इंडियन (१०० इंडियन ब्रँड्सचा परिचय)

पक्का इंडियन - [Pukka Indian Book for 100 Indian Brands] १०० इंडियन ब्रँड्स चा परिचय करून देणारे पुस्तक.
पक्का इंडियन | Pukka Indian Book for 100 Indian Brands
पक्का इंडियन - १०० इंडियन ब्रँड्सचा परिचय.
पक्का इंडियन या पुस्तकात १०० इंडियन ब्रँड्स चा परिचय करून दिलेला आहे.

एखाद्या देशाची ओळख ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तिथली संस्कृती, राजकारण, माध्यमे, करमणुकीची उपलब्ध साधने यासाठी तो-तो देश ओळखला जातो. जसं भारत म्हटलं की, बॉलिवूडचा हिंदी सिनेमा डोळ्यासमोर येतो किंवा 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' म्हणताच अमेरिका डोळ्यांसमोर येते, तशीच प्रत्येक देशाची आपली अशी एक ओळख असते.

आपण अनेक परदेशी गोष्टी वापरतो. मोठा ग्राहकवर्ग असणारा देश म्हणून आज जगाची बाजारपेठ भारताकडे पाहते. याच आपल्या देशात आपल्या लोकांसाठी आणि आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गरजा ओळखून खास देशी उत्पादने बनवणाऱ्या काही भारतीय कंपन्या आहेत.

याच देशी कंपन्यांचा लेखाजोखा 'पक्का इंडियन' या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. या पुस्तकात १०० ‘इंडियन ब्रँड्स’चा परिचय करून दिलेला आहे. त्यातल्याच आगळ्या-वेगळ्या अशा पाच ब्रँड्सची आपण ओळख करून घेणार आहोत.


अमर चित्रकथा

या यादीत पहिला क्रमांक येतो, तो नावाप्रमाणे अमर असलेल्या ‘अमर चित्रकथा’चा. मुलांना आवडेल अशा अत्यंत आकर्षक आणि चित्रांच्या रुपात आपल्या पुराणातील कथा सांगण्याचे काम ‘अमर चित्रकथे’ने केले आहे. ज्यांना आपण प्रेमाने पै काका म्हणून ओळखतो त्या पै काकांनी १९६७ साली याची स्थापना केली.

नव्या पिढीतील मुलांना ग्रीक किंवा अमेरिकन इतिहास जेवढा माहीत आहे, तेवढा भारताचा इतिहास किंवा पुराणे यांची माहिती नसल्याचे त्यांना दिसले तेव्हा त्यांनी हे दृश्य बदलायचे ठरवले.

मुले आनंद घेऊ शकतील, अशा रूपात या गोष्टी त्यांच्यासमोर आणण्याचे त्यांनी ठरवले. तुम्ही स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरणारी आजची पिढी असाल, तर आई-वडिलांना 'अमर चित्रकथा'बद्दल नक्कीच विचारा.

गंमत म्हणजे तुम्ही-आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर रामायण आणि महाभारताच्या ज्या मालिका पाहिल्या आहेत, त्या सर्वांची शैली या 'अमर चित्रकथा'वरूनच आली आहे. त्यामुळे तुमच्या-माझ्या मनातले राम आणि कृष्ण याच ‘अमर चित्रकथे’तून जन्माला आले आहेत.


कालनिर्णय

तिथी, वार, चंद्रोदय, सूर्योदय या गोष्टींना आपल्याकडे आजही फार महत्त्व आहे. या सर्व गोष्टींचा आपल्यावर मोठा प्रभाव पाहायला मिळतो. पंचांग, तिथी, संकष्टी, अमावस्या-पौर्णिमा हे सगळं आई किंवा आजी भिंतीवर बघून सांगते, कारण जवळपास भारतातल्या प्रत्येक घरातल्या एका भिंतीवर ‘कालनिर्णय’ असतेच!

घड्याळ, खुर्ची, सोफा, पोळपाट-लाटणं ह्या सगळ्यांएवढंच प्रत्येक घरासाठी महत्त्वाचं आहे, ‘कालनिर्णय’! १९७३ साली ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आणि जयराज साळगावकर यांनी या दिनदर्शिकेची स्थापना केली.

आज पाण्याची बाटली मागताना जसं आपण पटकन 'बिसलेरी' द्या म्हणतो; तसंच काहीसं 'कालनिर्णय'चं आहे. 'कॅलेंडर' या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असावा, त्याप्रमाणे प्रत्येक आबालवृद्ध ‘कालनिर्णय हा शब्द वापरतो. आज 'कालनिर्णय' मराठी, हिंदी, इंग्रजी, तामीळ, तेलुगू, कन्नड, गुजराथी या सात भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आरोग्य आणि पाककृतींबद्दल माहितीपूर्ण लेख देणाऱ्या ‘आरोग्य’ व ‘स्वादिष्ट’ या कालनिर्णयच्या दोन खास मराठी आवृत्त्याही आहेत. प्रत्येक आवृत्तीमध्ये प्रत्येक महिन्याच्या मागच्या बाजूला त्या-त्या भाषेतील आणि प्रदेशातील रोचक आणि महत्त्वाची माहिती, मार्गदर्शनपर लेख दिलेले असतात.

हिंदूंसाठी खास पंचांग/दिनदर्शिका अशी याची प्राथमिक ओळख असली, तरीही भारतातील विविध जाती, पंथ, धर्माचे विविध सण आणि उत्सव याची नोंद घेणारे ‘कालनिर्णय’ ही धर्मनिरपेक्ष देशाची धर्मनिरपेक्ष दिनदर्शिका ठरते. काळाप्रमाणे बदलतानाच आज ‘कालनिर्णय’ डिजिटल माध्यमातही उपलब्ध झाले आहे. आई आणि आजीसाठी भिंतीवर असणारे कालनिर्णय आता तरुण पिढीच्या स्मार्टफोनमध्ये !अ‍ॅपच्या रुपातही मानाने विराजमान झालेले पाहायला मिळते.


सुमीत मिक्सर

आपण अनेकदा नवीन तंत्रज्ञानाने भारावून आणि भांबावून जातो. काही वेळा त्या उत्पादनाचे डिझाईन, त्याची आजूबाजूला होणारी चर्चा यामुळे आपण त्याच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करतो आणि आणि मग आपण केलेल्या खर्चाचा पश्चात्ताप करायची वेळ येते. पण यामुळे आपली कामे तर होत नाहीत; शिवाय व्याप वाढतात.

'सुमीत मिक्सर' या कंपनीचा दृष्टीकोन मात्र थोडासा वेगळा आहे. आपल्या उत्पादनाची चर्चा होण्यापेक्षा ते दीर्घ काळासाठी उपयोगी ठरेल यावर त्यांचा भर असतो.

दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याबाबत ते ठाम आहेत. याबाबत या ब्रँडचे संस्थापक श्री. माथूर यांचा दृष्टिकोन सारे स्पष्ट करतो. हे उत्पादन तयार करतानाच त्यांनी ठरवले होते की, घर चालवणाऱ्या आणि स्वयंपाक करणाऱ्या भारतीय गृहिणीला ज्या कोणत्याही पदार्थासाठी मिक्सरची मदत घ्यावी लागते, असे सगळे पदार्थ या मिक्सरच्या मदतीने करता आले पाहिजेत.


गोदरेज अलमारी

अलमारी किंवा कपाटे हा आपल्या घरातील आणि दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. 'गोदरेज'चे स्टील कपाट जवळपास एक-दोन पिढ्या प्रत्येक भारतीय घरात असते म्हणजे असतेच. या कपाटाचे वर्णन अनेकदा ‘आपली संपत्ती सांभाळणारा विश्वासू सहकारी’ असे केले जाते आणि त्यात काहीही वावगे नाही.

या स्टीलच्या कापाटाशी केवळ आपल्या साड्या, दागिने आणि इतर भौतिक संपत्ती जपून ठेवण्यापुरता किंवा साठवण्यापुरता संबंध नाही तर आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी त्याच्याशी नक्कीच जोडलेल्या आहेत. कारण कदाचित आपल्या वडिलांच्या लहानपणापासून हे स्टीलचे कपाट आपल्या घरात असते.


टाटा एस

एक टन वजनाची क्षमता असलेला हा छोटा ट्रक टाटा कंपनीने मे, २००५ मध्ये लाँच केला. गेली १५ वर्षे हे वाहन अनेक छोट्या आणि मोठ्या कंपन्यांसाठी पक्क्या उत्पादनाबरोबरच कच्च्या मालाचीही वाहतूक करत आहे. त्याची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि परफॉर्मन्स लाजवाब आहे. तीन चाकी रिक्षांच्या जागी आज अनेक छोट्या-छोट्या गावांतून मालाची ने-आण करण्यासाठी याचा वापर केला जातो.

देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या रस्त्यावर कुठे ना कुठे तरी हे वाहन तुम्हाला दिसतेच दिसते! देशाबरोबरच महाराष्ट्रातही 'छोटा हत्ती' अशी याची ओळख आहे. हत्ती हा अवाढव्य प्राणी चपळ म्हणून प्रसिद्ध सला, तरी त्याचे हे छोटे वाहन रुप मात्र अत्यंत चपळ आणि विश्वासार्ह आहे.


‘पक्का इंडियन’ या पुस्तकात आपल्या अवती-भोवती कोणत्या ना कोणत्या रूपात वावरणारे; भारताच्या जनमानसात खोलवर रुजलेले आणि त्यातूनच देशभरच नव्हे, तर जगभर पोहोचलेल्या ब्रँडच्या कथा आहेत.

ब्रँड आपल्या परिचयाचा असतो, पण त्याची कथा माहीत असेलच असं नाही. त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.